![]()
पाचोरा – भडगाव तालुक्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व असेल, असा ठाम विश्वास माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघात सक्रिय राजकीय कार्य करत असलेल्या वाघ परिवाराने अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शुक्रवारी (ता. ३० मे) दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना अनेक राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकरभाऊ काटे, दत्ताआबा बोरसे, रमेश वाणी, कांतीलालभाऊ जैन, डॉ. शांतीलाल तेली, प्रकाश पाटील, ॲड. अविनाश सुतार, सतीश चौधरी, विनय जकातदार, शिवदास पाटील, वासुआण्णा महाजन, नंदू बापू सोमवंशी, प्रदीप पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, अनिल पाटील, विजय पाटील, सनीभावाघ, प्रताप चौधरी, अरुण पाटील, किशोर संचेती, रणजीत पाटील, भगवान मिस्तरी, सुनील पाटील, प्रा. माणिक पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, सुदाम वाघ, भागवत मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई येथील पक्षप्रवेश सोहळ्याचे तपशील दिले.
दिलीपभाऊ वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले की, गेल्या २५ वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतो. चार वेळा विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या. मात्र यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. निवडणूक रिंगणात असताना युती सरकारच्या लाडकी बहिण योजना व विकासात्मक धोरणांमुळे स्पष्ट संकेत मिळत होते की पराभव अटळ आहे. त्यामुळे मी निवडणूक रिंगणातून बाजूला झालो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या राजकारणाचा पाया म्हणजे समाजहित व विकासाभिमुख दृष्टिकोन. मात्र राज्यात राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे दोन गट पडल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले होते. ‘आता कुठे राहावे?’, ‘विरोधात किती दिवस बसायचे?’ या प्रश्नांनी कार्यकर्ते संभ्रमात होते. त्याच वेळी भाजपात प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची मागणी तीव्र झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि विकासाचा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी अखेर भाजपात प्रवेश केला, असे दिलीपभाऊ यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बाजार समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, पीटीसी शिक्षण संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, संचालक, वाघ परिवाराचे समर्थक व हितचिंतक अशा सुमारे २०० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. आमदार व नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा प्रचंड विकास केला आहे. मात्र गेल्या काही काळात सत्ता नसल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. कार्यकर्तेही दिशाहीन झाले होते. अशा वेळी भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत आग्रहाने संवाद सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या विचारांनुसार निर्णय घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला, असे स्पष्ट करताना दिलीपभाऊ यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाची सत्ता क्रमांक एक वर आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, सहकारी संस्था यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार कार्य करताना भाजपाचा एकतर्फी प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगून, केंद्र ते गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे आणि त्यामुळे यापुढे निर्णय हे पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आगामी निवडणुकीत काय विचार आहे?” मित्र पक्षाशी युती की स्वतंत्र लढत या प्रश्नावर उत्तर देताना दिलीपभाऊ वाघ म्हणाले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून येथे निर्णय हे पक्षश्रेष्ठींचे असतात. पक्षाकडून जे आदेश मिळतील, त्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढवू. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. यावेळी अमोलभाऊ शिंदे यांच्या सहभागासंदर्भात विचारल्यावर दिलीपभाऊ म्हणाले की, माझ्या प्रवेशाने कोणीही नाराज नाही. मी भाजपात सक्रिय झाल्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसोबत काम करत आहे. त्यामुळे कोणताही विरोध किंवा नाराजी होण्याची शक्यता नाही. पक्षाच्या धोरणांप्रमाणे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी एकसंघपणे सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.
या पत्रकार परिषदेत विनय जकातदार, मधुभाऊ काटे, नंदू बापू सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वाघ परिवाराचा भाजपात प्रवेश झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा बळकटीचा फायदा होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेच्या समारोपप्रसंगी नंदू बापू सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






