पाचोरा – शैक्षणिक आयुष्याचा गाभा केवळ पुस्तकातील धडे, वर्गातील तास किंवा परीक्षांचे गुण यात सीमित नसतो. खरी शिकवण ती असते जी आयुष्यभर उपयोगी पडते, जी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची, श्रमाचे महत्त्व ओळखण्याची आणि जीवनमूल्ये आत्मसात करण्याची संधी देते. श्री गो. से. हायस्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या एका छोट्याशा पण हृदयस्पर्शी प्रसंगाने याचे सुंदर उदाहरण घडवले. सहावीच्या इंग्रजी विषयातील My English Book Six या पाठ्यपुस्तकात “Are you a DIY kid?” हा धडा आहे. त्यातील “I love to help in kitchen” या घटकात विद्यार्थ्यांना साधे पदार्थ स्वतः करून पाहण्याचा प्रकल्प इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. वैशाली कुमावत यांनी दिला. उद्देश असा की विद्यार्थी वाचनापुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून स्वयंपाकातील मूलभूत कौशल्ये शिकतील, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनकलेचा गोड अनुभव घेतील. योगायोग असा की याच दिवशी श्री गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचा वाढदिवस होता.

या प्रसंगाने प्रकल्पाला एक वेगळाच भावनिक रंग दिला. भातखंडे येथील विद्यार्थी प्रशांत कुमावत याने या प्रकल्पाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या शेतातून थेट गावरान मेवा – घोडची भाजी – आणली. ग्रामीण मातीत उगवलेली ही भाजी घरी स्वयंपाकघरात बनवताना प्रशांतने केवळ पाककलेचा अनुभव घेतला नाही, तर “I love to help in kitchen” या वाक्याचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला. आपल्या छोट्या हातांनी बनवलेली भाजी तयार करून शाळेत आणली साध्या पण पारंपरिक पदार्थाची ही अनुभूती विद्यार्थ्यांसाठी खास ठरली.विशेष सर्वांत हृदयस्पर्शी क्षण आला, जेव्हा प्रशांतने ही भाजी थेट मुख्याध्यापकांच्या दालनात नेली. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत त्याने पोळीचा घास स्वतःच्या हाताने मुख्याध्यापकांच्या तोंडात घातला. उपस्थित सर्वजण थबकून पाहत राहिले. एका लहानशा विद्यार्थ्याच्या आपुलकीने भरलेल्या या कृतीने डोळ्यांत पाणी आले. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनीही या क्षणाला भावनिक प्रतिसाद देताना सांगितले, “विद्यार्थ्याकडून अशी अनपेक्षित शुभेच्छा मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. मुलाने आपल्या हातांनी जेवण बनवून मला घास घालून शुभेच्छा दिल्या, हे माझ्यासाठी अनमोल आहे. शिक्षक म्हणून याहून मोठं बक्षीस काही असू शकत नाही.” त्यांच्या शब्दांतला आनंद आणि विद्यार्थ्यावरील माया संपूर्ण शाळेला जाणवली. या प्रकल्पात इतर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. कुणी सॅन्डविच बनवले, कुणी पोहे, तर कुणी साधा चहा तयार केला. प्रत्येकाने आपल्या परीने “I love to help in kitchen” या वाक्याची प्रचीती दिली. परंतु प्रशांतचा उपक्रम सर्वांच्या मनात घर करून गेला, कारण त्यात केवळ प्रकल्प पूर्ण करण्याची नुसती औपचारिकता नव्हती, तर भावनिकता, श्रमाचे महत्त्व आणि शिक्षकावरील आदर दडलेला होता. श्री गो. से. हायस्कूलची हीच खरी ताकद आहे. येथे शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहत नाही.
प्रशांत कुमावतच्या या कृतीतून संपूर्ण वर्गाला प्रेरणा मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी “आपणही काहीतरी नवीन करून शिक्षकांना आनंद द्यावा” अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. कारण मुलांना घरगुती कामांशी जोडले की त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक संवेदनशील बनतात. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचा वाढदिवस या वर्षी केवळ केक, फुलांचा गुच्छ किंवा शुभेच्छांच्या ओघापुरता मर्यादित राहिला नाही. एका विद्यार्थ्याने आपल्या छोट्याशा हातांनी बनवलेला घास त्यांच्या तोंडात घातला – ही कृती अनमोल ठरली. कारण त्यात श्रम, आपुलकी, आदर आणि जीवनमूल्यांचा सुंदर संगम होता. शिक्षण हे नेमके कोणते असते याचे दर्शन या घटनेतून घडले. आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की “I love to help in kitchen” या वाक्याभोवती उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाने केवळ स्वयंपाक शिकवला नाही, तर शिक्षणाचे, श्रमाचे आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याचे खरे मूल्य उजागर केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.