पाचोरा शेतकरी अनुदान भ्रष्टाचार प्रकरणी सत्याचा शोध घेताना – पत्रकारितेतील नवा अध्याय

0

Loading

पाचोरा – मी कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही, कोणतीही लाचारी मान्य केली नाही. सत्याचा शोध घेताना अनेक आव्हाने आली, अनेक अडथळे आले, परंतु या साऱ्या परिस्थितीत मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नाही, तर समाजाच्या न्यायासाठी लढण्याची एक शपथ आहे, याचा प्रत्यय मला या प्रकरणात आला. पाचोरा शहराच्या पत्रकारितेत आजवर जे घडले नव्हते, ते घडले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानातील भ्रष्टाचार उघड करण्याचे, त्यासाठी लढा देण्याचे, आणि अखेरीस न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनीच केले. या वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचा मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. त्यांनी फक्त बातम्या दिल्या नाहीत, तर सत्य लोकांसमोर आणण्याचे कार्य केले. आयुष्यभर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा या उपकारांची परतफेड करण्याचा मी प्रयत्न करीन. पण इथेच थांबायचे नाही. काहींनी माझ्या लढ्याला दुजोरा दिला, बातम्या प्रसिद्ध केल्या, तर काहींनी जाणीवपूर्वक माझे नाव गाळले. कारण काय? तर माझे नाव दिल्यास मला श्रेय जाईल, याची त्यांना जळजळ होती. काही तर मोठ्या अपेक्षेने जळगाववरून आले, पण त्यांना ‘पाकीट पूर्तता’ न झाल्यामुळे त्यांनी माझ्या लढ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हे पाहून मला आश्चर्य वाटले नाही, कारण अशा प्रवृत्ती नेहमीच असतात. मात्र यामुळे सत्य बदलत नाही. सूर्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नाही. त्याचप्रमाणे काहींनी नाव गाळले तरी जनतेला हे ठाऊक आहे की लढा कोण देत होते. पत्रकारितेतील हा अनुभव मला अधिक सजग आणि प्रगल्भ करणारा ठरला. कारण खरे पत्रकार तेच जे दबाव, स्वार्थ किंवा भीती यांना बळी न पडता सत्याचे धाडसाने उच्चारण करतात. या लढ्यात काही खुद्दार पत्रकार माझ्या सोबत उभे राहिलेच, शिवाय एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी माझ्या नावाचा विचार न करता, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून बातम्या दिल्या. काहींनी जरी माझे नाव न देता बातमी प्रसिद्ध केली तरी शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी पुढे आणला. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला नाही, कारण या लढ्याचा केंद्रबिंदू मी नव्हतो, तर शेतकऱ्यांचा न्याय हा होता. या भ्रष्टाचार प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे अनुदान जे बळीराजासाठी आणले गेले होते, ते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व इतरांनी लाटले. या प्रकाराने माझ्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. पत्रकार म्हणून माझे कर्तव्य होते की हा प्रकार उघड करणे, आणि त्याविरोधात लढा देणे. उपोषण हे माझे अस्त्र होते, जे मी समाजहितासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी वापरले. आजवर अनेकदा मी समाजातील प्रश्न मांडले आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी आवाज उठवला. परंतु या वेळी विषय वेगळा होता. कारण हा प्रश्न केवळ माझ्या वैयक्तिक हिताचा नव्हता, तर हजारो शेतकऱ्यांच्या घामाने आलेल्या कष्टांचा आणि त्यांच्या हक्काचा होता. म्हणूनच ही मागणी मी स्वाभिमानाने केली. आणि यावेळीही मी स्पष्ट केले की, हक्काची मागणी करताना माझा स्वाभिमान दुखावला जाणार नाही. या लढ्यात मला अनेक अडचणी आल्या. काहींनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, काहींनी स्वार्थासाठी वेगळ्या माध्यमातून मला हाताळण्याचा प्रयत्न केला. पण मी तडजोड केली नाही. माझ्या या स्वाभिमानाला काही खुद्दार पत्रकारांनी न्याय दिला. त्यांनी सत्य प्रकाशित केले, शेतकऱ्यांचा आवाज बनले. या सर्व प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे योगदान आमदार किशोर आप्पा पाटील यांचे राहिले. त्यांनी कोणत्याही एकतर्फी बाजू न घेता संपूर्ण घटनेची माहिती घेतली. माझ्या उपोषणामागील कारणे त्यांनी समजून घेतली. ते माझ्या पाठीशी उभे राहिले, परंतु फक्त माझ्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी. त्यांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर काही तासांतच अधिकाऱ्यांच्या साक्षीने माझ्या सर्व मागण्या मान्य करून घेतल्या. यामुळे माझ्या उपोषणाची सांगता झाली. हा विजय केवळ माझा नाही, तर शेतकऱ्यांचा आहे. पत्रकार बांधवांचा आहे. सत्याला साथ देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांचा आहे. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, प्रामाणिकपणे, धैर्याने आणि स्वाभिमानाने लढा दिला तर न्याय मिळतोच. मी आज माझ्या पत्रकार बांधवांचा विशेष आभारी आहे. काहींनी नावे गाळली, दुर्लक्ष केले, परंतु त्यांच्याबद्दलही माझ्या मनात कृतज्ञता आहे. कारण त्यांनी मला आठवण करून दिली की, प्रत्येकाला आपापल्या वृत्तीप्रमाणे वागण्याची मोकळीक आहे. “मौका सबको मिलता है.” परंतु खरे मूल्य त्या लोकांचे आहे जे सत्याशी तडजोड करत नाहीत. आज जे घडले ते पाचोरा शहराच्या पत्रकारितेत एक नवा अध्याय आहे. या प्रकरणाने दाखवून दिले की पत्रकारितेची ताकद अजूनही जिवंत आहे. सत्ता, दबाव, पैसा यांना झुगारून दिलेले सत्याचे शब्द लोकांपर्यंत पोहोचतात, जनतेचा विश्वास जिंकतात आणि प्रशासनाला जागे करतात. या सर्व संघर्षानंतर माझ्या मनात समाधान आहे की मी माझे कर्तव्य केले. या मार्गावर सोबत उभे राहिलेल्या स्वाभिमानी पत्रकारांना, शेतकरी बांधवांना आणि आमदार किशोर पाटील यांना माझा मनापासून सलाम. कारण या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या न्यायाचा मार्ग मोकळा झाला. आणि मला खात्री आहे की हा लढा फक्त एका भ्रष्टाचाराविरुद्ध नाही, तर भविष्यातील पारदर्शक व्यवस्थेची पायाभरणी आहे. – संदीप दामोदर महाजन , पाचोरा 7385108510

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here