भडगाव (माधव जगताप) : भडगाव शहराचा प्रमुख ओळखचिन्ह व ऐतिहासिक वास्तू मानला जाणारा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगरदेवळा दरवाजा, हा सुस्थितीत असतानाही अनाकलनीय कारणांमुळे नुकताच पाडण्यात आला. या दरवाजाचे शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीशी थेट नाते असल्याने या दरवाजाच्या जागी नव्याने भव्य आणि उंची देऊन प्रवेशद्वार उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या दरवाज्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने “हिंदवी स्वराज्य प्रवेशद्वार” असे नामकरण करण्यात यावे, असा ठराविक आग्रहही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही मागणी माजी नगरसेविका योजना पाटील, माजी गटनेते शंकर मारवाडी, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, जिल्हा युवाधिकारी माधव जगताप, तालुका युवाध्यक्ष चेतन पाटील, शहर संघटक जिभाऊ महाजन, उपाध्यक्ष भैय्या राजपूत, शहराध्यक्षा मनिषा पाटील, शहर युवाध्यक्ष चेतन पाटील, युवक संघटक रोनित अहिरे, उपाध्यक्ष यश पाटील, युवा संघटक यश महाजन, करण राजपूत, समन्वयक भुषण देवरे, सह समन्वयक सत्यजित पाटील, जेष्ठ नागरिक पंडित पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील आदींनी संयुक्तरित्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आस्थापना विभाग प्रमुख राहुल साळुंखे यांच्याकडेही निवेदन सादर करून प्रशासनाला या विषयावर जागरूक करण्यात आले.
या ऐतिहासिक दरवाजाच्या जागी उभारण्यात येणारा नवीन दरवाजा केवळ एक स्थापत्य निर्मिती नसून तो शहरवासीयांसाठी गौरवाचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा द्योतक ठरेल, असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न ठरेल, असे सांगून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहराच्या तरुणाईला यामधून प्रेरणा मिळावी ही भावना निवेदनात अधोरेखित केली.
या प्रमुख मागणीसोबतच शहरातील इतर अनेक मूलभूत नागरी समस्या व गरजांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरात संपूर्णपणे स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात यावी, यासाठी पालिकेने तात्काळ नियोजन करून ती प्रत्यक्षात उतरवावी, अशी मागणी केली गेली. तसेच जुना पारोळा रोडवरील पूनम हॉटेल ते सुर्यवंशी डेअरी आणि नाचनखेडा रोड न. प. हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरवस्था असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी, मजबुतीकरण व सुधारणा करावी, अशीही विनंती केली गेली.
शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या समस्येने नागरिक हैराण झाले असून, वाहतुकीला अडथळा, अपघातांची शक्यता, तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषदेने या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करावी, असा ठाम सूर यावेळी व्यक्त झाला.
नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात वापरले जाणारे
“संडास व गटारींच्या सफाईसाठी वापरले जाणारे व्हॅक्युम सक्शन टँकर अद्यापही निकृष्ट स्थितीत असून…”
अनेक ठिकाणी सफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. यामुळे शहरात दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. त्यामुळे तातडीने टँकरची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच सफाई व्यवस्था नियमित व सुरळीत करण्यात यावी, अशी विनंती निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे.
शहराच्या काही भागांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाच्या वेळी अनेक ठिकाणी जुनी पाइपलाइन तुटली असून, ढापे उघडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे आणि रस्त्यांवर चिखल व अस्वच्छता पसरली आहे. या सर्व ढाप्यांची तातडीने दुरुस्ती करावी, गळती थांबवून शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी ठोस योजना तयार करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, फाइलेरिया यांसारख्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी पुढे आली. नगरपरिषदेने या संबंधाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असा इशाराही देण्यात आला. या निवेदनाच्या माध्यमातून केवळ एका प्रवेशद्वाराच्या पुनर्बांधणीची मागणी न करता शहराच्या सर्वांगीण विकासाचा, जनतेच्या गरजांचा आणि भविष्यकालीन स्वच्छ, आरोग्यदायी भडगाव घडवण्याचा विचार या नेतृत्वाने पुढे मांडला आहे. शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून साकार झालेली ही भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची असून, शहरासाठी जिव्हाळ्याची आहे. प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलावीत, हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.