पाचोरा – शेतकरी बांधवांनो, आपल्या हक्काच्या पैशावर प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांनी गदा आणली आहे. जालना जिल्ह्यात फक्त एका वर्षात तब्बल ३५ कोटींचा अनुदान घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेट शेतकऱ्यांच्या न्यायावरचा घाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पाचोरा तालुक्यातही याच धर्तीवर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले ७० कोटींच्या अनुदानापैकी काही लाख रुपये परस्पर इतरांच्या खात्यात वळवून हडप करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकरी बांधवांनो, फक्त दोन-चार शेतकऱ्यांनी धाडसाने तक्रार दिली आणि महसूल प्रशासन गडबडीत सर्व कामाला लागले. आता कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दारापुढे जाऊन खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. पण हा तात्पुरता उपाय आहे. मोठ्या प्रमाणावर अनुदान कोठे गेले? किती रक्कम कोणत्या अधिकाऱ्यांनी गिळंकृत केली? हे सत्य बाहेर आलेच पाहिजे. यासाठी मागणी केली जात आहे की सन २०१९-२० पासून ते २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेल्या सर्व अनुदानांची वर्षनिहाय यादी PDF स्वरूपात जाहीर व्हावी. प्रत्येक गावाच्या स्वतंत्र यादीत लाभधारकाचे नाव, मंजूर झालेली रक्कम, प्रत्यक्ष दिलेली रक्कम आणि न मिळाल्यास कारण याची स्पष्ट नोंद असावी. ही यादी गावोगावी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी तसेच स्थानिक पत्रकार यांना व्हॉट्सअॅपवर पाठवावी. शेतकरी बांधवांनो, आपण प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. सध्याचे पैसे मिळाले असतील, पण मागील वर्षांचे काय? आपल्या जवळ असलेली माहिती, कागदपत्रे आणि पुरावे यांची प्रत जोडून ती पत्रकार संदीप दामोदर महाजन, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा – Mo. 7385108510, 7588645907 यांच्याकडे द्यावीत. जालना घोटाळ्याचा स्फोट राज्यभरात झाला आहे. त्याच धर्तीवर पाचोर्यातील सत्य बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या आपलेच भविष्य धोक्यात येईल. म्हणूनच आता जागे व्हा, संघटित व्हा आणि आपल्या हक्काच्या न्यायासाठी लढा उभारा!











ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.