पाचोरा – शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाचे उत्सवमूर्त वातावरण पाहायला मिळत असतानाच सामाजिक जाण आणि राष्ट्रभक्तीची जोड देणारे विविध उपक्रमही राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचोरा पुनगाव परिसरातील राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाच्या वतीने ‘एक शाम शहीदों के नाम’ हा शहीदांना समर्पित कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. गणेशमूर्तीची सायंकाळची आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी एकत्रितपणे दिवा पेटवून शहीद जवानांना अभिवादन केले. दीपप्रज्वलनाच्या त्या क्षणी परिसरात उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात देशप्रेम आणि कृतज्ञतेची भावना जागृत झाली. शहीदांचे स्मरण करताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि वातावरण क्षणभर भारावून गेले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे देशभक्तीपर गाणी. स्थानिक कलाकारांनी भावपूर्ण सादरीकरण करताना शहीदांचे पराक्रम, त्याग आणि बलिदान यांना शब्दांत आणि सुरांतून उजाळा दिला. ‘एक शाम शहीदों के नाम’ या संकल्पनेला साजेशा या गाण्यांनी कार्यक्रमाला एक आगळीवेगळी ऊंची मिळवून दिली. गाण्यांच्या सुरावटींनी उपस्थित प्रत्येकाचे मन राष्ट्रप्रेमाने भरून गेले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, लहान मुले, युवक, तसेच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित प्रत्येक जण भावनिक होत होता. शहीदांच्या त्यागाबद्दल आदर आणि सध्याच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, राधाकृष्ण माऊली नगर परिसरात अनेक आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची छटा अधिकच उजळली. काही सैनिक सुट्टीवर घरी आले होते, ते स्वतः या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमातील देशभक्तीपर गीत ऐकताना तेही भावुक झाले, त्यांचे डोळे पाणावलेले दिसत होते. गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव असा समज न राहता, समाजजागृतीचे आणि राष्ट्रीय भावनेचे संदेश देण्याचे व्यासपीठ ठरावे, हा उद्देश मंडळाने यामध्ये साधला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक तरुण मंडळींनी स्वतःहून पुढाकार घेत देशभक्तीची संध्याकाळ संस्मरणीय केली. राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाचे हे सलग आठवे वर्ष आहे. केवळ पूजा-अर्चनेपुरते कार्य मर्यादित न ठेवता दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा मंडळाने जोपासली आहे. या वर्षी शहीदांना समर्पित कार्यक्रम घेऊन त्यांनी देशप्रेमाची भावना जनमानसात रुजवली. कार्यक्रमानंतर नागरिकांमध्ये चर्चा रंगली की, अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळते, शहीदांच्या बलिदानाचे महत्त्व कळते आणि सैनिकांविषयी असलेली कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होते. खरं तर प्रत्येक शहीदाचे बलिदान हे राष्ट्रासाठीचे अमूल्य देणे असते, ते कधीही विसरले जाऊ शकत नाही. या उपक्रमातून त्या त्यागाचे स्मरण पुन्हा एकदा सर्वांना करून देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमामुळे राधाकृष्ण माऊली नगर परिसरात एक वेगळा माहोल अनुभवायला मिळाला. गणेशोत्सवाच्या सणात धार्मिकतेबरोबरच देशभक्तीची जोड देणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील. या भावनिक क्षणांना उपस्थित रहाण्याचा आनंद प्रत्येक नागरिकाने व्यक्त केला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.