रावेर — महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कायद्याची जाणीव पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य सातत्याने सुरू आहे. या उपक्रमांचा प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रावेर तालुका विधी सेवा समितीच्या कार्याचा विस्तार होत असताना समाजसेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड समितीमार्फत केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून निंबोल (ता. रावेर) येथील सतीश श्रीराम पाटील उर्फ भाऊ यांची ‘पी.एल.व्ही.’ म्हणजेच प्यारा लीगल वॉलेंटियर म्हणून सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश तथा न्यायिक दंडाधिकारी रावेर असून सचिव पदावर तालुका कायदेशीर सेवा प्राधिकरण रावेरचे अधिकारी कार्यरत आहेत. समितीत वकील संघाचे सदस्य, पोलीस स्टेशन रावेर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पोस्ट ऑफिस येथील अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट असून, विविध कायदेविषयक उपक्रम या समितीद्वारे राबवले जातात. या उपक्रमांत नालसा अंतर्गत ‘न्याय जागृत नागरिक अभियान’, ‘ग्रासरूट इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह’, शाळा व महाविद्यालयांमध्ये पॉक्सो कायद्याविषयी जनजागृती, दुर्गम व आदिवासी भागांतील कायदेविषयी शिबिरे, महिलांवरील घरगुती हिंसाचारविषयी जनजागृती आणि सुरक्षितता सत्र, बालकामगारांविरोधात विशेष मोहिमा, वंचित पार्श्वभूमीतील महिला व त्यांच्या कुटुंबातील कैद्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम, तसेच गरीब व गरजू लोकांसाठी मोफत कायदेविषयक सेवा देण्याचे महत्त्वाचे कार्य या समितीद्वारे होत आहे. याशिवाय राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून विविध प्रलंबित प्रकरणांत सलोख्याने वाद मिटवण्याचे कार्यही या समितीमार्फत प्रभावीपणे पार पडते. २०१८ पासून केरहाळे बु. येथील सौ. वर्षा प्रवीण पाटील या ‘पी.एल.व्ही.’ म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच धर्तीवर निंबोल येथील सतीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजसेवेतील त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, गरीब व वंचितांसाठी राबवलेले उपक्रम, महिलांसाठी केलेले कार्य, युवकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न, आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील त्यांचा सहभाग या सर्वांचा गौरव करत विधी सेवा समिती रावेर न्यायालयाने त्यांना या प्रतिष्ठित पदावर नियुक्त केले आहे. यासंदर्भात सतीश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही नियुक्ती केवळ सन्मान नसून ती सामाजिक जबाबदारी आहे असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, यापुढे परिसरातील गोरगरीब, पीडित व गरजू लोकांना कायदेशीर सेवा व सल्ला देण्यासाठी आपले प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील. न्यायव्यवस्थेच्या दारी शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहचवण्याचा आपला संकल्प आहे. याप्रसंगी तालुक्यातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वकिल मंडळी, पोलीस अधिकारी व ग्रामस्थांनी सतीश पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी कार्य करत असताना अशा सन्माननीय व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून आपण सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने हे कार्य सातत्याने करत राहणार असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.