मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक प्रभावी सामाजिक पुढाकार घेत, वालिया सी.एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल.सी. कॉलेज ऑफ आर्ट्स या महाविद्यालयांतील हरीश राजपूरोहित आणि बकेश कोटी या दोन विद्यार्थी प्रतिनिधींनी २६ जुलै २०२५ रोजी पोदार इंटरनॅशनल हायर सेकंडरी स्कूल येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पाडले.
हे सत्र महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सत्रात ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, पासवर्ड संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि जबाबदारीने इंटरनेटचा उपयोग या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संवादात्मक आणि सहभागी स्वरूप. उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्नोत्तर सत्र, दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे आणि उपयुक्त टिप्स यांद्वारे सायबर सुरक्षेचे प्रत्यक्ष आणि सुलभ स्वरूपात शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या शंका समाधानासह प्रत्यक्ष अनुभवही शेअर केले.
श्री. राजपूरोहित आणि श्री. कोटी यांचे मुद्देसूद सादरीकरण, स्पष्ट संवादशैली आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी याचे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही विशेष कौतुक केले. काही शिक्षकांनी अशा सत्रांची नियमित गरज अधोरेखित करत, सायबर सुरक्षा विषय अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, अशी सूचनाही दिली.
“सायबर शिक्षासाठी सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित हे सत्र विद्यार्थ्यांना सजग, जबाबदार आणि डिजिटलदृष्ट्या साक्षर नागरिक म्हणून घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त माहितीपूर्णच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या जागरूक, सुरक्षित आणि नैतिक डिजिटल व्यवहार करणारे नागरिक म्हणून घडतात, हे निश्चित.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.