नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) :
देशात आणीबाणी लागू होऊन आज २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते संबंधितांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेटे, उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर, रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेले नागरिक व त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या आणीबाणी विशेष छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी शर्मा व अन्य मान्यवरांनी केली.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, “अशा उपक्रमांद्वारे लोकशाही अधिक बळकट होते. ज्यांनी त्या काळात अन्यायाविरुद्ध आवाज उठवून कारावास भोगला, त्यांचा गौरव म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान आहे.” त्यांनी सांगितले की, लोकतंत्र सेनानी संघाच्या मागण्या राज्य शासनाकडे पाठवण्यात येतील. यावेळी त्यांनी आणीबाणीतील तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात राज्य शासनाने दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले.
कार्यक्रमात श्री. शेटे, भानुदास येवला, दिनकर देशमुख, जयश्री कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार, दामोदर गौरकर आदींनी मनोगते व्यक्त करताना सांगितले की, आणीबाणी ही लोकशाहीसाठी गंभीर धक्का होता. त्याकाळी अनेकांनी सत्याग्रह केला, तुरुंगवास भोगला, आणि संविधानाचा दुरुपयोग थांबवण्यासाठी संघर्ष केला. परिणामी, १९७७ मध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.
या सोहळ्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संवेदनशीलतेचे उदाहरण ठेवत, मुख्यमंत्री सहायता कक्षात थांबलेल्या वयोवृद्ध धुंडिराज होनप यांचा स्वतः तेथे जाऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले, तर आभारप्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे यांनी केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.