![]()
पाचोरा – पाचोरा तालुक्यात 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शिंदाड, सातगाव डोंगरी, निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे आणि खडकदेवळा या गावांवर मोठे संकट कोसळले. मुसळधार पावसामुळे झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर जनावरांचे व घरांचे नुकसान झाले आहे. मा. विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तयार केलेल्या प्राथमिक अहवालात या आपत्तीचे गंभीर चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या मते, नुकसानाचे प्रमाण इतके व्यापक आहे की पंचनाम्यानंतर आणखी मोठे नुकसान स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या आपत्तीत मानवी जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब असली तरी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा कणा मानल्या जाणाऱ्या जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार एकूण 1879 जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली आहेत. त्यामध्ये 90 मोठी व 128 लहान दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली तर सात दुधाळ जनावरे गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतीकामासाठी आधार ठरणारी 23 मोठी व 41 लहान ओढकाम करणारी जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पोल्ट्री व्यवसायातही प्रचंड नुकसान झाले असून तब्बल 1572 कोंबड्या वाहून गेल्या, त्यापैकी 1050 कोंबड्यांचा अद्याप मागमूस लागलेला नाही. याशिवाय 25 पाळीव डुकरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. फक्त जनावरेच नव्हे तर शेकडो कुटुंबांचे घरकुल उद्ध्वस्त झाले आहे. आकडेवारीनुसार 56 कच्ची घरे पूर्णपणे कोसळली, 248 कच्ची व 25 पक्की घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय 32 झोपड्या व 54 गोठ्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे घराविना व जनावरे गोठ्याविना उघड्यावर पडली आहेत. गावोगावी पूराचे पाणी शिरल्याने शेतजमिनी व उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. मात्र पिकांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याने त्याची संपूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही. दरम्यान, शिंदाड व पिंपळगाव हरेश्र्वर महसूल मंडळातील 11 गावांमध्ये 648 घरांचे पंचनामे काल दि.18 सप्टे. रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण झाले आहेत. शेतीचे पंचनामे कालपासून सुरू झाले असून, अतिरिक्त 20 कर्मचारी यांची टीम आज पुन्हा पंचनाम्यासाठी पाठवण्यात आली आहे. नुकसान मोठे असल्याने पंचनाम्याला वेळ लागत असला तरी कोणत्याही परिस्थितीत आज व उद्या सर्व पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. शेतकरी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे. या आपत्तीग्रस्त भागात पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि महसूल विभागातील संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र अथक परिश्रम घेत आहे. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल कर्मचारी, जिल्हा प्रशासन, तसेच पोलीस विभाग यांच्या समन्वयातून बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि त्यांना अन्न, पाणी, ब्लँकेट्स व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कुटुंबांना शाळा, मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकही प्रशासनासोबत मदतीसाठी धावून आले आहेत. गावोगावी मदतकार्याची चळवळ उभी राहिली असून आपत्तीग्रस्तांना आवश्यक साहित्य पुरवले जात आहे. शासनाकडून पंचनाम्यानंतर अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे व त्यानंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय होईल. मात्र आताच्या घडीला गावकऱ्यांसमोरचा प्रश्न उद्याच्या जगण्याचा आहे. घर, जनावरे व शेतीचा आधार गमावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या डोळ्यांत हतबलतेचे अश्रू दाटले आहेत. पाचोरा तालुक्याच्या इतिहासात ही ढगफुटीची घटना भीषण आपत्ती म्हणून नोंदली जाणार आहे. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे मानवी जीव वाचला असला तरी झालेल्या प्रचंड आर्थिक व नैसर्गिक नुकसानीतून सावरण्यासाठी शासन व समाज या दोघांचीही सामूहिक मदत गरजेची आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






