पाचोरा – महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम घडविणारे उपविभागीय पोलिस अधिक्षक श्री. धनंजय येरूळे यांचा सेवापुर्ती सोहळा दिनांक 01 जुलै 2025 रोजी मंगळवार, सायंकाळी 5 वाजता, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील आशिर्वाद हॉलमध्ये अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडणार आहे. धनंजय येरूळे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील कारेपूर या लहानशा खेड्यात झाला. तेथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील कृषी व्यवसायासोबत कापड दुकान चालवत होते. अशा साध्या आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या येरूळे यांनी शिक्षणाला सर्वस्व मानले. त्यांनी बी.एस्सी. (अॅग्रीकल्चर) या कृषी विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर व्यवस्थापनातील एम.बी.ए. (पी.बी.एम.) ही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतरही शिक्षणप्रेम कायम ठेवत, सेवानिवृत्तीनंतर एल.एल.बी. (कायद्याचे शिक्षण) घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. दि. 11 जून 1990 रोजी महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलिस अकादमीत (Maharashtra Police Academy – MPA) कडक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर येरूळे यांची प्रशासकीय प्रवासाला अमरावती जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यानंतर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर (शहर व ग्रामीण), धुळे, मुंबई आणि जळगाव यासह अनेक जिल्ह्यांत त्यांनी कार्यरत राहत प्रशंसनीय सेवा दिली. 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात पोलिस विभागाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना, त्यांची शिस्तप्रियता, कार्यक्षमता, सजगता आणि मानवी मूल्यांशी निष्ठा ही नेहमीच उजळून निघाली. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाकडून तब्बल 175 वेळा विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये विभागीय सन्मान, जिल्हास्तरीय गौरवपत्रे, आदर्श पोलिस अधिकारी म्हणून गौरव आणि अनेक प्रशस्तीपत्रांचा समावेश आहे. पोलिस सेवा ही वेळेची, प्रसंगांची आणि मानसिक क्षमतेची कसोटी असते. परंतु येरूळे साहेबांनी या कठीण प्रवासात आपल्या कुटुंबावरदेखील तितकेच लक्ष दिले. त्यांच्या मुलाने आय.आय.टी. इंजिनियर होण्याचा मान मिळवला असून, कन्या आय.टी. इंजिनियर होऊन सध्या एल.एल.बी.चे शिक्षण घेत आहे. मुलाबाळांचे हे शैक्षणिक यश म्हणजे येरूळे कुटुंबातील मूल्यांची आणि मार्गदर्शनाची साक्ष आहे. धनंजय येरूळे यांची शेवटची सेवा पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून होती. त्यांनी येथे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत, गुन्हेगारी रोखण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि अचूक निर्णयक्षमतेचा लाभ पाचोरा विभागाला मिळाला. सेवाकालात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत गुन्हेगारांना न्यायप्रविष्ट केलं. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविल्या आणि शाळा-कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या विषयी स्थानिक नागरिकांमध्ये आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला आहे. दिनांक 01 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला सेवापुर्ती सोहळा हा केवळ निवृत्तीकडे झुकलेल्या अधिकाऱ्याचा कार्यक्रम नसून, एका स्फूर्तिदायक कारकिर्दीचा गौरव आहे. या सोहळ्यात विविध अधिकारी, सहकारी, स्थानिक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा, स्मृतीचित्रफीत, प्रशस्तीपत्रे, आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे. सेवानिवृत्तीनंतर देखील ते एल.एल.बी.चे शिक्षण घेऊन समाजाच्या न्यायव्यवस्थेत योगदान देण्याचा मानस बाळगतात. त्यांच्या अनुभवाचा उपयोग कायद्याच्या क्षेत्रात तसेच सामाजिक मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. उपविभागीय पोलिस अधिक्षक धनंजय येरूळे यांची सेवा म्हणजे एका सामान्य कुटुंबातील तरुणाच्या असामान्य वाटचालीची प्रेरणादायी कहाणी आहे. शिक्षण, कर्तव्यनिष्ठा, कुटुंबप्रेम आणि समाजभान यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या या 35 वर्षांच्या यशस्वी प्रवासाला पाचोरा व समस्त जिल्हावासीयांकडून सलाम!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.