नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाट्य व चित्रपटसृष्टीत आपल्या संवेदनशील दिग्दर्शनशैलीने, नवोन्मेषी नेपथ्यरचनेने आणि मनस्वी कलाभानाने वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व नेपथ्यकार शिवदास घोडके यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजारानंतर रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली असून रंगभूमीने एक प्रगल्भ, वैचारिक आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या पार्थिवावर बेलापूर येथे सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
घोडके हे मुळचे नांदेडचे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (१९८१) त्यांनी शिक्षण घेतले व १९८२ मध्ये शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून परतल्यावर त्यांनी अविष्कार नाट्यसंस्थेचे महाभोजन तेराव्याचे हे नाटक रंगभूमीवर आणले. पुढील चार दशकांत त्यांनी दिग्दर्शन आणि नेपथ्य या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
मराठी चित्रपट चंबू गबाळे (१९८९) हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट ठरला. त्या काळातील मनोरंजनप्रधान प्रवाहातही त्यांनी सामाजिक आशय आणि कलात्मकतेचा आग्रह धरला. लक्ष्मीकांत बेर्डे, चित्तरंजन कोल्हटकर आणि मच्छिंद्र कांबळी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात गाजल्या. तसेच चरणदास चोर हे लोककथा नाटक त्यांनी आयपीटीए व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या सहकार्याने सादर करून प्रायोगिक नाट्यक्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली. नुकतेच त्यांनी इप्टासाठी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई कोणाची हे नाटक दिग्दर्शित केले. या नाटकातून शहरी वास्तव आणि सामाजिक विषमता उलगडण्यात आली होती. तर शेवंता जिती हाय यासारख्या अनेक नाटकांतून त्यांची प्रयोगशील वृत्ती प्रकर्षाने जाणवली.
मुंबई विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना नाट्यदिग्दर्शनाबरोबर नेपथ्यरचना व रंगमंच साकारण्याचे धडे दिले. विशेषतः मुलांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “थिएटरचे थेरॅप्यूटिक वापर” या संकल्पनेवर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. कांचनताई सोनटक्के यांच्या विशेष मुलांच्या शाळेत त्यांनी विशेष मुलांना नाट्यकलेचे धडे दिले. राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले.
त्यांच्या निधनानंतर नाट्यरसिक, सहकारी दिग्दर्शक आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली. नाट्यकर्मी विजय पवार यांनी लिहिले, “शिवदासजींचे योगदान आमच्यासाठी दीपस्तंभासारखे राहील. त्यांनी शिकवलेले धडे आणि रंगभूमीवरील त्यांचा दृष्टिकोन आमच्या कार्याला दिशा देत राहील.”
त्यांच्या पश्चात आई, पत्नी स्वप्ना आणि मुलगा गुलजार असा परिवार आहे. शिवदास घोडके यांचा कलाप्रवास केवळ दिग्दर्शनापुरता मर्यादित न राहता नाट्यकलेच्या सामाजिक पैलूंचाही शोध घेणारा ठरला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवरील एक महत्त्वाचा अध्याय संपला असून त्यांची अनुपस्थिती रंगभूमीवर कायमची जाणवणारी ठरेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.