सायबर सुरक्षेच्या दिशेने सजग पाऊल : वालिया कॉलेजच्या सायबर वॉरियर्सकडून बर्फीवाला हायस्कूलमध्ये जनजागृती अभियान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायबर साक्षरतेच्या दिशेने विद्यार्थ्यांमध्ये सजगतेचे ठोस पाऊल उचलत, वालिया सी. एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल. सी. कॉलेज ऑफ आर्ट्स येथील सायबर वॉरियर्स — अप्सरा राऊत आणि मिश्कत सैफी यांनी एस सी डी बर्फीवाला हायस्कूल येथे प्रभावी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवले.

क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहकार्याने आयोजित या सत्रात सायबर बुलिंग, फिशिंग, सुरक्षित ब्राउझिंग सवयी, डिजिटल स्वच्छता अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि काळानुरूप विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी सायबर धोके ओळखावेत, डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरावे आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करावा, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता.

सदर उपक्रमाचा लाभ ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय सत्रांद्वारे घेतला. सत्रात शाळेतील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह सत्राच्या प्रासंगिकतेचे, मुद्द्यांच्या सुस्पष्ट मांडणीचे आणि संवाद शैलीच्या प्रभावीपणाचे शिक्षकांनी विशेष कौतुक केले.

हे सत्र “सायबर शिक्षेसाठी सायबर सुरक्षा” या व्यापक जनजागृती मोहिमेचा एक भाग होते. या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील संभाव्य धोके समजावून सांगणे, त्यांच्यात सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आवश्यक ज्ञान व साधनांनी सज्ज करणे हा होता.

अप्सरा राऊत आणि मिश्कत सैफी यांनी स्पष्ट संवादशैली, उत्साही सादरीकरण आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधण्याच्या कौशल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक ठामपणे रुजली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सजगतेची पायाभरणी घडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here