पाचोरा – शहरातील ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, तसेच धार्मिक आणि सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले स्व. कै. काकासाहेब बाळासाहेब चिंतामण पुजारी यांचे आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी पहाटे 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. कै. काकासाहेब बाळासाहेब पुजारी हे एक सामाजिक जाणिवा असलेले आणि मनापासून लोकांच्या मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व होते. ते यापूर्वी जामनेर रोडवरील मिरॅकल मेडिकलचे संचालक तसेच पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मेडीकल व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक कार्यात देखील आपली ठसा उमटवलेला आहे.
त्यांचे सुपुत्र प्रशांत पुजारी हे देखील पाचोरा शहरात अत्यंत सक्रिय असून, श्री आनंद वृद्धाश्रमाचे माजी अध्यक्ष, पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि श्री गुरुदत्त मंदिराचे संचालक (पूर्ती फॅमिली शॉप, भडगाव रोड) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी समाजसेवेसाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.
कै.काकासाहेब बाळासाहेब पुजारी यांनी आपल्या आयुष्यात वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता, तो एक सेवाभाव समजून रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. गरजू रुग्णांना औषधोपचारात मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता ठेवून लोकांचा विश्वास मिळवणे, हे त्यांच्या कार्याचे मूळ तत्त्व होते.
ते केवळ मेडिकल क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही सक्रिय होते. पाचोऱ्यातील श्री गुरुदत्त मंदिर हे पवित्र स्थळ त्यांच्या सहकार्याने अधिक सुसज्ज आणि सुव्यवस्थित करण्यात आले. मंदिर समितीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. भक्तांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
तसेच श्री आनंद वृद्धाश्रम या संस्थेशी त्यांचे कुटुंब गेली अनेक वर्षे निगडीत असून वृद्धांसाठी सेवाभावाने काम करण्याची परंपरा त्यांनी जपली. या वृद्धाश्रमातील वृद्धांना औषध, वैद्यकीय तपासणी, आणि गरजेच्या सेवा पुरवण्यात ते नेहमी पुढे होते.
आज त्यांचे निधन झाल्याने पाचोरा शहराच्या मेडीकल, धार्मिक व सामाजिक वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा समाजाभिमुख व्यक्तीचे आयुष्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 2 जुलै 2025 रोजी बुधवार सकाळी 8.30 वाजता त्यांचे राहते घर, दत्त मंदिर, पुजारी नगर, भडगाव रोड, पाचोरा येथून निघणार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध संस्थांचे पदाधिकारी, वैद्यकीय व्यवसायातील सहकारी, धार्मिक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या राहत्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी दाखल झाले.शहरातील अनेक ज्येष्ठांनी त्यांच्या आठवणी सांगताना भावूक होत ‘बाळासाहेब म्हणजे शांत, संयमी आणि अंतर्बोध असलेली व्यक्ती होती. त्यांनी नेहमीच इतरांचे दुःख समजून घेत, मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या जाण्याने शहर एक चांगला मार्गदर्शक गमावला आहे,’ असे मत व्यक्त केले.
शोकसंदेशात पाचोरा मेडिकल असोसिएशन, श्री आनंद वृद्धाश्रम, गुरुदत्त मंदिर समिती, पाचोरा व्यापारी असोसिएशन, तसेच शहरातील विविध मंडळांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.
पुजारी कुटुंबियांनी आपल्या दुःखावर संयम ठेवत येणाऱ्या सर्व नातेवाईक व हितचिंतकांचे योग्य रीतीने स्वागत केले असून, अंत्यविधीच्या सर्व तयारी शांततेत आणि शिस्तबद्ध रितीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती परिवारातर्फे देण्यात आली.त्यांच्या पश्चात एक मुलगा , सुन पाच मुली , जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. संपूर्ण कुटुंब आपल्या वडिलांच्या कार्याला पुढे नेत असून, ‘समाजासाठी कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली’ पुजारी परिवाराची होय

ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.