पाचोऱ्यातील पत्रकारांचा स्वाभिमानी लढा : बोगस पत्रकारांचा भांडाफोड आणि खरी पत्रकारिता टिकवण्यासाठीचा संघर्ष

0

पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. समाजात होणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडी जनतेसमोर मांडण्याचं, प्रशासन आणि जनतेमधील संवाद कायम ठेवण्याचं, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. मात्र, दुर्दैवाने आजच्या काळात या पवित्र क्षेत्रात काही बोगस प्रवृत्ती घुसून केवळ आपल्या स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करत आहेत. विशेषतः पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांत अशा प्रवृत्तींचं प्रमाण झपाट्याने वाढले असून, यामुळे खरी पत्रकारिता आणि खऱ्या पत्रकारांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. म्हणूनच आज हा लढा कुणा एका व्यक्तीसाठी नाही, तर पाचोऱ्यातील संपूर्ण पत्रकार समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी उभारण्यात आला आहे. पाचोरा परिसरात अनेक ठिकाणी काही मंडळी पत्रकारांच्या नावाचा गैरवापर करून विविध प्रकारचे व्यवहार, धंदे आणि हप्तेखोरी चालवत आहेत. पोर्टल सुरू करून केवळ चार बातम्या टाकून, त्यावर पत्रकार ओळखपत्र काढून अनेक जण स्वतःला ‘पत्रकार’ म्हणवून घेतात. त्यानंतर हे लोक स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्यांचा सुळसुळाट करतात, दबाव टाकतात, आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही प्रवृत्ती पाचोरा शहराच्या माध्यमविश्वासाठी धोकादायक बनली आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात अनेक स्वाभिमानी पत्रकार आता आवाज उठवत आहेत. हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. हा संघर्ष त्या प्रत्येक पाचोऱ्यातील पत्रकारासाठी आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत, सचोटी आणि निष्ठेने पत्रकारिता केली आहे. हे लोक कोणत्याही सणासुदीच्या काळात, निवडणुकीच्या वेळेस भोंदू पत्रकारांनी केलेल्या अडथळ्यांमुळे दुय्यम ठरत आहेत.
विशेषतः पाचोऱ्यात निवडणुकीच्या काळात आणि दिवाळीच्या सणात एकाच पोर्टलचे पाच – पाच, सहा – सहा पत्रकार निर्माण होतात. त्याचवेळी एकाच संघटनेचे पंधरा ते पंचवीस पदाधिकारी अचानक पुढे येतात. या सर्वांची योजना स्पष्ट असते – राजकीय नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून, व्यावसायिकांकडून विविध मार्गांनी पाकीटे गोळा करणं. अनेक वेळा हे लोक शासकीय पत्रकार परिषदांमध्ये पुढे झळकतात, आणि खरी मेहनती पत्रकार मंडळी मागे राहतात. पाचोरा शहरात अनेकजण यामुळे नाराज असून, खऱ्या पत्रकारांचे मनोबल खच्ची होत आहे.पाचोऱ्यात आज अशी स्थिती आहे की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पत्रकारांना देखील या बोगस पत्रकारांबरोबर एकाच रांगेत मोजलं जातं.आता तर खाटांच्या? लॉज स्पेशली हायवे लगत असलेल्या व्यवसायाकडे जाणारे जोडप्याचे व वाहनांचे फोटो काढून त्या जोडप्याला ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचे धंदे सुरू केले आहे ही केवळ शरमेची बाब नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्राला गालबोट लावणारी घटना आहे. याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.
पाचोऱ्यात वाढलेल्या बोगस पत्रकार संघटनांच्या संख्येमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोणतीही नोंदणी नसलेल्या, केवळ ओळखीवर आधारलेल्या संघटना ‘पत्रकार संघटना’ म्हणून उभ्या राहत आहेत. अशा संघटनांमध्ये राज्या पासून ते तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, युवा आघाडी अशी पदं वाटली जातात, आणि त्या आडून सुरु होतो खरा धंदा – हप्तेखोरी, ब्लॅकमेलिंग, आणि शासकीय कार्यालयांवर दबाव निर्माण करणं
या सर्व प्रकारांना आता पाचोऱ्यातूनच खडसावून उत्तर देण्याची गरज आहे. पाचोऱ्यातील प्रामाणिक पत्रकारांनी एकत्र येऊन या भोंदू पत्रकारांचे आणि त्यांच्या बनावट संघटनांचे बुरखे फाडले पाहिजेत. बातम्यांच्या माध्यमातून, पत्रकार संघटनांच्या एकत्रित कृतीद्वारे, आणि जनतेसमोर खरा चेहरा उघड करून हा लढा यशस्वी करावा लागेल.
म्हणूनच मी पाचोऱ्यातील सर्व सजग, निर्भीड आणि न्यायप्रिय पत्रकार बांधवांना आवाहन करतो – हा लढा वैयक्तिक नसून आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी आहे. बोगस पत्रकारांच्या प्रवृत्तीला पाचोऱ्यातूनच ब्रेक देण्याची ही वेळ आहे. खरी पत्रकारिता वाचवण्यासाठी, खऱ्या पत्रकारांचा सन्मान टिकवण्यासाठी आणि समाजापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
जर आपण आजही गप्प राहिलो, तर उद्या पाचोऱ्यात खरी पत्रकारिता हरवेल, आणि उरतील केवळ बोगस हक्कांच्या नावाखाली उभे असलेले नकली पत्रकार. म्हणूनच आता वेळ आली आहे खरी पत्रकारिता वाचवण्याची, आणि खऱ्या पत्रकारांसाठी जागा निर्माण करण्याची.अवैध व्यवसाय व धंदेवाल्यांना देखील विनंती आमचा तुमचा काही एक संबंध नाही स्वाभिमानी पत्रकार तुमच्या कधी संपर्कातही आले नाही किंवा तुमच्या पैशांची गरज देखील नाही आपले काय आणि कोणते व्यवसाय कसे कुणाच्या आशीर्वादाने करायची तो तुमचा वैयक्तिक भाग आहे व त्यासाठी तुमचे वैयक्तिक परिश्रम आहेत मात्र तुम्ही देखील अशा चुकीच्या प्रवृत्तीला पत्रकारितेच्या नावावर खतपाणी घालू नका आजपर्यंत पाचोर्‍यात असे घडले नाही व ही प्रथादेखील तुम्ही पाडू नका एवढीच विनंती

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here