![]()
पाचोरा – कोणत्याही परिस्थितीत देशसेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या भावनांची आणि गरजांची लाज न ठेवता त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता कायद्याचा करडा चाप बसण्याची वेळ आली आहे. पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रेल्वे तिकीट एजंटगिरी करणारा योगेश वाणी नावाचा एजंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी मतिमंद विद्यार्थ्यांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे वसूल करून तिकिटे देतानाचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी धडक तक्रार करीत त्या प्रकरणात आर पी एफ कडून कारवाईही झाली होती. परंतु दुर्दैवाने या व्यक्तीने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.
नुकत्याच घडलेल्या प्रकारात सी आय एस एफ मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्याकडून योगेश वाणी याने तब्बल १६०० रुपये वसूल केले. विशेष म्हणजे या बदल्यात कोणतेही आरक्षण किंवा खात्रीशीर तिकीट सुविधा न देता त्यांच्याशी फसवणुकीसारखी वागणूक करण्यात आली. हे सर्व प्रकरण यामुळे अधिक गंभीर ठरतं की देश युद्धजन्य स्थितीत असताना, सैनिकांना त्यांच्या सेवास्थळी तातडीने पोहोचणे अपेक्षित असते आणि अशा वेळी त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेचा फायदा घेत त्यांच्याकडून अवाजवी रक्कम उकळणे हे केवळ अनैतिकच नाही तर थेट भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये फसवणूक म्हणून ओळखले जाते.
या प्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी बातमी प्रसिद्ध करताच तातडीने हालचाल होऊन संबंधित सैनिकाच्या खात्यात वसूल केलेली रक्कम काही मिनिटांत परत ट्रान्स्फर करण्यात आली. ही बाब योगेश वाणीने घाबरून केलेली आणि पत्रकारितेच्या ताकदीचा थेट पुरावा आहे. संबंधित व्यक्तीने याआधीही अशा प्रकारे बऱ्याच गरजूंना गंडवत असल्याची माहिती विविध माध्यमांतून समोर येत आहे.
योगेश वाणी याने अजूनही लालच सोडावी
जर का या प्रकरणात उच्च स्तरावर सखोल चौकशी केली गेली तर संबंधित सैनिकाच्या आय डी वरून काढलेले तिकिट, त्याचा संगणक, वापरलेला इंटरनेट आयपी अॅड्रेस, आर्थिक व्यवहारांची ट्रांजेक्शन रेकॉर्ड, फोन नंबर आणि सी आय एफ एम एस वर नोंद असलेली माहिती या सर्व गोष्टी पुराव्याच्या स्वरूपात इतक्या ठोस आहेत की कोणत्याही कागदोपत्री साक्षांशिवायही या प्रकरणी न्यायालयात दणदणीत पुरावे मांडले जाऊ शकतात. त्यानुसार योगेश वाणी याला शिक्षा होणे अटळ आहे.मात्र पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्टपणे मांडले आहे की पत्रकारिता म्हणजे कोणाचेही कुटुंबाचे उद्ध्वस्त होणे नव्हे, पण जेव्हा कोणीतरी ‘व्यवसाय’ या नावाखाली नागरिकांच्या गरजांचा, भावनांचा, आणि विशेषतः सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेचा फायदा घेतो, तेव्हा माध्यम म्हणून ही जबाबदारी बनते की त्यावर आवाज उठवावा. योगेश वाणी याने याआधी झालेल्या प्रकरणातून काही धडे घेतले असते तर आज ही वेळ आली नसती. मात्र आता निदान या ताज्या प्रकारातून त्यांनी हे समजून घ्यावे की, पैशाच्या हव्यासापोटी करत असलेला हा ‘छोटा वाटणारा’ प्रकार एका सैनिकाच्या मनावर, त्याच्या कुटुंबावर, आणि अखेर समाजाच्या सुरक्षिततेवर किती घातक परिणाम करू शकतो.
कायदा, प्रशासन आणि माध्यम यांचे त्रिसूत्री बळ जर एकत्रितपणे काम करू लागले, तर पाचोऱ्यातील असे एजंटगिरी करणारे अनेक ‘स्वघोषित’ दलाल आणि भामटे उघडकीस येतील. जनतेनेही अशा प्रकरणांची माहिती वेळेवर संबंधित अधिकाऱ्यांना किंवा पत्रकारितेला द्यावी, जेणेकरून या लुटीचा मक्ता संपवता येईल.
पुनश्च सांगायचं झाल्यास, कोणत्याही व्यवसायात नीतिमत्ता, पारदर्शकता आणि माणुसकी असणे आवश्यक आहे. जर ही त्रिसूत्री सोडून कुणी केवळ नफा आणि लालच व हव्यासाच्या बळावर नागरिकांना लुटत असेल, तर तो ‘व्यवसाय’ नसून एक ‘गुन्हा’ ठरतो.
योगेश वाणी याने तातडीने याची जाणीव ठेवून भविष्यात अशी फसवणूक पुन्हा आपल्या हातून होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा न्यायव्यवस्थेचा कोप त्यांच्या वाट्याला येणे अटळ आहे. जनतेनेही अशा घटनांबाबत सजग राहून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर विश्वास ठेवत योगेश वाणी सारख्यांच्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा.
हीच खरी पत्रकारितेची ताकद आणि जबाबदारी आहे – नागरिकांच्या हक्कांसाठी लढणं, अन्यायाला उघड करणं आणि चुकणाऱ्यांना सुधारायला भाग पाडणं!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





