पिंपळगाव (हरेश्वर) येथील मातापिता गोशाळेच्या वतीने शुद्ध देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेनुसार मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशी गायीच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि तिच्या संगोपन व संवर्धनाच्या उद्देशाने हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा व भावनेने साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमामागे समाजात गोवंशाबाबत आदरभाव, संवेदनशीलता आणि जागरुकता वाढवण्याचा हेतू आहे. महाराष्ट्र शासनाने गायीस ‘राज्यमाता’ गोमाता म्हणून घोषित केले असून दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून पाळण्यात यावा, असा निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ⭐नामदार पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे. त्या निर्णयानुसार व प्रेरणेतून या वर्षीही गावोगाव विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. पिंपळगाव (हरेश्वर) येथील मातापिता गोशाळेच्या वतीनेही सदर दिनाचे औचित्य साधून गोवंश रक्षण आणि गोमातेच्या पूजनाचे धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असे आयोजन केले गेले आहे. ✨या कार्यक्रमाचे शुभहस्ते ह.भ.प. शिवानंदजी महाराज, संस्थानाधिपती गोविंद मंदिर संस्थान पिंपळगाव हरे. हे करणार असून त्यांनी सर्व गोभक्त, ग्रामस्थ, धर्मप्रेमी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले मा. आमदार दिलीप ओंकार वाघ तसेच विद्यमान आमदार पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मा. आमदार किशोरआप्पा पाटील हे कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला पिंपळगाव-शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा. मधुकर सुकदेव काटे, माजी पंचायत समिती सदस्य मा. विजय कडू पाटील, वाणेगाव तांडा येथील ह.भ.प. लक्ष्मणजी पवार, कवली येथील सरपंच मा. वसंत सांडू बनकर तसेच बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समस्त गोरक्षक यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे स्थळ माता-पिता गोशाळा, कवली ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर असे असून ग्रामस्थांच्या व विविध संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. गोमातेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. तिच्या प्रत्येक अंगा-खांद्याला पूजनीयत्व प्राप्त असून तिच्या शेण, दूध, गोमुत्र आदी गोवस्तूंचे आरोग्य व पर्यावरण रक्षणात उपयोगी योगदान आहे. अलीकडील काळात देशी गोवंशावर संकटांची छाया वाढली आहे. अशा वेळी शुद्ध देशी गायींच्या संगोपनासाठी समर्पित संस्थांची गरज आणि अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये गोरक्षणाविषयी आदर व कृतज्ञतेची भावना जागृत होणार असून त्यातून अनेक तरुण गोरक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मातापिता गोशाळेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमासाठी व्यापक निमंत्रण देण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोमातेसमवेत पूजनात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर गोमातेचे पारंपरिक पूजन, प्रवचन, आरती तसेच गायींच्या संगोपनासंदर्भातील मार्गदर्शनपर सत्रही आयोजित करण्यात येणार आहे. गोरक्षक व स्वयंसेवकांसाठी विशेष सन्मान समारंभाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार असून गोशाळेतील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे. गोमातेच्या रक्षणासाठी शासन, संस्था आणि ग्रामस्थ एकत्र येऊन ठोस कार्यवाही करत आहेत हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य असून ‘गोरक्षण हे राष्ट्ररक्षण’ या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव सध्या सज्ज झाला आहे. उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तासाठी हा दिवस गोमातेसमवेत साधना, सेवा व श्रद्धेचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.