‘फुले’ चित्रपट — समतेचा संदेश देणारा आणि पुरोगामी विचारांना प्रेरणा देणारा ऐतिहासिक चित्रपट – सौ.शितल महाजन

Loading

पाचोरा -येथील श्री. शेठ एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य, साहित्य व सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रातील आदर्श मार्गदर्शक डॉ. वासुदेव वले यांनी अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मनापासूनची अपेक्षा व्यक्त केली—’फुले’ हा चित्रपट पाचोरा शहरातही प्रदर्शित व्हावा. जेव्हा डॉ. वले यांच्यासारखी विचारवंत, अभ्यासू आणि सामाजिक जाणिवांची व्यक्ती अशी मागणी करते, तेव्हा त्या मागणीला केवळ औपचारिकतेत न पाहता त्यामागील आशय समजून घेण्याची आणि स्वतःही चित्रपट पाहण्याची जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
त्यांच्या या अपेक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘फुले’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला आणि चित्रपटातील अनेक दृश्यांनी मन हेलावून गेले. मनात विचारांचे वारे उसळले. त्यामुळेच त्या विचारांना दोन शब्दांत व्यक्त करण्याची इच्छा मनात दाटून आली…समता, न्याय आणि बंधुतेचा दीप पुन्हा उजळणारा ‘फुले’ चित्रपट भारतभर गाजतोय…
हजारो वर्षांच्या जातविचाराच्या गुलामीत अडकलेल्या समाजाला समतेचा, शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा प्रकाश देणाऱ्या दोन थोर महापुरुषांचे जीवन आपणासमोर आणणारा ‘फुले’ हा हिंदी चित्रपट सध्या संपूर्ण भारतभरात गाजत आहे. आद्य समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट केवळ कलाकृती नाही, तर एका सामाजिक जागृतीचे माध्यम आहे.
समकालीन काळातील वाढती जातीयता, धार्मिक तेढ, अंधश्रद्धा आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर ‘फुले’ हा चित्रपट समाजाला एका प्रगल्भ आणि पुरोगामी मार्गावर नेणारा एक प्रकाशस्तंभ ठरतो. आपल्या महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा, वैचारिक संपन्नता आणि सर्वसमावेशक विचारधारा यांचे भान ‘फुले’ या चित्रपटातून संपूर्ण देशाला होईल, असा विश्वास या चित्रपटाच्या यशामागे आहे.
या चित्रपटात महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआई फुले यांचा जीवनपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर एक प्रेरणादायी वैचारिक प्रस्थापनेच्या रूपात दाखवण्यात आला आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर बहुजन समाजातील कष्टकरी, शोषित, पीडित आणि विशेषतः महिलांसाठी जे कार्य केले, ते हृदयस्पर्शी पद्धतीने पडद्यावर सादर करण्यात आले आहे.
चित्रपटात सावित्रीआई फुले यांचे शिक्षिका म्हणून योगदान, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी घेतलेली झुंज, समाजातील विरोध सहन करत त्यांनी उभे केलेले पहिले मुलींचे शाळा, तसेच महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचा इतिहास उत्तम प्रकारे मांडण्यात आला आहे. हे सगळं पाहताना केवळ चित्रपट पाहत आहोत असा अनुभव येत नाही, तर एका सजीव इतिहासाचा आपण साक्षीदार आहोत असे वाटते.
खरोखर आज आपला समाज विविध ताणतणावांमधून जात आहे. जातीय भेद, धार्मिक ध्रुवीकरण, महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा यांचे सावट दाटले आहे. अशा वातावरणात ‘फुले’ चित्रपट समाजाला डोळे उघडणारा आरसा दाखवतो. तो केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नाही, तर आपल्या सद्य समाजाची स्थिती ओळखून, तिला आरशात पाहण्याची संधी देणारा ठरतो.
जोतीराव आणि सावित्रीआई फुलेंनी त्या काळात जे विचार मांडले ते आजही तितकेच लागू आहेत. त्यांनी मांडलेली समता, शिक्षणाचा प्रसार, जातीपातीचा विरोध आणि स्त्रीपुरुष समानतेचे तत्त्व ही आजच्या भारतासाठीसुद्धा प्रेरणादायी वाटचाल आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक नागरिकाने पाहणे हे काळाची गरज ठरते.
‘फुले’ चित्रपट केवळ इतिहास दाखवत नाही, तर भविष्यासाठी दिशाही दाखवतो. महात्मा फुले आणि सावित्रीआई यांच्या कार्यातून अनेक सुधारक, कार्यकर्ते आणि शिक्षक प्रेरणा घेत आहेत. आजच्या तरुण पिढीला जर नव्या भारताचा चेहरा साकारायचा असेल, तर ‘फुले’ सारख्या चित्रपटांमधून आपल्याला प्रेरणा घ्यावी लागेल.
या चित्रपटात दाखवण्यात आलेले स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, शेतीसंबंधीचे विचार, सामाजिक सुधारणेसाठी सुरू केलेले सत्यशोधक समाज यांचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. या कार्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती नव्हे, तर ती अखंड भारताच्या समतेच्या लढ्यातील एक मूलभूत पायाभूत कल्पना ठरते.
चित्रपटाची कलात्मक मांडणी, संवादलेखन, पार्श्वसंगीत, अभिनय यांचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. महात्मा फुले यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका इतक्या सजीव साकारल्या आहेत की प्रेक्षक क्षणभर वास्तव आणि अभिनयातील सीमारेषा विसरून जातात. सावित्रीआईंच्या भूमिकेत ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, तीने एक समजूतदार, प्रगल्भ, झुंजार आणि करुणामयी स्त्रीचे दर्शन घडवले आहे.
या दोन्ही पात्रांमध्ये एक सुसंवाद, परस्पर सन्मान, आणि समाजासाठीची बांधिलकी सतत जाणवत राहते. हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. त्यामुळे ‘फुले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक नव्हे, तर अत्यंत भावनिक, विचारप्रवर्तक आणि परिवर्तनकामी आहे.
या चित्रपटाचा उपयोग शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी अवश्य करावा. ‘फुले’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवला गेला पाहिजे. कारण तो केवळ मनोरंजनासाठी नाही, तर शिक्षणासाठी आणि मूल्यशिक्षणासाठी एक प्रभावी साधन ठरू शकतो. आजच्या मुलांना ‘रिअल हिरो’ कोण होते, याची जाणीव होणे फार गरजेचे आहे समाजात जर बदल घडवायचा असेल तर तो केवळ आंदोलनांनी नाही, तर विचारांच्या पुनरुज्जीवनाने घडतो. ‘फुले’ हा चित्रपट अशा नवचैतन्याचा उद्गाता आहे. सत्यशोधक चळवळ, महिला मुक्ती, सामाजिक समतेसाठी फुले दांपत्याने केलेले कार्य पाहता हे लक्षात येते की परिवर्तनासाठी केवळ शाब्दिक घोषणा नाही, तर कृती आणि समर्पण हवे असते. ‘फुले’ हेच शिकवतो.
फुले दांपत्याचे आयुष्य म्हणजे एक आदर्श जीवनपद्धती आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनालाही सामाजिक बांधिलकीत गुंफले. ‘फुले’ चित्रपट पाहून अनेक कुटुंबांमध्ये या मूल्यांची रुजवणूक होईल. स्त्री-पुरुष समानतेपासून ते मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी या चित्रपटातून प्रेरणा घेऊन समाजामध्ये नवसंस्कार होऊ शकतात.
आज जेव्हा समाज पुन्हा जातीयवाद, धार्मिक अंधश्रद्धा, आणि परस्पर तेढ याकडे झुकतो आहे, तेव्हा ‘फुले’ चित्रपट ही एक सामाजिक औषधी ठरते. ती समाजाच्या जखमांवर फुंकर घालते आणि म्हणते – “उठा, जागे व्हा, आणि विचाराचा प्रकाश पसरवा.”
या चित्रपटाचा प्रभाव इतका खोल आहे की प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत आणि प्रत्येक शाळेत तो पोहोचवणे हे आपण सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ‘फुले’ ही केवळ फिल्म नाही – ती एक वैचारिक चळवळ आहे. आणि या चळवळीचा प्रचार, प्रसार करणं हे आपल्या सर्व पुरोगामी नागरिकांचे कर्तव्य आहे.
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग, क्रांती आणि विचारांना चित्ररूपात अनुभवण्याची ही संधी आपल्याला ‘फुले’ चित्रपटात मिळते. समाजमनाला स्पर्श करणारी आणि अंतर्मन जागवणारी ही कलाकृती आपण सर्वांनी पाहावी, इतरांना दाखवावी आणि यातील विचारांचा अंगीकार करावा.
यातून आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा सापडेल. ‘फुले’ पाहणं म्हणजे आपलं वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भतेकडे टाकलेलं एक पाऊल आहे.
‘फुले’ – एक चित्रपट नव्हे, एक चळवळ!
-जय ज्योती – जय क्रांती

सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here