कर्तृत्वाच्या अमृताक्षरांची साक्ष: नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या जीवनगौरवाचा दीपोत्सव

0

Loading

पाचोरा ( सौ. शितल सं महाजन ) एक यशस्वी जीवन म्हणजे केवळ पदे, प्रतिष्ठा किंवा पुरस्कार नव्हे, तर समाजासाठी झिजलेल्या प्रत्येक क्षणाची गोष्ट असते. शिक्षण, सहकार, सामाजिक विकास आणि ग्रामीण परिवर्तनाच्या चळवळीचा आत्मा ठरलेले, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमृत महोत्सव आणि नागरी गौरव सोहळा रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी पाचोरा शहरात उत्साह, कृतज्ञता आणि सन्मानाच्या सुवर्णशृंखलेत गुंफत साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन पीटीसी शिक्षण संस्था, एम. एम. महाविद्यालय आणि नानासाहेब व्ही. टी. जोशी अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री एम. एम. महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि लोकशाही मूल्यांचे भक्कम पुरस्कर्ते अरुणभाई गुजराथी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार सत्यजित तांबे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी संजयदादा गरुड, सिनेट सदस्य दिलीप पाटील, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव विनोद पाटील, विद्यापीठ लेखाधिकारी रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रमुख डॉ. शामकांत देवरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील, संस्थेचे मानद सचिव तसेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महेशदादा देशमुख, संचालक सतीश चौधरी, खलील देशमुख, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, भावेश जोशी, चेतन जोशी आदी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती सरस्वती पूजनाने तदनंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे दिवंगत शैक्षणिक आणि सहकारी चळवळीतील शिल्पकारांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहण्यात आली. या पूजन विधीनंतर एक हृदयस्पर्शी क्षण साकारला गेला, जेव्हा काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय पर्यटकांच्या स्मृतीस सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. देशभक्तीने ओथंबलेल्या या क्षणी संपूर्ण सभागृह निशब्द होत एकात्मतेची शपथ घेत उभे राहिले.
यानंतर कार्यक्रमात सर्व उपस्थितांच्या नजरा खिळल्या त्या एका अत्यंत भावनिक सोहळ्यावर—नानासाहेब व्ही. टी. जोशी व त्यांच्या पत्नी सौ. कांचन जोशी यांचे ७५ दिव्य दिव्यांनी पारंपरिक औक्षण करण्यात आले. या औक्षणाने सभागृहात एक आध्यात्मिक व भावनिक लहरी पसरल्या. शाल, श्रीफळ, विशेष सन्मानचिन्ह, ड्रेस, साडी आणि गौरवपत्र देत जोशी दांपत्याचा नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण कार्यप्रवासातील शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचा जयघोष होता.
कार्यक्रमाचा आणखी एक विशेष आणि ऐतिहासिक क्षण ठरला तो आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते ‘ज्ञानामृत’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन. या ग्रंथात नानासाहेब जोशी यांच्या जीवनयात्रेतील अनेक टप्प्यांचा अभ्यासपूर्वक आलेख, विविध साक्षात्कार व मुलाखतींचे संकलन करण्यात आले असून शिक्षण, सहकार, आर्थिक विकास, सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रांमधील त्यांचा पावलोपावली असलेला प्रभाव शब्दबद्ध करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचे अचूक विश्लेषण करत स्पष्ट केले की, त्यांच्या नेतृत्वातून केवळ एक संस्था नव्हे, तर एक विचारधारा उभी राहिली आहे. नाशिकचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मनोगतात सामाजिक बांधिलकी, सहकारातील सचोटी, आणि ग्रामीण भागातील प्रामाणिक शिक्षणविकास यासाठी जोशी यांनी जो झगडा दिला, त्याचे शब्दशः गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माझी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी आपल्या भाषणात नानासाहेब व्हि टी जोशी यांना ‘कर्तृत्वाचा दीपस्तंभ’ अशी उपमा देत त्यांची दूरदृष्टी, निर्भयता व नेतृत्वगुण यांचे तोंडभरून कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी यांनी ‘अशा कार्यकर्त्यांच्या अस्तित्वामुळेच देशातील लोकशाही बळकट होते’ असे नमूद करत, नानासाहेब जोशी यांचे जीवन म्हणजे जिद्द, धैर्य, नम्रता आणि आत्मविकासाचा प्रेरणादायी प्रवास आहे, असे ठामपणे सांगितले.
या गौरव सोहळ्यात नानासाहेब व्ही टी जोशी यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनांनी ओतप्रोत अशी कृतज्ञतेची भाषा वापरली. त्यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ एक पुरस्कार नव्हे, तर एक जबाबदारी आहे. उर्वरित आयुष्य समाजाच्या सेवेतील नवा अध्याय असेल, असे ठामपणे नमूद करत त्यांनी आपल्या जीवनातील सर्व सहकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि आप्तेष्टांचे नाव घेऊन आभार मानले.
कार्यक्रमात चित्रकला शिक्षक आर. वाय. पाटील यांनी पेन्सिलच्या साहाय्याने रेखाटलेले नानासाहेब जोशी यांचे अत्यंत जिवंत आणि हुबेहूब चित्र उपस्थितांना भेट म्हणून अर्पण केले. यासोबतच विजय सोनजे आणि उमेश माळी या पत्रकारांनी नानासाहेब जोशी यांच्या विविध कार्यांची वृत्तपत्रातील कात्रणे संकलित करून तयार केलेला दस्तावेज भेट दिला, जो त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ठरतो.
कार्यक्रमाला पीटीसी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे पदाधिकारी आणि जोशी परिवाराचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाचे उत्स्फूर्त योगदान, प्रेम, आदर आणि सहकार्य हेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे खरे गमक ठरले.
प्रास्ताविकात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी नानासाहेब जोशी यांच्या संस्थात्मक कार्याची साद्यंत माहिती देत, त्यांनी दिलेल्या दिशा, मार्गदर्शन आणि सहकार्याचे भावनिक स्मरण केले. सूत्रसंचालन  प्रा. सी. एन. चौधरी व महेश कौंडीण्य यांनी प्रभावी शैलीत करत उपस्थितांच्या मनात एक भावनिक लय निर्माण केली. आभारप्रदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी प्रत्येक मान्यवर, पाहुणे, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार बंधू व सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. भारतमातेसमोर सर्व उपस्थित उभे राहून आदर व्यक्त करत ‘वंदे मातरम्’च्या घोषात हा कार्यक्रम इतिहासाच्या पानात अजरामर झाला. पीटीसी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा सोहळा केवळ एक कार्यक्रम न राहता, एका महान व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी जीवनाचा साक्षात्कार ठरला.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरतो आहे. त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब म्हणजे मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे जीवन आदर्श मानून सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक मूल्ये आणि सहकारी विचारसरणी यांचे संगोपन करावे, हीच या भव्य सोहळ्याची खरी सार्थता ठरते. त्यांच्या जीवनाचा आदर्श उजळत राहो, हीच प्रार्थना आणि त्यांचे कार्य अशाच प्रकारे अमृतासारखे सतत प्रवाहित राहो, हीच या गौरव सोहळ्याची प्रेरणादायी समाप्ती ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here