![]()
पाचोरा – अलीकडच्या काळात अंत्यविधी, दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य यासारखे धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता, ते मोठ्या प्रमाणात खर्च, दिखावा आणि प्रतिष्ठा यांचे माध्यम ठरत असल्याचे आपण पाहतो. अनेकदा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर विधींचे स्वरूप एवढे विस्तृत केले जाते की ते जणू एखाद्या भव्य समारंभाचे रूप घेतात. काही ठिकाणी तर मृत्यू नंतरचा हा काळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तत्त्वावर साजरा केला जातो. अशा पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील (जगताप) कुटुंबीयांनी त्यांच्या वृद्ध आईच्या निधनानंतर खर्च, दिखावा, कर्मकांड टाळून समाजप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाटील परिवाराने त्यांच्या वयोवृद्ध आई कै. शांताबाई पांडुरंग पाटील (वय ८७) यांच्या निधनानंतर पारंपरिक विधींऐवजी सामाजिक व पर्यावरणपूरक कृतींचा अवलंब करत समाजासमोर नवा मार्ग दाखवला. त्यांच्या आईच्या अस्थी गावातील स्वतःच्या शेतात आणि बांधावर विसर्जित करून, त्या जागी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संगोपन व संवर्धन त्यांनी आईप्रती असलेल्या निष्ठा आणि ममत्वाच्या प्रतीक म्हणून करण्याचा संकल्प केला आहे. त्या वृक्षांमध्ये आईचे रूप पाहण्याची आणि तिच्या आठवणींचे जतन करण्याची त्यांची भावनिक भावना खरोखरच हृदयस्पर्शी आहे. कै. शांताबाई पाटील यांच्या तिन्ही मुलांवर ग्रामीण संस्कार असले तरी विचार मात्र पुरोगामी आहेत. मोठे चिरंजीव अर्जुन पाटील हे मुंबईत नोकरी करतात, तर पोपट पाटील गावातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. तिसरे चिरंजीव राजेंद्र पाटील हे पाचोरा एसटी बस आगारात मुख्य मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. ते पाचोरा मॉर्निंग वॉक व योगा ग्रुपचे अध्यक्ष असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. शिवकालीन संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. वास्तुशांती, विवाह, उत्तरकार्य यांसारख्या कार्यक्रमांमध्ये ते पारंपरिक शिवकालीन विधी पार पाडतात. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचे विचार आणि कार्य त्यांनी आपल्या जीवनात आत्मसात केले आहे. त्यांच्या प्रतिमांचे पूजन, अभंगांचे गायन आणि ग्रंथांचे वाटप याच्या माध्यमातून ते सातत्याने जनजागृती करीत असतात. कै. शांताबाई पाटील यांच्या निधनानंतर राजेंद्र पाटील यांनी आईच्या दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य विधी पारंपरिक पुरोहितांशिवाय, शिवकालीन कार्यपद्धतीने स्वतः पार पाडले. यात त्यांनी प्रतिमा पूजन, पुष्पांजली व अभिवादन करून आईला आदरांजली वाहिली. त्यांनी कर्मकांडाऐवजी श्रद्धेने केलेली ही विधी समाजात नवसंस्कार रुजवणारी ठरली. पुढे या उत्तरकार्याच्या खर्चातून म्हणजेच अंदाजे २५ हजार रुपयांत कोणतीही मोठी मेजवानी किंवा ब्राम्हण भोजन न करता, त्या पैशातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते १५ ऑगस्टच्या दिवशी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेंसिली, वही कव्हर्स, पाटी, पाटीपेन्सिल यांसारखी उपयुक्त शैक्षणिक साधने देऊन त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात पाटील कुटुंबीयांना अतिशय समाधान लाभले. सध्या ज्या काळात सामाजिक प्रतिष्ठा, नातेवाईकांचे कौतुक आणि धार्मिक कर्मकांड यासाठी लाखोंचा खर्च केला जातो, त्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबीयांनी दाखवलेला संयम, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी ही केवळ अनुकरणीय नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी आईच्या निधनानंतर ज्या पद्धतीने पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसारखे उपक्रम हाती घेतले, तो खरोखरच भावनिक आणि समाजहिताची जाणीव करून देणारा ठरतो. या कुटुंबाने केवळ वैयक्तिक शोकपर प्रसंगात नव्हे, तर त्यातून समाजाला सकारात्मक संदेश देत, मृत्यू नंतरही काहीतरी विधायक करणे शक्य आहे हे सिद्ध केले आहे. मृत व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजोपयोगी कृती करून त्या आठवणींना दीर्घकाल टिकवता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाळण बुद्रुक येथील पाटील कुटुंब. त्यांच्या या कृतीस सलाम करत, समाजातील इतरांनीही अशा पद्धतीने आदर्श घ्यावा आणि मृत्यू नंतरचा काळ देखील विधायकतेने साजरा करावा, हीच काळाची गरज आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






