पूरग्रस्तांसाठी मायेचा हात – पाचोर्‍यातून शिदोरी, ब्लँकेट व भांड्यांचे किट वाटप

0

Loading

पाचोरा : निसर्गाच्या कोपाला कोणीच आवर घालू शकत नाही. गेल्या काही दिवसांत पाचोरा शहर व परिसराने अशा कोपाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ढगफुटीसारख्या भीषण आपत्तीने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कोणी घर गमावले, कोणी संसारोपयोगी वस्तू, तर कोणी रोजच्या उदरनिर्वाहाचे साधन. हातात काहीही उरले नाही, अशा असहाय्य अवस्थेत अनेक कुटुंबे आजही उभे आहेत. पण या काळोखातही माणुसकीचा दिवा विझू दिला नाही, तर त्याला अधिक प्रकाशमान केले आहे. या परिस्थितीत समाजातील अनेक घटकांनी “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असे सांगत मदतीचा हात पुढे केला आहे. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता मदतकार्याचे सुसूत्र नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटावे, उद्याचा दिवस जगण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम उभा राहिला आहे. या उपक्रमाअंतर्गत ५० कुटुंबांना शिदोरी किट देण्यात येणार आहे. या शिदोरी किटमध्ये चहा पाव किलो, तेल एक किलो, साखर दोन किलो, आटा पाच किलो, मीठ एक किलो, तूरडाळ एक किलो आणि भात तीन किलो या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. एका कुटुंबाला सध्या जगण्यासाठी नेमके काय हवे आहे, याचा विचार करूनच ही निवड करण्यात आली आहे. या शिदोरी किटची किंमत ७५० रुपये असून, सर्व साहित्य पाचोर्‍यातील अमित प्रोव्हीजन येथून विकत घेण्यात येणार आहे. पुरामुळे संसार उघड्यावर आल्याने थंडीच्या काळात उबदार वस्त्रांची प्रचंड गरज भासत आहे. त्यासाठी या ५० कुटुंबांना प्रत्येकी दोन ब्लॅंकेट देण्यात येणार आहेत. एका ब्लॅंकेटची किंमत १४५ रुपये असून, ही वस्त्रे राम सेल्स ट्रेडिंग कंपनी, पाचोरा येथून विकत घेतली जाणार आहेत. रात्रीच्या थंडगार वाऱ्यात आईने मुलाला अंगावर घेऊन उब मिळवण्याची पाळी येऊ नये, यासाठी ही छोटीशी पण मायेची भेट दिली जाणार आहे. याशिवाय २० कुटुंबांना भांड्यांचे किट देण्याची योजना आखण्यात आली आहे. कारण फक्त पोटासाठी धान्य असून उपयोग नाही, ते शिजविण्यासाठी साधनेही लागतात. या किटमध्ये दोन मोठ्या थाळ्या, दोन लहान प्लेट, दोन वाट्या, दोन ग्लास, एक तांब्या, एक कढई, एक भगोना, एक मोठा चमचा आणि एक भात्या यांचा समावेश आहे. हे साहित्य नरुद्दीन ब्रदर्स, पाचोरा येथून विकत घेण्यात येणार असून, प्रति किटची किंमत अंदाजे ७५० रुपये आहे. हे किट म्हणजे नुसती भांडी नाहीत, तर संसार पुन्हा उभारण्याचा एक छोटा पण महत्त्वाचा पाया आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी प्रति हेड कॉन्ट्रीब्युशन दोन हजार रुपये (२०००/-) ठेवण्यात आले आहे. आपली माणुसकी व्यक्त करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या योगदानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासाठी फोन पे द्वारे योगदान स्वीकारले जात असून, त्यासाठी क्रमांक आहे – ८३०८६२१५९० (नाव – हर्षद किशोरकुमार संघवी). आपल्या योगदानाचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर शेअर करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे, जेणेकरून पारदर्शकतेने हे काम पार पाडता येईल. आज एका कुटुंबाच्या हातात अन्नधान्याची पिशवी पोहोचली, त्यांच्या अंगावर दोन ब्लॅंकेट चढली, स्वयंपाकघरात पुन्हा भांडी खडखडू लागली – तर त्यांचे डोळे पाणावतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील, तर माणुसकीच्या उबदार स्पर्शाने उमटलेले आनंदाश्रू असतील. या मदतीतून पीडित कुटुंबांना केवळ वस्तू मिळणार नाहीत, तर समाज अजूनही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा विश्वासही मिळणार आहे. “आज तुम्ही मदतीचा हात पुढे कराल, उद्या देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल,” या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. संकटाच्या या काळात, पाचोर्‍यातील नागरिकांनी दाखविलेला सहभाग नि:स्वार्थी सेवाभावाचा आदर्श आहे. प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण उजळावा, हीच या प्रयत्नामागची खरी प्रेरणा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here