![]()
धरणगाव – तालुक्यातील कवठळ ग्रामस्थ व गुर्जर बांधवांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कुलस्वामिनी कलेश्वरी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पावन उत्सवाची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 रोजी होऊन विजयादशमी अर्थात 02 ऑक्टोबर 2025 रोजी समारोप होणार आहे. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून गावातील एकतेचे, भक्तीभावाचे आणि समाजातील आपुलकीचे प्रतीक ठरतो. या दहा दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळ-संध्याकाळ आरत्या, देवीची पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः अश्विन शुद्ध सप्तमी, म्हणजेच दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी, मोठ्या भक्तिभावाने महत्त्वाचा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी कवठळ गावातीलच नव्हे तर परिसरातील हजारो भाविक कलेश्वरी मातेसमोर हजेरी लावतात. या सप्तमीच्या दिवशी आनंदा काशिराम पाटील (सेवानिवृत्त शिक्षक, कवठळ, ह.मु. जळगाव) यांच्याकडून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे कीर्तन होणार असून त्यांच्या प्रभावी वाणीमधून देवी महात्म्याचे गोड रसग्रहण भक्तांना लाभणार आहे. कीर्तनानंतर भक्तांसाठी अन्नदान भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे हे अन्नदान हे उत्सवाचे वैशिष्ट्य ठरते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झालेले असून, सर्वत्र उत्साहाची लहर दिसत आहे. कलेश्वरी मातेच्या चरणी माथा टेकण्यासाठी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावकरी तसेच दूरदूरहून भाविक आवर्जून उपस्थित राहतात. या सोहळ्यामुळे गावातील एकोपा अधिक दृढ होतो, तरुणाईला धार्मिक मूल्यांची जाणीव होते आणि सामूहिक पातळीवर एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा मिळते. उत्सवाच्या निमंत्रणाचे मानकरी म्हणून आनंदा काशिराम पाटील, नामदेव काशिराम पाटील, महेंद्र आनंदा पाटील, जितेंद्र आनंदा पाटील आणि निलेश नामदेव पाटील या कुटुंबीयांनी एकत्र येऊन भक्तांना या मंगल सोहळ्यास हजेरी लावण्याचे साद घातली आहे. या निमित्ताने ग्रामस्थ व गुर्जर बांधव यांचे एकत्रित आयोजन कौतुकास्पद ठरत असून, धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते. श्री कलेश्वरी माता मंदिर ट्रस्ट कवठळ, गुर्जर बांधव आणि सर्व ग्रामस्थ यांच्या विनंतीनुसार या नवरात्रोत्सवात भाविकांनी सहपरिवार, आप्तेष्ट व मित्रमंडळीसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम असलेल्या या सोहळ्यामुळे कवठळ गावाचे नाव पुन्हा एकदा भक्तिभावाच्या केंद्रस्थानी झळकणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






