पाचोरा : शासन निर्णयानुसार क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे अनुषंगाने “माझा सातबारा, अद्यावत सातबारा” या अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यात 11 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत विविध शेतकऱ्यांचे सातबारा/खातेदार/नागरिक यांचे अर्ज संबंधित ग्राम महसूल अधिकारी सजेवर स्विकारणारआहे. त्यानंतर अर्जांची कार्यवाही करून दिनांक 21 मार्च 2025 रोजी मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत बैठकीद्वारे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे सातबारा उतारे अद्यावत करणे, त्यामध्ये आवश्यक असलेल्या नोंदी करणे, व विविध बाबींवरून शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. शेतकऱ्यांची जमीन व त्यावर असलेल्या हक्काच्या नोंदी, वारस हक्क, बँक/सहकारी संस्था कर्ज, जुनी कालबाह्य नोंदी, चुकीच्या प्रविष्ठ्या यांसारख्या बाबी या मोहिमेद्वारे सोडवल्या जाणार आहेत.
या शिबिरांत पुढीलप्रमाणे अर्ज स्वीकारले जाणार आहेत :
1) ऍग्रीस्टॅग बाबत दिनांक 11/03/2025 ते 17/03/2025 या कालावधीमध्ये गावातील ज्या शेतकरी यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाही अशा शेतकऱ्यांना गावातील सीएससी केंद्र चालक यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे फार्मर आयडी तयार करणार आहे.
2) अपाक शेरा कमी करणे :- शेतकऱ्यांनी अपाक शेरा कमी करण्यासाठी अर्ज दिल्यास त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरावा लागेल. जसे की, व्यक्ती सध्या 18 वर्ष पूर्ण झालेली आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यांची प्रमाणित प्रत आवश्यक राहील. शेरा मध्ये बदल नोंदवून जमीन हक्क अद्यावत केला जाईल.
3) एकूक/एकूमॅ कमी करणे :- 7/12 उताऱ्यावर ‘एकूक/एकुमॅ’ असे उल्लेख असल्यास ते काढून टाकण्यासाठी अर्ज आवश्यक आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी एकूक/एकूमॅ काढण्याच्या विनंतीसाठी पुरावे जोडून अर्ज करावा लागेल. अनेकदा ही नोंद जुनी असून अद्यावत होणे आवश्यक असते.
4) इतर अधिकारातील बँकांच्या/बोजाच्या/जुना नोंदी कमी करणे :- शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर अनेकदा जुन्या बँकांची कर्जाची नोंद असते, जी कर्जफेडीनंतरही तशीच राहते. या बाबी दूर करण्यासाठी संबंधित बँकेचे प्रमाणपत्र, कर्जफेडीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपले अर्ज तयार ठेवून कर्जफेड प्रमाणपत्र, बँकेच्या अधिकार्यांची स्वाक्षरी असलेली नोंद, संस्थेची कागदपत्रे संलग्न करावी.
5) इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणे :- शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यांवर अनेकदा जुने, कालबाह्य हक्क असतात. जसे की इतर व्यक्तींची नावं, जुने तक्रारी, स्थगिती आदेश वगैरे. अशा नोंदी काढण्यासाठी अर्जदाराने स्पष्ट माहिती देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक राहते.
या सर्व प्रकारातील अर्ज स्वीकारण्याची तारीख 11 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 ही असून, 21 मार्च 2025 रोजी मंडळ कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तलाठी, मंडळ अधिकारी, उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना अद्यावत सातबारा मिळवून देण्यात येईल.
या मोहिमेत नागरिकांना थेट सहभाग घेता येणार असून, त्यांना सातबारा संदर्भात कुठल्याही अडचणी असल्यास या शिबिराचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली नोंद प्रक्रिया पूर्ण करावी.
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महसूल नोंदींच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणणे. त्यामुळे शेतकऱ्यांची विविध शासकीय योजनांमधील पात्रता स्पष्ट होईल, कर्ज प्रकरणे सुरळीत होतील आणि जमीन मालकीबाबतचा वादही टळतील.
या अभियानाद्वारे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये प्रत्येक तलाठी मंडळाने एक दिवस राखून शिबिर राबवायचे आहे, जेणेकरून सर्वच अर्जदारांना आपली कामे सोप्या पद्धतीने पार पडतील.
पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी याबाबत संपूर्ण नियोजन केले असून, मंडळ कार्यालयात प्रत्येक अर्जाची नोंद, छाननी आणि निपटारा करण्यात येईल.
सदर शिबिर ही एक सुवर्णसंधी असून, शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून शिबिरात सहभागी व्हावे व आपले सातबारा उतारे अद्यावत करून घ्यावेत.शेतकऱ्यांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.