जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी – कु. चेतना हिरे व कु. आशिराना यांचे दमदार यश

0

पाचोरा – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रतीक, शोषित-वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून नवसंजीवनी देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच परंपरेनुसार यंदा विद्यार्थी सेवा समिती भडगाव तर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर आपली लेखनी झळकावत भरीव कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत बी.ए. द्वितीय वर्षात शिकणारी साहित्य शाखेची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे ( वरखेडी ) हिने ‘उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक’, तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील कु. आशिराना फिरोज फकीर हिने ‘उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक’ पटकावत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला चार चाँद लावले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या गुणवत्तेचा गौरव होत आहे.
ही निबंध स्पर्धा भडगाव येथील नालंदा बुद्धविहार येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात बौद्ध विचारवंत आणि समाजकार्य क्षेत्रातील अग्रणी नेतृत्व डॉ. भरत शिरसाठ होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मान वितरण प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रातील संविधानाचे अभ्यासक मा. भरत शिरसाट,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. निलेश पाटील,
मा.नगरसेवक नथ्थू अहिरे,
बौद्ध महासभेचे डी. के.वाल्हे , प्रा डॉ. संजय भैसे, विद्यार्थी सेवा समितीचे समन्वयक योगेश शिंपी, सौ.छाया बिऱ्हाडे, केदार साहेब, सपकाळे साहेब, मा. नगरसेविका योजना पाटील,सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी, इम्रान अली सय्यद,
उपप्राचार्य डी एम मराठे,
विजयकुमार भोसले,
रेखा कोसोदे , वाघ मॅडम मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण शिस्तबद्ध रचना आणि बौद्धिक उंचीची पातळी स्पर्धकांसाठी प्रेरणादायी ठरली.
या निबंध स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, त्यांचे कार्य, तत्त्वज्ञान व संविधानातील योगदान याची समज निर्माण करणे हा होता. स्पर्धेचे विषय ‘आंबेडकरी विचारांची आधुनिक काळातील गरज’, ‘भारतीय राज्यघटनेत समावेशीत्वाचे तत्त्व’ आणि ‘डॉ. आंबेडकर – सामाजिक क्रांतीचे प्रणेते’ या प्रकारांवर आधारित होते. या विषयांवर स्पर्धकांनी दिलेल्या निबंधातून सामाजिक जाणीव, इतिहासाची समज आणि आधुनिक काळातील संदर्भांची जोड यांचा उत्तम समन्वय पाहायला मिळाला.
कु. चेतना हिरे हिने आपल्या निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेसाठीची लढाई, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री सक्षमीकरण व संविधानात्मक मूल्यांची सखोल मांडणी केली. तीने आपल्या लेखनशैलीतून वाचन, चिंतन व अभ्यासाची झलक दाखवत अनेक उदाहरणे, संदर्भ व तत्त्वज्ञान मांडून परीक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला. तिची भाषा प्रगल्भ, शैली ओघवती आणि मांडणी अत्यंत स्पष्ट होती. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने इतक्या सामाजिक भानाने लिहिलेला निबंध पाहून परीक्षक वर्ग देखील भारावून गेले.
कु. चेतना हिरे ही पाचोरा तालुक्यातील वरखेडी या गावात राहते. तिचे शिक्षण श्री एम.एम. महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्ष साहित्य शाखेत सुरू आहे.
कु. आशिराना फिरोज फकीर हिने विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी असूनही सामाजिक विषयांवरील आपली पकड दाखवत निबंधात आधुनिक काळातील शैक्षणिक विषमता, जातीभेद, स्त्री-पुरुष समानता आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीचे आजच्या परिस्थितीत महत्त्व यांचे सुबक विवेचन केले. तीने बाबासाहेबांचे विचार व विज्ञान या दोघांमधील संबंध स्पष्ट करत ‘ज्ञान हेच खरे बल’ या तत्त्वाचा आधार घेत भिन्न दृष्टिकोनातून लेखन केले. विशेष म्हणजे, विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी असूनही तिने वापरलेली भाषा, संदर्भ, आणि शैली अत्यंत प्रभावी व समर्पक होती.
या दोन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचे श्रेय महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री वर्मा ( सौ.वाघ मॅडम ) आणि प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांना जाते. दोघेही प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. लेखन, वाचन, चर्चासत्र, व्यक्तिमत्त्व विकास, भाषाशुद्धी, समाजशास्त्रीय विश्लेषण या सर्व गोष्टींमध्ये ते विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर आपली चमक दाखवली.
या यशानंतर श्री एम.एम. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अभिनंदन समारंभात या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी प्राचार्य डॉ शिरीष पाटील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि सहविद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या अभिमानाने विद्यार्थिनींचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर त्यांच्या फोटोसह त्यांच्या यशाचा संक्षिप्त परिचय देण्यात आला असून, सोशल मीडियावरही दोघींच्या यशाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
यशामागील संघर्ष, अभ्यास, मन:पूर्वक प्रयत्न, सातत्य आणि ध्येयाप्रती निष्ठा ही मूलभूत कारणे लक्षात घेता, हे यश भविष्यातील स्पर्धांमध्ये मार्गदर्शक ठरणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने या दोघी विद्यार्थिनींना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी अधिक सुसज्ज करण्याचे नियोजन केले असून, लेखन कार्यशाळा, संवाद परिसंवाद, आणि अभ्यासगटाच्या माध्यमातून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
पाचोरा सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी केवळ जिल्हा स्तरावरच नव्हे, तर भविष्यात राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी महाविद्यालय कटीबद्ध आहे. महाविद्यालयाच्या एकंदर शैक्षणिक वातावरणाचा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचा आणि शिक्षकांच्या मेहनतीचा हा प्रत्यय आहे.
या यशाच्या निमित्ताने आज पाचोरा परिसरातील तरुणाईला, विशेषतः विद्यार्थिनींना एक नवा आत्मविश्वास, नवा दृष्टिकोन आणि प्रेरणादायी ऊर्जा मिळाली आहे. सामाजिक विषयांवर लिहिण्याची, विचार करण्याची आणि अभ्यास करून आपले विचार मांडण्याची प्रेरणा मिळवली आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, “पदवीच्या वर्गात बसलेली चेतना आणि विज्ञानात रमलेली आशिराना जेव्हा डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा पिचकारा घेऊन लेखणीच्या रंगांनी कागद रंगवतात, तेव्हा सामाजिक क्रांतीची नवी पिढी उभी राहते.”
या गुणवंत विद्यार्थिनींचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!
त्यांना पुढील वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन & पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here