![]()
पाचोरा- शहर व परिसरात वैद्यकीय क्षेत्र नेहमीच एक आदर्शवत पद्धतीने कार्यरत राहिले आहे. करोना महामारीच्या काळात माणुसकी हरवलेली असताना, पाचोरा येथे तरी ग्रामीण रुग्णालय ते खेड्यापाड्यांतील डॉक्टरांनी अपार कष्ट घेऊन जनतेसाठी दिवसरात्र अहोरात्र सेवा केली. त्या काळातील त्यांच्या कार्याचा आदर आजही प्रत्येक पाचोरावासी करतो. मात्र, अशा एका आदर्श वैद्यकीय व्यवस्थेत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा व चिंतेचा विषय ठरत आहे. पाचोरा शहरातील एक ख्यातनाम डॉक्टर अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात सापडण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून, अशा प्रकाराला भीक न घालता या धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित डॉक्टरने थेट पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरला गेल्या चार दिवसांत दोन वेळा निनावी चिठ्ठ्यांद्वारे धमकी देण्यात आली होती. चिठ्ठ्यांमध्ये स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले की, “तुमचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आमच्याकडे आहेत. हे व्हायरल होऊ नयेत, तर २ कोटी रुपये द्या,” अन्यथा समाजात मानहानी होईल अशी धमकी देण्यात आली. इतकेच नाही, तर डॉक्टरच्या मोबाईलवरून देखील एक मेसेज आला होता, ज्यात लिहिले होते की, “या प्रकरणात हस्तक्षेप करू नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.” या सर्व प्रकारांमुळे संबंधित डॉक्टर प्रचंड तणावात गेले. त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर होणाऱ्या परिणामाची जाणीव असल्याने त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केला आहे. धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या असून, मोबाईल नंबरचा तपास करण्यात येत आहे. या नंबरद्वारे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही. पाचोरा पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. मात्र, एवढ्या गंभीर प्रकरणाबाबत अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नसल्याची खंत पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ही केवळ एका डॉक्टराविरुद्धची धमकी नसून, संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करण्याचा हा कपटी डाव आहे पाचोरा येथील वैद्यकीय व्यवसाय बाबत सांगायचे झाले तर येथील डॉक्टर समाज हा आपल्या सेवाभावासाठी ओळखला जातो. एखाद्या वैयक्तिक कारणामुळे किंवा ब्लॅकमेलिंगसाठी जर डॉक्टरांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असेल, तर ही संपूर्ण समाजासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी बाब आहे. पाचोरा शहरात आरोग्यसेवेसाठी झटणारे डॉक्टर मोठ्या निष्ठेने काम करत असताना, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा बनावट व्हिडीओद्वारे धमकी देणे, हा वैद्यकीय पेशाच नव्हे तर मानवतेवरही आघात आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे — इतकी धक्कादायक घटना घडूनही, पाचोरा पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली गेली नाही. यामुळे पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोलिसांनी पारदर्शकपणे कार्य करून समाजाच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर पाचोरा शहरातील विविध डॉक्टर संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार जर रोखायचे असतील, तर संपूर्ण समाजाने एकत्र येणे आणि या प्रवृत्तींचा तीव्र विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. ब्लॅकमेलिंग हे फक्त आर्थिक गुन्हा नसून सामाजिक प्रतिष्ठेवर हल्ला करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेतील दोषींवर सायबर गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे शाखा व अन्य विशेष पथकांकडून तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ स्थानिक पोलीस तपास पुरेसा ठरणार नाही, कारण अशा गुन्ह्यांचे जाळे अनेक वेळा मोठ्या रॅकेटशी जोडलेले असते. या घटनेनंतर पाचोरा येथील वैद्यकीय क्षेत्रात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, शासनाने व पोलीस प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, तसेच धमकी, ब्लॅकमेलिंग यांसारख्या गुन्ह्यांसाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे
पाचोरा शहरातील वैद्यकीय सेवा ही अत्यंत निष्ठावान व सेवाभावी डॉक्टरांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत एका डॉक्टरला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २ कोटींची मागणी करणे, हा केवळ गुन्हा नाही तर माणुसकीचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि समाजात चुकीचे संदेश जाऊ नये याची दक्षता घ्यावी. समाजातील प्रत्येक घटकांनी अशा प्रवृत्तींचा निषेध करून वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेची व सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, हीच काळाची गरज आहे. आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा येथील पत्रकार बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार,प्रांताधिकारी भूषण अहिरे,पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार निवेदन देण्यात येणार आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






