विश्वशांतीसाठी सामूहिक नवकार महामंत्र पठणाचा ऐतिहासिक उपक्रम: पाचोरामधील जयकिरण प्रभाजी स्कूलचा अभिमानास्पद सहभाग

0

पाचोरा – शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. 9 एप्रिल 2025, बुधवार रोजी सकाळी 8:01 वाजता एक अत्यंत भावनिक, प्रेरणादायी व ऐतिहासिक असा सामूहिक नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण विश्वात एकाच वेळी नवकार महामंत्राचे 108 वेळा सामूहिक पठण करून विश्वशांती, एकता आणि समभावाचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम देशभरात नवचैतन्य घेऊन आला असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पठण थेट प्रक्षेपणाद्वारे 108 देशांमध्ये एकाच वेळेस दाखवले गेले आणि या प्रसंगी देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचीही थेट उपस्थिती लाभली.
पाचोऱ्यातील या शाळेने या महान उपक्रमात सहभागी होऊन ना केवळ आपल्या संस्थेचा सन्मान वाढवला, तर विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, शांती व मूल्य शिक्षण रुजवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले. या दिवशी शाळेच्या प्रांगणात वातावरण अत्यंत मंगलमय, शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण होते. नवकार महामंत्राचा जयघोष आणि विद्यार्थ्यांचे एकाग्र मन:पूर्वक सामूहिक पाठ यामुळे संपूर्ण परिसर पावन झाला होता.
नवकार महामंत्र जैन धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्यामुळे मनःशांती, आत्मशुद्धी आणि सृष्टीत समतोल नांदतो, असा विश्वास आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या मंत्राचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व अत्यंत मार्मिक शब्दांत मांडले. नवकार मंत्र हे केवळ जैन धर्मापुरते मर्यादित न राहता त्याचा प्रभाव सर्व मानवजातीसाठी कल्याणकारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखी संकल्पना मांडली की, जर रजिस्ट्रेशनद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची संख्या अधिकाधिक वाढली, तर प्रत्येक वर्षी 9 एप्रिल हा दिवस ‘नवकार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल. यामुळे नवकार मंत्राचा जागतिक प्रसार होईल आणि भारत एक अध्यात्मिक नेतृत्व करणारा देश म्हणून पुढे येईल, असा त्यांचा आशय होता.
पठणानंतर मा. नरेंद्रजी मोदी यांनी भारतवासीयांना नवसंस्कारांसाठी 9 महत्त्वाचे संकल्प करण्याचे आवाहन केले. त्यांनी दिलेल्या नो संकल्पना एक नवा सामाजिक दृष्टिकोन तयार होईल, जो देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शाळेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले दिनेशजी बोथरा यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, अध्यात्म व संस्कार यांची पायाभरणी शाळेपासूनच व्हावी यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक संजयजी चोरडीया, गुलाबजी राठोड, गोपालजी पटवारी, सौ. प्रितीजी जैन, महेंद्रकुमारजी हिरण,अशोककुमारजी मोर, शेखरकुमारजी धाडीवाल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश जैन महिला अध्यक्षा हर्षा संघवी आदी मान्यवरांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि CEO अतुल चित्ते सर यांनी केले. याशिवाय शाळेतील शिक्षकवर्गाचे योगदानही अत्यंत उल्लेखनीय होते. यामध्ये निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, शितल तिवारी, दिपिका रणदिवे, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि निःस्वार्थ वृत्तीने नवकार महामंत्राचे 108 वेळा सामूहिक पठण करताना दाखवलेली एकाग्रता आणि समर्पण भाव पाहता येणारे नवभारताचे दर्शन घडले. या दिवशी शाळेचे प्रांगण जणू काही तपोभूमीच बनले होते. शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक या सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यात आपली भूमिका बजावली.
हा कार्यक्रम हा केवळ एक धार्मिक अथवा सांस्कृतिक उपक्रम न राहता तो एक सामाजिक चळवळ ठरावा असा विचार या उपक्रमामागे होता. ज्या प्रकारे या कार्यक्रमात सर्व स्तरांतील व्यक्तींनी सहभावाने भाग घेतला, त्यावरून भारतात अध्यात्म, संस्कार व समाजिक एकात्मतेच्या मूल्यांची अजूनही गाढ मुळे आहेत, हे स्पष्ट होते.
शेवटी, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अशा प्रकारचे उपक्रम केवळ शांती आणि एकतेचाच नव्हे, तर भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. पाचोरामधील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलने या ऐतिहासिक क्षणाचा भाग होऊन आपल्या शाळेचा आणि पाचोराचा सन्मान उंचावला आहे. देशाच्या इतिहासात 9 एप्रिल 2025 हा दिवस नवकार दिवस म्हणून साजरा होईल, हे निश्चितच प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here