![]()
पाचोरा शहरात एक अत्यंत मनमिळावू, सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच पुढे राहणारी, मदतीसाठी तत्पर आणि सेवाभावी वृत्तीची असामान्य व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेल्याचे दुःखद आणि काळजाला चटका लावणारे वृत्त… पाचोऱ्यातील ज्येष्ठ आणि जिंदादिल व्यक्ती म्हणून परिचित असलेले नितीनभाऊ शिवचंद राठी यांचे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी शुक्रवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पाचोरा शहरासह सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक आणि पारिवारिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पुत्र अनिकेत यांच्यासह संपूर्ण राठी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.नितीनभाऊ राठी हे केवळ नावापुरते नव्हे, तर आचार-विचार, कृती, संवाद आणि सेवाभाव यातून खऱ्या अर्थाने “राठी” कुटुंबाची प्रतिष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष उर्जा होती. कोणताही माणूस भेटला तरी त्याच्याशी आत्मीयतेने बोलणे, त्याच्या अडचणीत समजूतदारपणे मार्गदर्शन करणे आणि शक्य तितकी मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. ते नेहमी हसतमुख असायचे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असायचं – ज्यामुळे कोणीही त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकत असे.त्यांचे सामाजिक योगदानही उल्लेखनीय होते. कोणतीही समाजोपयोगी बाब असो, धार्मिक उत्सव असो वा एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीची गरज असो – नितीनभाऊ नेहमी सर्वप्रथम पुढे असायचे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि कोणतेही काम ही आपली जबाबदारी समजून पार पाडायचे. मदतीची अपेक्षा करणाऱ्याला ‘नाही’ हा शब्द त्यांच्या तोंडून कधीही ऐकायला मिळत नसे. समाजात आपले कार्य करताना त्यांनी कधीच प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही, तर आपल्या परोपकारी स्वभावातून अनेकांचे जीवन समृद्ध केले.पाचोऱ्यातील शिवचंद रामकिसन राठी कुटुंबातील नितीनभाऊ हे अनेक पिढ्यांपासूनची सामाजिक प्रतिष्ठा जपणाऱ्या घराण्याचे नाव होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या कष्ट, आदर्श आणि मूल्यांचा वारसा जपताना स्वतःच्या वागणुकीतून त्याला अधिक बळ दिले. वडिलांप्रमाणेच त्यांनीही आपल्या जीवनात कधीच आराम किंवा चैन शोधली नाही, तर सध्या राहून सर्वांच्या सुखासाठी झटणे, हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.माणुसकीचे दर्शन म्हणजे नितीनभाऊ राठी. त्यांच्या अंतर्मुख सहानुभूतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. वैयक्तिक आयुष्यात त्यांचा संयम, नीतिमत्ता, आणि सकारात्मक दृष्टिकोन हे गुण त्यांच्या मित्रपरिवारातही आदराने पाहिले जात. त्यांचा प्रत्येक मित्र, सहकारी, परिचित हे त्यांच्याशी असलेल्या आठवणींना आता डोळ्यांत अश्रू घेऊन उजाळा देत आहेत. त्यांनी एखादी गोष्ट एकदा मनाशी घेतली की ती पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेतली नाही. त्यांच्या भाषेत गोडवा होता आणि स्वभावात सौजन्य होतं.सद्यस्थितीत समाजात सहकार्य, आपुलकी, आणि माणुसकी कमी होत चालली असताना नितीनभाऊंसारख्या व्यक्तींचे अस्तित्व हे खूप मोठा आधार ठरत असे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघण्यासारखी नाही. समाजात कुणीतरी असा हवा जो हसत हसत दु:खातल्या माणसाच्या पाठीशी उभा राहील, नितीनभाऊ त्या प्रकारात मोडत होते.त्यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जिन्गारो बारावे तसेच पगडी समारंभ दिनांक २२ जुलै २०२५ मंगळवार रोजी निश्चित करण्यात आले असून, पगडी समारंभ सकाळी ११ वाजता & गंगाप्रसादी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. हा कार्यक्रम अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्र, सहकारी, व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी उपस्थित राहून नितीनभाऊंसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहणार आहेत नितीनभाऊंचे स्मितहास्य, त्यांच्या प्रेमळ आठवणी आणि माणुसकीची ओळख कायम पाचोऱ्याच्या स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज संपादक संदीप महाजन व परिवारा तर्फे प्रभ्रू चरणी प्रार्थना…
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






