“स्वागताच्या फुलां मधले काटे – पोलीस निरीक्षक पवारांसमोर जुन्या कलेक्शनच्या सावल्यांची नवी परीक्षा”

पाचोरा – शहरात नुकत्याच घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले. शहराच्या मध्यवर्ती भागात, बसस्थानकाजवळ भरदिवसा गावठी कट्ट्याने गोळी झाडून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासनाची प्रतिमा डागाळली. परिणामी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री रेड्डी साहेबांनी सध्या सुरू असलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेऊन त्याचे पडसाद विधानसभा गृहात उमटायला नको म्हणून कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत तत्काळ हालचाल करत पाचोरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवनियुक्त पोलीस निरीक्षक म्हणून राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुलकुमार पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राज्यातील पोलिस खात्यात ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास शहरवासीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर झुंज वृत्तपत्र आणि ‘ध्येय न्यूज’ परिवारातर्फे त्यांचे स्वागत करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते. शहरात नव्याने आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे स्वागत मोठ्या थाटामाटात होते. अनेक सामाजिक संस्था, राजकीय मंडळी, स्वयंघोषित पत्रकार व कार्यकर्ते आणि तथाकथित समाजसेवक बुके घेऊन धावत येतात. परंतु हे बुके आणि त्यामागची हेतूशुद्धता तपासणे अधिक महत्त्वाचे ठरते. हेच बुके कधी काटेरी ठरू शकतात स्पेशली पाचोरा पत्रकारांच्या बाबतीत सांगायचे झाले तर अधिकृत पत्रकारां पेक्षा वेब न्यूज यूट्यूब च्या नावाने एकापेक्षा अनेक संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक विभागीय संपादक मंत्रालय प्रतिनिधी असे एक ना अनेक पत्रकार कार्यरत आहेत ज्यांना शुद्ध मराठी लिहिणे तर सोडाच परंतु बोलता सुद्धा येत नाही असे लोक संघटनेच्या नावाने जास्त गर्दी करून माझ्या मागे किती पत्रकार आहेत याचा प्रभाव निर्माण करतात याचे उदाहरण माजी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कार्यकाळाने दिले. म्हणून राहुलकुमार पवार यांनी या स्वागताच्या गोडगोडपणामागील संभाव्य धोके ओळखून फसव्या लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पाचोरा शहरात ३८ प्रकारच्या अवैध धंद्यांची खुलेआम वसुली माहिती सर्वश्रृत आहे. या ठिकाणी विविध स्वरूपाचे अवैध धंदे — गुटखा, मटका, दारू, सट्टा, जुगार, लाकूड, जिलेटीन कांडया, पोटली , लॉजवरील चद्दर बदल व्यवसाय इत्यादींचा सुळसुळाट असून, या सर्वांवर केवळ बघ्याची भूमिका पोलीस घेत असल्याची तक्रार आहे. या धंद्यांवर म्हणजेच कलेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ‘कलेक्टर’ निर्माण करण्याची घातकी स्पर्धा पोलीस खात्यात सुरू झाली होती. हेच गटबाजीचे वसुलीकरण निरीक्षक अशोक पवार यांच्या मनोबलाचे खच्चीकरण करणारे ठरले. त्यामुळे राहुलकुमार पवार यांच्यासाठी सर्वप्रथम हे गटीयकरण मोडून टाकून, कोणत्याही एका गटास पाठबळ न देता निष्पक्ष आणि कडक धोरण अंगीकारणे गरजेचे आहे. कारण या पोलीस स्टेशनला सर्वसामान्य नागरिक तर सोडाच परंतु चक्क पोलिसाच्या निर्दोष मुलाच्या प्रकरणात देखील तब्बल 30000 घेण्याचा प्रकार झालेला आहे.वास्तविक पाचोऱ्याचा अवैध धंद्यांचा इतिहास एखाद्या जुन्या पुस्तकासारखा आहे. पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या अवघ्या २५ फुटांवर धंदे ‘गुण्यागोविंदाने’ चालत होते. मात्र, एक काळ असा होता की गुंड आणि दलाल छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतसुद्धा फिरकत नसत. डि बी पोलीसांना पाहून गुंडांना व अवैधधंदे वाल्यांना बिळात शिरायला सुद्धा डी बी पथकाच्या एखाद्या पोलीसाची गाडीची एक चक्कर पुरेशी ठरत होती .त्या काळात पोलीस म्हणजे दादा होते आणि गुंड म्हणजे भयभीत उंदीर. पण मागील काही वर्षांत मात्र हे चित्र पूर्णतः उलटले. गुंड, दलाल आणि अवैध धंदेवाल्यांचा पोलीस स्टेशनमधील प्रवेश चक्क चहापाणी व स्नेहसंमेलन करण्यात वाढला. सामान्य माणसाला एन सी देताना व झाल्यावर सुद्धा खिशाला लागणाऱ्या पैशाची तजवीज करावी लागत होती. ही स्थिती बदलण्याची पूर्ण जबाबदारी आता राहुलकुमार पवार यांच्यावर आहे. याच पाचोरा पोलिस स्टेशनला तब्बल सहा महिने निरीक्षक नव्हते. मात्र त्या काळात पीएसआय श्री चौबे आणि चार ते पाच पोलिसांच्या चोख कर्तव्य भावनेमुळे पोलिसिंग यंत्रणा विस्कळीत झाली नाही. उलट एक आदर्श निर्माण झाला की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीतही जबाबदारीने काम करता येते. चौबे यांचा हा काळ राहुलकुमार पवार यांच्यासाठी एक आरसा ठरावा, की जबाबदारी घेणारे हात कमी असले तरी निर्णयक्षम नेतृत्व असले पाहिजे. “First impression is the last impression” या उक्तीप्रमाणे पोलीस निरीक्षक पदी रुजू होताचच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची पुनर्बहाली करण्याचे ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. खास करून खालील मुद्दे पवार यांनी प्राधान्याने हाती घ्यावेत: पाचोरा शहरातील “लातो के भूत,बातो से नही मानते. हे धोरण गुन्हेगारांबाबत स्वीकारून गुंडांचे अवैध धंद्यांचे सर्वेक्षण करून ते मुळासकट नष्ट करणे, डी बी, ट्राफीक,महिला दक्षता पथकाला स्वतंत्र कार्यक्षमता आणि अधिकार देणे, पोलीस स्टेशनमधील गटबाजी – भ्रष्टाचारी वृत्तीचं निर्मूलन, सामान्य नागरिकांच्या तक्रारी विनाअडथळा नोंदवल्या जातील, याची हमी, कोणत्याही गटाच्या दडपणाशिवाय पोलीस यंत्रणा पारदर्शक ठेवणे. राहुलकुमार पवार यांच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. पाचोऱ्याचा कायदा-सुव्यवस्थेचा इतिहास नव्याने लिहण्याची. भ्रष्ट आणि गुन्हेगारी नशेच्या विळख्यातून पिढ्या वाचवण्याची. लोकांचा पोलीसांवरील विश्वास पुन्हा जागवण्याची. जे पूर्वीच्या अधिकाऱ्यांना अपयश ठरले, ते आपण यशस्वी करू शकतो, हा आत्मविश्वास ते दाखवतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’ परिवारातर्फे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मन:पूर्वक स्वागत करताना, शहराच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कार्यकाळात क्रांतिकारी बदल घडून यावेत, हीच अपेक्षा आहे. स्वागताच्या बुकेसह यावेळी शहरवासीयांची विश्वासाची फुलं त्यांच्या पायाशी असोत, जी काटे बनून पुन्हा कुणालाही दुखावणार नाहीत.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here