पाचोरा – आज 31 मे 2025 रोजी शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवणारे आणि स्पष्टवक्तेपणाची ओळख निर्माण करणारे सीताराम पांडुरंग पाटील सर आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सन 1954 मध्ये जन्मलेल्या पाटील सरांनी आयुष्यभर ‘जे योग्य ते स्पष्ट’ म्हणण्याची भूमिका घेतलेली असून, त्यांच्या स्पष्ट भाषेची कडूनिंब व कारल्यासारखी कडवट चव लोकांनी शेवटी औषधासारखीच स्वीकारलेली आहे. शिक्षकी पेशातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक क्षेत्रात विस्तारलेला असून, अनेक संस्था व पदांवर त्यांनी कार्य केले आहे. पाटील सरांचे मूळ गाव पाचोरा तालुक्यातील पुनगाव असले तरी नोकरीनिमित्त ते पाचोरा येथे स्थायिक झाले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी 1974 ते 2012 पर्यंत सु. भा. विद्या मंदिर, पाचोरा येथे शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अखंड मेहनत घेतली. त्यांच्या अध्यापनशैलीत स्पष्टता, शिस्त आणि मूल्यशिक्षणाची ठाम भूमिका होती. याच शाळेत त्यांनी 2007 ते 2012 या काळात मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर समाजजीवनात सक्रिय सहभाग हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे. पाटील सरांनी पुनगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सलग 10 वर्षे भूषवले. या काळात गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी विविध योजनांची अंमलबजावणी केली. सहकार क्षेत्रातही त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्था ही त्यांनी स्थापन करून यशस्वीपणे चेअरमन पद सांभाळले. त्याशिवाय ते जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, पुनगाव यांचेही संचालक होते.
राजकारणात त्यांनी राजकारणाचे पितामह स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांचे पाईक म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवास सुरू केला कालांतराने स्वर्गीय आप्पासाहेब व वाघ परिवार वेळोवेळी जे जे जबाबदारी पक्षाची संघटनेची व निवडणुकीची देतील ती यशस्वीपणे सांभाळत त्यांनी तालुका अध्यक्षपद, तसेच ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट विचार, शिस्त आणि कार्यक्षम नेतृत्व ही त्यांची छाप राहिली आहे.
शिक्षक संघटनेच्या माध्यमातूनही पाटील सरांनी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षपद, तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न प्रशासनदरबारी मांडले.
त्यांच्या एकूण कार्यकाळात विशेष नोंद घ्यावी लागेल ती म्हणजे त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांच्या बोलण्यात कधीच मखलाशी नव्हती, जे योग्य वाटले ते त्यांनी कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट शब्दांत मांडले. त्यामुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्यांचा राग आला, पण पुढे त्यांच्या बोलण्यातील खरंचपणा, हितचिंतन आणि मार्गदर्शन समजून येत गेले. ते बहुउद्देशीय रेवे गुज्जर मंडळ, पाचोरा तालुका चे संचालकही राहिले असून या समाजघटकाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रत्येक स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवला.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेतला असता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येतात – शिक्षक, मुख्याध्यापक, सहकारी नेते, राजकारणी, संघटक आणि मार्गदर्शक. पण या सर्वांवर मात करणारा गुण म्हणजे त्यांची थेट बोलण्याची प्रामाणिक शैली, जी त्यांना आजच्या काळातही लोकांमध्ये विशेष स्थान मिळवून देते.
71 व्या वर्षात पदार्पण करताना पाटील सर अजूनही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असून नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी ‘ध्येय न्यूज – झुंज वृत्तपत्र’ परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.