पाचोरा – तालुक्यातील नांद्रा परिसरात अवैध धंद्यांचे जाळे आणि जुलमी खाजगी सावकारी दररोज कित्येक निष्पापांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. याच अन्यायकारक व अमानवी व्यवस्थेला कंटाळून प्रेम टी चे मालक राजू बडगुजर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू बडगुजर हे मानसिक तणावात असून, आज त्यांनी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळांवर जाण्याचा धोकादायक निर्णय घेतला. मात्र वेळेवर रेल्वे आली नाही त्यापुर्वीच तेथे पोहचुन त्यांच्या मित्रमंडळींनी हस्तक्षेप केल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांचा जीव सध्या तरी वाचलेला आहे. तथापि, “काहीही झालं तरी मी आत्महत्या करणारच!” असा निर्धार त्यांनी मोबाईल फोनवरून पत्रकार संदीप महाजन यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी आपली वेदना आणि सामाजिक अन्यायांविषयीचा रोष व्यक्त करताना, एक ऑडिओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या क्लिपमध्ये त्यांनी पाचोरा-जळगाव मार्गावरील नांद्रा परिसरात सुरु असलेल्या अवैध धंदे, पत्त्याचे क्लब, आणि लोकांना लुबाडणाऱ्या साखळ्यांबाबत आपबीती कथन केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हे सर्व बंद न झाल्यास अशा लोकांना गंडवण्याच्या विळख्यात अनेकजण अडकणार, आणि ते शेवटी माझ्यासारखीच जीवन संपवण्याची वेळ आणतील.” राजू बडगुजर यांनी आपल्या ऑडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी आर्थिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्त्याच्या क्लबमधून त्यांना खोट्या आश्वासनांवर फसवण्यात आले. सततच्या नुकसानीतून त्यांना कर्ज घ्यावे लागले, आणि खाजगी सावकारांनी वसुलीसाठी जी अमानुष वागणूक दिली, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडले आहे. या क्लबमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या खेळात केवळ जुगारच नाही, तर मानसिक आणि आर्थिक शोषण देखील होत असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. “कधी पैसे जिंकायला देतात आणि क्लबमध्ये बाहेरगावचे “करू” ( पत्ते लावणारे ) आणुन मग हळूहळू सर्व काही गमवायला लावतात. नंतर सावकारांचे कर्ज, धमक्या, समाजात अपमान… आणि शेवटी आत्महत्या हा एकच मार्ग उरतो,” असे त्यांनी विदारक स्वरात सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या सावकारी धंद्यात एक विशिष्ट महिलांची टीम कार्यरत असून कर्ज वसुलीसाठी आणि कोणत्याही स्तरावर जाऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याने बदनामीच्या धाकाने कर्जदार अवाजवी चक्क तासाचे व्याजदर देऊन बरबाद होत आहे. राजू बडगुजर यांची ही ऑडिओ क्लिप आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, संपूर्ण पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तरुणांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, “राजूच्या आत्महत्येला जबाबदार कोण?” असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे. काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून अवैध पत्त्याच्या क्लब व खाजगी सावकारांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याच क्लब व इतर अवैध धंद्यांविरोधात माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांनी यापूर्वीच आवाज उठवलेल होता. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करत हे प्रकार त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळे पासुन आज पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाल्याचे आजपर्यंत निदर्शनास आलेले नाही. ललित वाघ यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी सातत्याने या अवैध क्लब्सविरोधात बोललो आहे. त्याच वेळी जर उपाययोजना झाली असती, तर आज राजू बडगुजरसारखा तरुण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला नसता.” खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जावर मोठ्या व्याजदराने वसुली केली जाते. केवळ जास्तीचे पैसेच नाही तर अपमानास्पद वागणूक, धमक्या आणि घरपोच त्रास देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी, लघुउद्योगिक, व्यापारी वर्गासोबतच सामान्य मध्यमवर्गीय नागरिकही या जाचाला कंटाळले आहेत. राजू बडगुजर यांच्यासारखे अनेक जण आपल्या वेदना उघडपणे व्यक्त करत नाहीत, पण आतून रोज मरत असतात. या प्रकरणाने फक्त एक युवक नव्हे, तर समाजातील अनेक थरांतील मनोबल खचलेल्या तरुणांचा आवाज ऐकायला हवा, हे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पाचोरा शहरातील सुजाण नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि युवकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की नांद्रासह परिसरातील पत्त्याचे क्लब व इतर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत, खाजगी सावकारांवर कारवाई करून त्यांचे व्यवहार तपासण्यात यावेत, राजू बडगुजर यांच्याशी समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार द्यावा, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी संयुक्त तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत. राजू बडगुजर हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर समाजाच्या विस्कळीत व्यवस्थेचे एक भयंकर वास्तव दर्शवणारे उदाहरण आहेत. जेव्हा एका सामान्य व्यावसायिकाला आपली व्यथा जगासमोर मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो, आणि तरीही त्याला न्याय मिळेल की नाही याची शंका राहते, तेव्हा लोकशाहीच्या यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. राजू यांनी शेवटी एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हटले: “काहीही झालं तरी मी आत्महत्या करणार!” हे केवळ शब्द नाहीत, तर एका खचलेल्या मनाची किंकाळी आहे. जर ही किंकाळी आज ऐकली गेली नाही, तर उद्या किती राजू बडगुजर आत्महत्या करतील, याचा हिशोब ठेवणेही अशक्य होईल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.