पाचोरा तालुक्यातील खडकदेवळे बु. या गावात नुकताच समाजासाठी प्रेरणादायी ठरलेला उपक्रम राबवण्यात आला. गावातीलच उत्साही आणि समाजाभिमुख तरुण म्हणून परिचित असलेले प्रशांत भाऊ देवरे यांनी आपल्या ३२ व्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि अनुकरणीय उपक्रम हाती घेतला. वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापणे, डीजे वाजवणे, पार्टी देणे ही परंपरा आजकाल सर्वत्र दिसते, परंतु प्रशांत भाऊंनी या दिखाऊ चालीरीतींना छेद देत गावाच्या स्मशानभूमी परिसरात तब्बल ३२ वडवृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वड हे झाड भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि सावलीचे प्रतीक मानले जाते. स्मशानभूमीसारख्या गंभीर ठिकाणी या वृक्षांची लागवड केल्याने परिसर केवळ हरित होणार नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि थंड सावली मिळणार आहे. प्रशांत भाऊंनी केलेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे आणि विशेषतः तरुणांसाठी त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. हे पहिल्यांदाच नाही की त्यांनी आपल्या वाढदिवसाला समाजहिताचा उपक्रम राबवला. मागील वर्षी त्यांनी पाचोरा क्रिकेट टर्फ मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या वेळी रोख रक्कम किंवा इतर बक्षिसे न देता त्यांनी पर्यावरणाशी जोडलेला वेगळा उपक्रम हाती घेतला होता. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला २१ झाडांची रोपे, द्वितीय क्रमांकाला ११ रोपे, तर तृतीय क्रमांकाला ७ रोपे बक्षीस देऊन त्यांनी क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातूनही निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला होता. या माध्यमातून सहभागी खेळाडूंनी आपल्या अंगणात वाड्यात, शेतात ही झाडे लावली आणि ती जगवण्याचा संकल्प केला. या वर्षीच्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमासाठी गावातील आणि पाचोर्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पाचोरा येथून चेतन मणियार, अथर्व शेठ सोनार, सागर भाऊ वाघ, अमय बोरसे, विकी पाटील, नयन सूर्यवंशी, शुभम पाटील तसेच किशोर निंभोरीकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली. तर खडकदेवळे गावातून सद्याचे सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच प्रवीण पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन वाल्मिक देवरे, सचिव जगदीश पाटील, धर्मराज पाटील, शांताराम पाटील, गजानन सूर्यवंशी, आबा पाटील, दीपक पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावून प्रशांत भाऊंच्या कार्याचे कौतुक केले. गावकऱ्यांनी सांगितले की, प्रशांत भाऊंच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसर हरित होणार आहेच, शिवाय अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मकतेची भावना निर्माण होते. तरुण पिढीला वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा प्रसंग नसून, समाजहिताशी जोडलेला प्रसंग असावा, याची जाणीव त्यांच्या कृतीतून झाली आहे. आजच्या युगात पर्यावरणाचे वाढते प्रश्न सर्वांसमोर उभे आहेत. प्रदूषण, वृक्षतोड आणि हवामान बदल यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अशा वेळी एका तरुणाने स्वतःचा आनंद निसर्गाशी जोडून झाडे लावण्याचा उपक्रम केला, ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रशांत भाऊंनी पुढील काळातही दरवर्षी वाढदिवसाला असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या या विचारामुळे खडकदेवळे गावासह संपूर्ण परिसर हिरवागार होईल, अशी आशा गावकरी व्यक्त करत आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीतून अमलात आणणारे प्रशांत भाऊ देवरे यांच्या पर्यावरणपूरक वाढदिवसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.