बॅनर नको… !विचारांचे तेज हवे! एक आत्मपरीक्षणात्मक वाढदिवस  संदीप दा. महाजन

0

Loading

पाचोरा – ३१ जुलै २०२५ आज माझा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा दिवस जस जसा जवळ येतो, तस तसे मनात अनेक विचारांच्या लाटा उसळतात. “वाढदिवस साजरा करावा तरी कसा?” — हा प्रश्न दरवेळी मनात पुन्हा पुन्हा उमटतो. मी अनेकदा या दिवशी पाचोरातच नसतो. यंदाही मी कुठल्याही मोठ्या जल्लोषापेक्षा ईश्वराच्या चरणी डोके टेकवण्याचे ठरवले आहे. देवदर्शनाने हा दिवस खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होतो, असं मला वाटतं. आजकाल वाढदिवसाचं स्वरूपच बदललं आहे. सकाळ होताच मोबाईलवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्वच माध्यमांवर रंगीबेरंगी शुभेच्छा, फोटो, स्टोरीज, पोस्ट्स झळकतात. हो हे सर्व सामान्य माणसासाठी ठीक आहे काही जण स्वतःच्या पैशाने चौका-चौकात स्पेशली शाळा – कॉलेजच्या चौकात व रस्त्यावर & मुख्य बाजार पेठेसह वर्दळीच्या ठिकाणी फोटोचे बॅनर्सही लावतात. क्षणभर चेहऱ्यावर हसू उमटतं. पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र एक विचार नकळत डोकावतो — ही सगळी दिखाव्याची संस्कृती आहे का? बॅनरवर माझा चेहरा झळकला म्हणजे प्रेम दाखवलं गेलं असं समजायचं का? खरं सांगायचं तर वाढदिवस हा आत्मपरीक्षणाचा दिवस असावा. वय वाढतं, ती एक गोष्ट झाली. पण मी खऱ्या अर्थाने वाढलो का? अनुभवानं समृद्ध झालो का? हे विचारणं जास्त आवश्यक आहे. त्या दिवशी आपण स्वतःला विचारावं — मागच्या वर्षात मी कोणाच्या अश्रूंना आधार दिला का? कोणाच्या खांद्यावर हात ठेवला का? एखाद्याच्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश टाकला का? माझ्या आयुष्यातील अनेक वाढदिवस मी गोंगाटाशिवाय, साधेपणाने साजरे केले आहेत. बॅनर लावणं, स्टेजवर भाषणं देणं, पेढे वाटणं या गोष्टी माझ्या वाढदिवसाचा गाभा नाहीत.कारण मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे कोणताही राजकीय नेता नाही त्यांच्या स्तरावर ही बाब योग्य आणि आवश्यक आहे यासाठी मी नेहमी म्हणतो, “मैत्री ही मनात असावी, बॅनरवर नाही; आणि प्रेम हे कृतीत असावं, प्रदर्शनात नव्हे.” कधी कधी आपल्या मित्रमंडळींमध्ये एक विचित्र देवाण-घेवाण सुरू होते. “त्याने माझ्यासाठी बॅनर लावला, म्हणून मी त्याच्यासाठी लावणार.” पण या भावना किती खोलवर असतात, हेच मुळात शंकास्पद आहे. त्याऐवजी जर कोणाच्या आयुष्यात आपण खरंच एखादं चांगलं स्थान निर्माण करू शकलो, तर तेच अधिक मौल्यवान ठरतं. मी एक काळ ध्येय करिअर अकॅडमी नावाने एक शैक्षणिक संस्था चालवत होतो. त्या काळात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या खिशातील पैसे खर्च करून माझ्यासाठी एक बॅनर लावला. मी त्यांच्यावर ओरडलो नाही. त्यांच्यातील भावनांचा आदर केला. पण मी त्यांना शांतपणे एवढंच सांगितलं — “तुमचं खरं प्रेम मला फोटो लावून दाखवू नका. त्याऐवजी शिकून मोठं व्हा, काही तरी साध्य करा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत माझ्या घरी भेटायला याल, तोच माझा खरा वाढदिवस असेल.” आज त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण यशस्वी जीवन जगत आहेत. जेव्हा ते भेटायला येतात, त्यांच्या डोळ्यांतील समाधान, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचं गौरव पाहिलं की, त्या क्षणातच मी खूप मोठं बॅनर पाहिल्यासारखं वाटतं — पण ते मनात उमटलेलं असतं. आजकाल प्रसिद्धीच्या झगमगाटामध्ये खऱ्या नात्यांची गडबड होते आहे. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तेव्हा शहरभर त्याचे बॅनर झळकतात, पोस्ट्स वाहतात. पण तोच व्यक्ती जेव्हा एखाद्या अपघातात मृत्युमुखी पडतो, तेव्हा श्रद्धांजलीचाही एक पोस्टर कुणी लावत नाही. हीच आपली समाजमनाची उथळता आहे.आणि हे मी पाचोरा शहरात जीवन जगत असताना अनुभवले आहे फोटो झळकतो तेवढा वेळ. आठवण मात्र मनात राहते ती कायम. खरं प्रेम, आदर आणि आपुलकी ही कधीच प्रदर्शनातून व्यक्त होत नाही. ती कृतीतून उमटते. आज मी हे ठामपणे सांगतो की, मला माझ्या वाढदिवशी मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स, जाहिरातबाजी नकोय. आणि स्वतःच्या पैशाने तर नकोच – नको मला फक्त इतकंच हवंय की, एखाद्याच्या जीवनात मी एखादा दिवा पेटवला असेन, तर तेच माझं खरं यश, आणि तोच माझा वाढदिवस! आज समाजात वाढदिवस म्हणजे पार्टी, बँडबाजा, डेकोरेशन, महागड्या केकचा कार्यक्रम अशी एक तात्कालिक झिंग तयार झाली आहे. पण त्या झिंगेपलिकडे खरं माणूसपण उरलंय का, हा विचार कुणी करत नाही. मला असं वाटतं, प्रत्येकाच्या वाढदिवशी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारावा — मी एखाद्याच्या आयुष्यात दिलेला प्रकाश आजही तेवतोय का? सजावट केलेले मंच विसरले जातात. पण आपल्या कृतीतून उमटलेले संवेदनशील स्पर्श कायम आठवणीत राहतात. वाढदिवशी किंवा वर्षभरात आपण कोणा गरीब विद्यार्थ्याचं शैक्षणिक शुल्क भरलं, एखाद्या आजारी व्यक्तीला औषधं दिली, कुणाचं अश्रू पुसलं — ही खरी मोठी कामगिरी ठरते. दैनंदिन जीवनात पैसा, प्रसिद्धी, सत्ता, यश हे सर्व गोष्टी काहीकाळासाठी झगमगतात. पण शेवटी उरतं ते आपलं माणूसपण आणि आपल्यामुळे इतरांच्या मनात निर्माण झालेली आठवण. आज मी वाढदिवस साजरा करत असलो तरी त्याचा ‘दाखवा’ करण्याचा हेतू नाही. माझा वाढदिवस ‘जगण्यासाठी’ असावा, ‘दिसण्यासाठी’ नव्हे. माझ्या नावाचा नारा, चेहऱ्याचा फोटो, फुगे व तोरणं यापेक्षा जर कुणाच्या आयुष्यात मी शांती, दिलासा, आधार किंवा प्रेरणा देऊ शकलो, तर तेच माझं खरं सेलिब्रेशन आहे. आणि म्हणूनच मी हा वाढदिवस दरवर्षी आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा करतो. माझं नाव कुठे झळकलं की नाही, हे महत्त्वाचं नाही… पण मी कुणाच्या अंतःकरणात कोरला गेलो का? हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच — बॅनर नको… विचारांचे तेज हवे! हेच माझं जीवनदर्शन. हेच माझं वाढदिवसाचं आत्मभान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here