![]()
पाचोरा – अपार कष्ट, प्रामाणिकपणा, निष्ठा, आत्मिक विश्वास आणि सातत्याने परिश्रमाची तयारी असलेला एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमच्या परिवाराचा हिस्सा मिली उर्फ मिलिंद भास्कर सोनवणे.( Mo 9403018877 ) पत्रकारिता या क्षेत्रात अवघड वाटा पार करत, स्वतःच्या मेहनतीवर आणि संयमावर विश्वास ठेवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तीने केवळ शब्दांची धारच नाही, तर जगण्याची एक वेगळी शैली समाजापुढे ठेवली आहे. आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे आणि सन्मानामागे आपल्या माता-पित्यांचे, बहिणीचे, नातेवाईकांचे आणि सर्व स्नेहीजनांचे मोलाचे सहकार्य व उपकार आहेत, याचे सदैव भान बाळगणारा हा युवक म्हणजे ‘मी अनुभवलेला मिलिंद’. अनेकांना आपली यशोगाथा सांगताना आपलेच योगदान मिरवायची सवय असते. पण मिलिंदच्या बाबतीत हे पूर्णपणे उलट आहे. तो नेहमीच म्हणतो, “माझे यश हे माझे नसून माझ्या घरच्यांचे, माझ्या मित्रांचे, आणि मला संधी देणाऱ्यांचे आहे.” असा नम्र स्वभाव, नम्रवृत्ती आणि आत्मपरीक्षणाची सवय असलेल्या मिलिंदने स्वतःचं आयुष्य केवळ निष्कलंक आणि निर्व्यसनीच ठेवलं नाही, तर समाजातील तरुणांसाठी एक आदर्श जीवनशैलीही निर्माण केली आहे. आज वाढदिवसाच्या या खास दिवशी त्याचे हे सारे गुण पुन्हा एकदा स्मरणात आणावेसे वाटतात. मिलिंदचे बालपण आर्थिकदृष्ट्या फारच आव्हानात्मक होते. कोणत्याही कामाची लाज न बाळगता, किंबहुना लोटगाडीवर हमालीचे काम करून वडिलांना हातभार लावला. पण अशा परिस्थितीतही त्याने कधीही मार्ग चुकवला नाही. अभ्यास, वाचन आणि लेखन यांची त्याला लहानपणापासूनच आवड होती. त्याचे लेखन हे मनातून उमटणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब होते. माझ्याकडे वृत्तपत्र मित्रांचे काम करीत असताना यातूनच पत्रकारितेकडे त्याचा कल वाढत गेला आणि मग त्याने एकदा अनेक वृत्तपत्रांच्या वितरण एजन्सी घेऊन या क्षेत्राला आपलेसे केले. स्थानिक समस्यांपासून ते सामाजिक विसंगतीपर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य करणारा, पण कुणाच्याही अपमानाशिवाय मुद्दा मांडणारा, असा तो निर्भीड पत्रकार म्हणून ओळखला जातो. मात्र पत्रकारितेचा मार्ग सोपा नसतो. चुकीचे आरोप, विरोध, सामाजिक दबाव यांचा सामना करताना त्याने कधीही तत्त्व सोडले नाही. अनेक प्रसंगी अपमानास्पद वागणूक मिळाल्यावरही त्याचा संयम ढळला नाही. त्याला नेहमी वाटते की, पत्रकार हा केवळ माहिती पुरवणारा नसून समाजाचा आरसा असतो. तो जर खोट दाखवेल, तर समाजात चुकीची दिशा निर्माण होईल. म्हणूनच, सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन गोष्टींवर तो कायम ठाम राहतो. मिलिंदचा आणखी एक गुण म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दलची अपार कृतज्ञता. तो आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्याचे श्रेय तो नेहमीच आपल्या आई-वडिलांना, बहिणीला व काकांना देतो. वडिलांनी लहानपणी केलेले कष्ट, आईची मायेची सावली यांच्यासोबतच घरात असलेले तीन शिक्षक काका, तलाठी पदावर कार्यरत असलेल्या काका यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, पाठबळ आणि जिवलग मित्रांचे मन:पूर्वक साथ – याला तो आपले भाग्य समजतो. प्रत्येक क्षेत्रात सहज यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कामात सातत्य, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी लागते. आणि मिलिंदने हे सर्व गुण आत्मसात केले आहेत. पण हे सांगताना तो स्वतःचा गौरव करत नाही, उलटपक्षी, तो स्पष्टपणे सांगतो की “मी आज पत्रकारितेत आणि माझ्या आयुष्यात जो काही यशस्वी आहे, त्यामागे जर कोणाचा खरा हात असेल, तर ते आहेत फक्त आणि फक्त संदीपभाऊ महाजन. त्यांनी माझ्या आयुष्यात क्षणा क्षणाला पाठबळ दिलं आहे.खरं सांगायचं तर,मी जीवन जगत असताना अनेकांच्या मदतीला धावून गेलो. कुणी अडचणीत असेल तर मदतीचा हात दिला, अनेकांना नव्या ओळखी, संधी, नातेसंबंध निर्माण करून दिले. उपकार मानावा, ऋण लक्षात ठेवावं, अशी साधी माणुसकीची अपेक्षा होती — पण अनुभव वेगळाच आला. ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांच्यासाठी केले त्यांच्यातील निम्म्याहून अधिक लोकांनी त्याची जाणीव ठेवण्याऐवजी पाठीतच खंजीर खुपसला. उपकाराच्या बदल्यात विश्वासघातच दिला. पण कदाचित माणुसकी, निष्ठा, कृतज्ञता हे गुण रक्तातच असावे लागतात.
वंदनीय भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व आशीर्वादाचा मिलींदवर प्रभावच आहे की, आज मिलींद सारखा ऋण मानणारा माणूस माझ्या आयुष्यात आहे. त्याच्या कृतीतून, नम्रपणातून आणि ऋणशीलतेतून हे समजतं — अजूनही काही माणसं सच्ची, मूल्यांवर जगणारी आहेत… आणि त्या माणसांसाठी हे सगळं करून झालं, याचं समाधान वाटतं! मिलिंदच्या आयुष्यात त्याच्या सहचारिणी कविता हिचा मोलाचा सहभाग आहे. अत्यंत कठीण काळातही तिने साथ दिली, आधार दिला आणि धीर दिला. मिलिंद नेहमी सांगतो की “माझ्या यशात माझी सहचारिणी कविता हिची साथ खूप मोलाची मिळाली. तीने माझी होती त्या परिस्थितीत साथ दिली आणि अजूनही ती साथ अविरतपणे सुरू आहे.” कधीही प्रसिद्धीचा गर्व न बाळगता तो सर्वसामान्य माणसासारखाच राहतो. साधेपणा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे त्याच्या जीवनाचे मूलभूत तत्त्व आहेत. ‘निर्व्यसनी जीवन’ हा आजच्या तरुणांसाठी केवळ शब्द झाला आहे. पण मिलिंदने ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखवली आहे. त्याचे बोलणे, वागणे, उठणे-बसणे यामध्ये एक शिस्त आणि गंभीरपणा जाणवतो. व्यसनमुक्त राहून त्याने स्वतःचा आत्मसन्मान जपला, आणि अनेक तरुणांनाही त्या दिशेने चालायला प्रेरणा दिली. आपल्या मित्रमंडळींमध्ये तो नेहमीच सकारात्मक उर्जा निर्माण करतो. कुणी अडचणीत असेल, संकटात असेल, तर मदतीसाठी तो प्रथम पुढे सरसावतो. त्याचा स्वभाव मदतीचा आहे, पण कधीही त्या बदल्यात काही अपेक्षा न ठेवणारा. आजच्या सोशल मीडियाच्या युगात लोक खोटं दाखवून प्रसिद्धी मिळवतात, पण मिलिंदने मात्र प्रामाणिकपणे सत्य मांडून आपली जागा निर्माण केली आहे. त्याच्या बातम्यांमध्ये भावनात्मक ओघही असतो, पण त्यात तथ्यालाही तितकेच महत्त्व असते. स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा जनहित त्याला अधिक प्रिय आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दल लिहिताना मला अभिमान वाटतो की, अशा एका गुणवान आणि विचारशील पत्रकाराशी माझा परिचयच नाहीतर तो माझ्या परिवाराचा एक सदस्य आहे. ‘मी अनुभवलेला मिलिंद’ हा केवळ पत्रकार नाही, तर एक सजग नागरिक, सच्चा निष्कलंक, आदर्श पुत्र आणि निष्ठावान माणूस आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात यश, आनंद, आरोग्य आणि समाधान कायम असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मिलिंदसारख्या तरुणांनी जर समाजाच्या विविध स्तरांमध्ये आपली भूमिका पार पाडली, तर समाज परिवर्तनाचा वेग निश्चितच वाढेल. जेव्हा तो समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि विसंगतीवर आवाज उठवतो, तेव्हा त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. म्हणूनच त्याचे बोलणे अधिक प्रभावी वाटते. तो समाजासाठी जगतो, समाजाच्या प्रश्नांवर झगडतो, म्हणून समाज त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याची ही प्रामाणिक झुंज, सत्याची वकिली आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली ही आपल्या देशाच्या पत्रकारितेच्या भविष्यासाठी एक आदर्श आहे. त्याच्यासारख्या तरुण पत्रकारांमुळेच भारतीय पत्रकारितेचा खरा चेहरा टिकून आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ या. वाढदिवसाच्या निमित्ताने, या प्रेरणादायी जीवनयात्रेला अधिक यशस्वी टप्पे लाभोत! परिश्रम, संयम, निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या बळावर तू आणखी मोठ्या यशशिखरावर पोहोचावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
Dhyeya News
सा. झुंज
संपादक संदीप दा. महाजन व परिवार, पाचोरा, जि. जळगाव
Mo. 7385108510
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






