भाजपची खरी परीक्षा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात मनोमिलन, संघटन आणि विजयाचा मार्ग

0

Loading

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय चर्चेचं केंद्र बनला आहे. गावोगावच्या चौकात, शेतशिवारातील पाखरांमध्ये, शहरातील व्यापारी कट्ट्यांवर, तरुणांच्या मंडळीत—सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, “या निवडणुकीत नेमकं कोणाचं पारडं जड ठरणार?” लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांची जनतेवरील पकड निश्चितच अजूनही मजबूत आहे. त्यांच्या कामकाजाचा सहजसोपेपणा, सतत लोकांमध्ये राहण्याची शैली आणि “आपलं माणूस” अशी जपलेली प्रतिमा—यामुळे त्यांना लोकांचा विश्वास आहे. परंतु दुसरीकडे, भाजपकडे केवळ व्यक्तींचं नव्हे तर संघटित नेतृत्वाचं बलशाली अस्त्र आहे. या संघटनाला योग्य दिशा, योग्य सूत्र आणि खासदार फंडातील विकासकामातून कार्यकर्त्यांना एकत्र आणणारं अधिष्ठान जर मिळालं, तर पाचोरा-भडगावमध्ये राजकारणाचा खेळच पलटी होऊ शकतो. आणि हे अधिष्ठान म्हणजे नामदार गिरीशभाऊ महाजन! गिरीशभाऊ महाजन हे केवळ भाजपचे ज्येष्ठ नेतेच नाहीत, तर राज्याच्या राजकारणात ठाम पाय रोवलेलं, कार्यकर्त्यांच्या हृदयात जागा मिळवलेलं आणि विरोधकांच्याही तोंडून कौतुक ओघाने मिळणारं असं व्यक्तिमत्व आहे. पाचोरा-भडगावच्या रणांगणात गिरीशभाऊंचा प्रभाव हा फक्त राजकीय नाही, तर भावनिकही आहे. कार्यकर्ते म्हणतात—“गिरीशभाऊ आहेत, म्हणजे आम्ही एक आहोत.” भाजपकडे आज मतदारसंघात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, नानासाहेब संजय वाघ, सौ. वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील , बन्सीलाल पाटील , नंदुबापु सोमवंशी अशी एक ना अनेक ताकदवान नावं आहेत. या प्रत्येकाचं स्थानिक पातळीवर स्वतंत्र वर्चस्व आहे. पण समस्या अशी की ही नेतेमंडळी अजून एकाच छत्राखाली पूर्णपणे संघटित झालेली नाहीत. प्रत्येकाचं स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र गट, स्वतःच्या पद्धतीनं होणारा प्रचार—यामुळे पक्षाचं सामूहिक बळ जनतेपुढे ठळकपणे येत नाही. लोकांच्या मनात प्रश्न उभा राहतो—“भाजप खरंच एकत्र आहे का? की फक्त कागदोपत्री ताकद आहे?” यावर उत्तर द्यायचं झालं, तर एकमेव सूत्रधार जो सगळ्यांना एकत्र आणू शकतो तो म्हणजे गिरीशभाऊ महाजन. त्यांनी राज्यभर संघटन उभं केलं आहे, नेतेमंडळींना एका सूत्रात बांधलं आहे आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जपला आहे. त्यामुळेच भाजपच्या विजयाची गुरुकिल्ली त्यांच्या हाती आहे. एवढं मात्र निश्चित आहे की जिल्ह्यातील वा राज्यातील राजकीय स्थिती काहीही असो, पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आजही एकनाथराव खडसे साहेबांचे हितचिंतकांचा मोठा आणि सक्रिय गट अस्तित्वात आहे. त्यामुळे या गटाला नजरेआड करून कोणतेही राजकीय गणित आखणे शक्य नाही, हे तेवढंच महत्त्वाचं वास्तव आहे. आजचा मतदार केवळ आश्वासनांवर खूश होत नाही. रोजगार, शिक्षण, सिंचन, आरोग्य, रस्ते—या मूलभूत प्रश्नांवर ठोस योजना आणि जलद अंमलबजावणी अपेक्षित आहे. आमदार किशोरआप्पा पाटील या बाबतीत वेगळं स्थान मिळवून आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेणं, अडचणीत धावून जाणं, आर्थिक मदत करणं, अधिकाऱ्यांशी थेट संपर्क ठेवणं—या शैलीमुळे त्यांना “आपलं माणूस” अशी प्रतिमा मिळाली आहे. त्यामुळे भाजपने जर खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा असेल, तर केवळ नेत्यांच्या वैयक्तिक ताकदीवर न राहता थेट जनतेशी संपर्क साधावा लागेल. नेत्यांद्वारे नव्हे तर थेट कार्यकर्त्यांपर्यंत स्वतंत्र यंत्रणा उभी करून आर्थिक रसदीचा महापुर उभा करावा लागेल. हीच खरी वेळ आहे गिरीशभाऊ महाजन यांनी थेट मैदानात उतरण्याची आणि सगळ्या नेत्यांना एका सूत्रात बांधण्याची. भाजपच्या विजयासाठी सर्व नेत्यांचं मनोमिलन महत्त्वाचं आहे. दिलीपभाऊ वाघ, नानासाहेब वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे यांच्यातील मतभेद गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली विसरले गेले, तरच पक्ष जनतेपुढे एकसंघ दिसेल. त्याचबरोबर प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ते उभे करणं आवश्यक आहे. बूथ पातळीवर शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद आणि आर्थिक रसदची मजबूत यंत्रणा उभारली, तर निवडणुकीचं समीकरण पालटेल. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांच्या अडचणी ऐकाव्यात, त्यांना आश्वासन नव्हे तर ठोस उपाय द्यावेत. गिरीशभाऊंच्या सोबत हे काम अधिक विश्वासार्ह ठरेल. रोजगार निर्मिती, शैक्षणिक संधी, सिंचन व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर स्पष्ट आराखडा जनतेसमोर ठेवणं आवश्यक आहे. गिरीशभाऊंचा अनुभव यात उपयोगी पडेल. त्याचबरोबर गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या मतदारसंघाला अधिक वेळ दिला, तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. गिरीशभाऊ महाजन यांची खासियत म्हणजे त्यांचा माणुसकीने भरलेला स्वभाव. साध्या कार्यकर्त्याशी आपुलकीनं बोलणं, शेतकरी वा आरोग्याच्या प्रसंगी कोणी अडचणीत असेल तर धावून जाणं, विकासाच्या कामात वेगाने निर्णय घेणं—यामुळेच त्यांचं नाव लोकांच्या मनात वेगळं स्थान मिळवतं. सध्याचे आमदार किशोरआप्पा पाटील निश्चितच बलाढ्य आहेत. पण त्यांच्याविरोधात लढायचं असेल तर भाजपला फक्त व्यक्तींचं नव्हे तर संघटनेचं, शासकीय आशीर्वादाचं आणि आर्थिक रसदचं बळ उभं करावं लागेल. लोकांना दाखवावं लागेल की भाजप ही केवळ नेत्यांची फळी नाही, तर एकत्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. हीच खरी परीक्षा आहे भाजपची—“संघटनाची ताकद” लोकांसमोर ठसवण्याची. महाराष्ट्राचं राजकारण आज बुद्धिबळाचा पटच म्हणावा लागेल. प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळली जाते आणि ती थेट सत्तेच्या समीकरणावर परिणाम घडवते. दिल्लीच्या इशाऱ्यावरच फडणवीस साहेब वजीरासारखे सत्तेत सक्रीय आहेत. पण वजीर एकटा कितीही बलवान असला तरी, पटावर घोड्याची चाल अनपेक्षित आणि निर्णायक ठरते. अजितदादा पवारांचा प्रवेश हा फक्त एका पक्षाचं विभाजन नाही, तर शिंदे शिवसेनेला वेळोवेळी शह देणारा अष्टपैलू डाव आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद दुबळी भासत आहे. आणि जर न्यायालयीन निकालानंतर त्यांचं अधिकृत चिन्ह गेलं, तर त्यांच्याकडे भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नसेल. अशा वेळी पाचोरा–भडगावसह राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपला थेट लाभ होणार आहे. याचा अर्थ असा की या निवडणुकीत दोन प्रवाह थेट भिडणार आहेत—वैयक्तिक प्रभाव विरुद्ध संघटनाची ताकद. या लढतीत भाजपचं शस्त्र असेल मनोमिलन आणि संघटन; तर केंद्रबिंदू, प्रेरणा आणि हिरो असतील फक्त एकच—गिरीशभाऊ महाजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here