![]()
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील अनेक गावांवर अवकाळी संकट कोसळले आहे. 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शिंदाड, सातगाव डोंगरी, निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे आणि खडकदेवळा या गावांत प्रचंड हानी झाली आहे. मा. विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात या आपत्तीचे भीषण चित्र उलगडले आहे. आकडेवारी ही अद्याप प्राथमिक स्वरूपाची असली तरी पंचनाम्यानंतर आणखी मोठे नुकसान स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या घटनेत मनुष्यहानी टळली ही दिलासा देणारी बाब आहे. मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींची नोंद नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु जनावरांवर या आपत्तीने अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा पाया खिळखिळा झाला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार एकूण 1879 जनावरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 90 मोठी व 128 लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. 7 दुधाळ जनावरे गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतीकामासाठी आधार ठरणारी 23 मोठी व 41 लहान ओढकाम करणारी जनावरेही पुराच्या तडाख्यातून सुटू शकली नाहीत. पोल्ट्री व्यवसायाचा पाया कोसळला असून तब्बल 1572 कोंबड्या वाहून गेल्या आहेत. त्यापैकी 1050 कोंबड्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. याशिवाय 25 पाळीव डुकरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रशासनाचे पथक अजूनही अनेक जनावरांच्या मृतदेहांचा शोध घेत आहे. दोन दिवस सततच्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तब्बल 361 कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरांच्या नुकसानीने तर गावकऱ्यांची कोंडीच झाली आहे. एकूण 56 कच्ची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 248 कच्ची व 25 पक्की घरे अंशतः कोसळली आहेत. याशिवाय 32 झोपड्या व 54 गोठ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे घराविना व जनावरे गोठ्याविना उघड्यावर पडली आहेत. गावोगावी पूराचे पाणी शिरल्याने शेतजमिनी आणि उभ्या पिकांवरही मोठे संकट ओढवले आहे. मात्र पिकांच्या नुकसानीची आकडेवारी प्राथमिक अहवालात समाविष्ट केलेली नसल्याने शेतकरी आणखी चिंतेत आहेत. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीचे संपूर्ण चित्र समोर येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, बाधित भागात तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल विभाग व जिल्हा प्रशासन एकत्रितपणे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक कुटुंबांनी शाळा, मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेतला आहे. पीडितांना अन्न, पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स व निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावकऱ्यांचा जीव वाचला असला तरी जनावरांचे आणि घरांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान त्यांच्या जीवनावर गडद छाया टाकत आहे. शेतकरी वर्ग हताश झाला असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनीही आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी आपत्ती मानली जात असून पाचोरा तालुक्याच्या इतिहासात ढगफुटीच्या रूपाने भीषण पान लिहिले गेले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यानंतर अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाणार असून त्यानंतर शासनस्तरावर नुकसानभरपाईबाबत निर्णय होणार आहे. मात्र, आताच्या घडीला जनतेसमोरचा प्रश्न हा उद्याच्या जगण्याचा असून घर, जनावरे व शेतीचा आधार गमावलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या डोळ्यांत हतबलतेचे पाणी दाटून आले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





