निसर्गाच्या भीषण कोपाने पाचोरा तालुका उद्ध्वस्त – शेतकरी-मजुरांचे संसार उघड्यावर, डोळ्यांतून ओघळले अश्रू, मदतीसाठी मानवतेचा हात पुढे

0

Loading

पाचोरा – गेल्या दोन- तिन दिवसांपासून पाचोरा तालुक्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला थरथर कापायला लावले आहे. आकाश फाटून पडल्यासारखा पाऊस, डोंगर-दऱ्यातून आलेले प्रचंड पाणी आणि दुथडी भरून वाहणारे नदी-नाले यामुळे गावोगाव पूरस्थिती निर्माण झाली. पिंपळगाव हरे.- सातगाव डोंगरी – गोंदेगाव – बनोटी सह लगतच्या संपूर्ण परिसरात अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरले, घरगुती सामान वाहून गेले, गुरे-ढोरे हरवली, उभे पीकासह शेती पूर्णपणे पाण्याखाली गेले. काही घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आला. या नैसर्गिक आपत्तीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून गावागावचे चित्र हंबरडा फोडणारे आहे. गावोगावची परिस्थिती इतकी भयावह आहे की पाहणाऱ्याच्याही डोळ्यात अश्रू येतात. गावातील एखाद्या आईचे स्वयंपाकघर, जिथे ती रोज चुल पेटवून संसार चालवत होती, ते पूर्ण पाण्याखाली गेले आहे. उघड्या हातांनी चिखलातून ती आपल्या मुलांना घट्ट मिठी मारून उभी आहे. “जिवंत राहिलो हेच मोठं झालं, पण आता पुढे उद्या काय?” असा प्रश्न तिच्या डोळ्यात आहे. अनेक गावातील शेतकरी-शेत मजुर यांचे घरगुती सामान, धान्य, गुरे सर्व वाहून गेले. त्यांनी “आयुष्यभर जमवलेलं या एका पावसाने हिरावलं. लेकरांचं भवितव्य आता कस चालवायचं? पोटाची खळगी कशी भरायची, काहीच समजत नाही.” अनेकांच्या घराची भिंत कोसळली. पाण्याच्या लाटांमध्ये जे अडकले होते. गावातील तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं असं म्हणायची वेळ आली आहे “देवाने नाही पण माणसांनी वाचवलं. आज या जीवावर माणुसकी उभी आहे.” काही गावातील महिलांचा संघर्षही वेदनादायी आहे. “संपूर्ण संसार चिखलाखाली गेला. मुलांना पोटभर अन्न नाही. आजारी लेकरांना औषधं नाहीत. एवढ्या वर्षात असं कधीच पाहिलं नव्हतं.” पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते – शेती वाहून गेले, पूल खचले, वीजपुरवठा खंडित झाला. गावोगाव लोक अंधारात दिवस काढत आहेत. चिखल, पाणी आणि असहाय्यतेच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांना शासनाच्या मदतीची तातडीची गरज आहे. या आपत्तीत मात्र मानवतेचा दिवा झगमगत आहे. गावोगाव अनेक राजकीय पक्षातील नेते – कार्यकर्ते युवक मंडळे, सामाजिक संस्था, दानशूर नागरिक मदतीला धावले आहेत. कुणी अन्नदान सुरू केले, कुणी कपडे वाटले, तर कुणी घरात आसरा दिला. तरुणांनी मुलं, वृद्ध, महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. स्त्रिया आपल्या हाताने शिजवलेलं अन्न पॅकेट्स बांधून पूरग्रस्तांच्या हातात देत आहेत. संकटात एकमेकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची धडपड सुरु आहे. महसूल, पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
आमदार किशोरआप्पा पाटील प्रत्येक गावाशी तसेच शासकीय मदत यंत्रणेची प्रत्येक सेकंदाला संपर्कात आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयातून स्वतंत्र संपर्क यंत्रणा कार्यान्वित केली आहे त्याचे संपूर्ण नियंत्रण यंत्रणा त्यांचे पुत्र सुमित किशोरआप्पा पाटील सांभाळत आहे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. रोगराईचा धोका लक्षात घेऊन लसीकरण आणि औषध पुरवठा सज्ज असून काही ठिकाणी सुरू देखील झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या संकटात ही मदत अपुरी भासत आहे.हे लक्षात येताच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांना पूरग्रस्तांना सर्व स्तरावरील तातडीने मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला रोख मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतीचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन विशेष पॅकेज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरात मृत पावलेल्या जनावरांसाठी तर पडझड झालेल्या घरांसाठी प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र शासनाच्या घोषणा ऐकूनही पूरग्रस्तांच्या डोळ्यात अजूनही शंकेचे सावट आहे. कारण त्यांनी पूर्वीही मदतीच्या अनेक घोषणा ऐकल्या, पण त्यांची अंमलबजावणी वेळेवर झाली नाही. “आमचं पीक, आमची जनावरं, आमचा संसार सगळं गेलं. रोख मदत नाही मिळाली तर आम्ही उपाशी मरू” असे म्हणत शेतकरी शासनाकडे कळकळीची अपेक्षा करत असले तरी त्यांचा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शब्दावर व प्रयत्नांवर आहे पाचोरा तालुक्यातील या आपत्तीने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. निसर्गाच्या कोपापुढे माणूस असहाय्य ठरला असला तरी मानवतेचा प्रकाश लोकांना जगण्याची आशा देतो आहे. “आपण सर्वजण एकत्र आहोत” ही भावना पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटवते. परंतु खरी पुनर्बांधणीसाठी शासन, समाज आणि प्रत्येक सर्वसामान्याने एकदिलाने पुढे येणे हाच काळाचा आदेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here