पूरग्रस्त परिस्थितीत भेटी-आश्वासनांचा आता अंत, खऱ्या मदतीचीच नागरिकांना गरज : स्थानिक यंत्रणांची प्रामाणिक धडपड कौतुकास्पद

0

Loading

पाचोरा प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने त्रस्त झालेल्या परिसरात विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व समाजसेवी संस्था सातत्याने पाहणी करत आहेत. पीडितांच्या घरांमध्ये, शेतीत व वस्त्यांमध्ये भेटी देऊन नुकसान किती झाले याची माहिती घेतली जात आहे. मात्र, आजवर झालेल्या भेटी, आश्वासने आणि पंचनामे यांच्या पुढे जाऊन आता गरज आहे ती खऱ्या अर्थाने मदत देण्याची. पूरग्रस्तांच्या हातात तातडीची मदत पोहोचली पाहिजे, त्यांच्या जगण्याला आधार मिळाला पाहिजे, हीच सध्या काळाची खरी गरज आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक शासकीय स्तरावरील सर्व यंत्रणा – नगरपालिका, महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन – या सर्वांनी एकत्र येऊन ज्या प्रकारे जबाबदाऱ्या पार पाडल्या, ते अतिशय कौतुकास्पद आहे. पंचनामे करणे, अतिक्रमण हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करणे, मदत केंद्रे उभारणे, गावोगाव भेटी देऊन तातडीची माहिती गोळा करणे, नागरिकांना धीर देणे या सगळ्या बाबींमध्ये ही यंत्रणा अहोरात्र झटत आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या सुसंघटित पद्धतीने सर्व यंत्रणांची टीम काम करताना दिसत आहे. त्यांच्याकडून कुठलाही ढिसाळपणा किंवा निष्काळजीपणा आढळून येत नाही. उलट आपल्या जबाबदाऱ्या किती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडल्या जाऊ शकतात याचे हे उदाहरण ठरले आहे. मात्र, या प्रशंसनीय कामगिरीबरोबरच आता खरी गरज आहे ती थेट मदतीची. पीडितांना आश्वासने देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवणे महत्वाचे आहेच, पण त्यांच्या हातात लवकरात लवकर अन्नधान्य, आर्थिक मदत, औषधे व जगण्यासाठी लागणाऱ्या सोयी पोहोचल्या पाहिजेत. या बाबतीत फक्त पाहणी करून समाधान मानण्यापेक्षा तातडीची मदत देणे हा खरा प्रशासकीय यशाचा मापदंड ठरेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शासकीय स्तरावरील यंत्रणांचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणाकडूनही एक रुपया घेत नाहीत, घेणार नाहीतही. हे कटू सत्य असले तरी, अशा परिस्थितीत एजंट म्हणून ओळखली जाणारी एक वेगळी जमात जन्माला येते. “तुमचा पंचनामा जास्त दाखवू”, “तुम्हाला जास्त मदत मिळवून देऊ” अशा एक ना अनेक आश्वासनांच्या आधारावर हे एजंट पीडितांकडून दोन ते पाच हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न करतात. पूरामुळे आपले सर्वस्व गमावलेला गरीब शेतकरी किंवा सामान्य नागरिक यावेळी आशेच्या भावनेने त्यांच्या जाळ्यात अडकतो. पण शेवटी हातात काहीच न मिळाल्याने तो अधिकच उध्वस्त होतो. म्हणूनच अशा एजंटांना जागेवरच रोखणे, ठेचून काढणे ही जबाबदारी प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. कारण शासकीय यंत्रणा पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांच्या नावावर डाग आणण्याचे काम हे एजंट करतात. पीडितांच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे दलाल समाजासाठी धोकादायक आहेत. अशांना वेळीच अटकाव करणे, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे ही तितकीच गरजेची बाब आहे. पूरग्रस्त जनतेच्या डोळ्यात आज आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे. त्यांच्या तुटलेल्या घरांना आधार, त्यांच्या हातात अन्नधान्याची पोतडी, मुलांसाठी औषधे आणि शिक्षणाचा मार्ग, शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे व शेतीसाठी लागणारे साहित्य हेच त्यांच्या जिवनाला दिशा देईल. यासाठी शासनाने दिलेल्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, मध्येमध्ये एजंटांची दादागिरी थांबवणे व पारदर्शक कार्यवाही करणे या बाबींकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. आजवर झालेल्या भेटी व पाहण्या यांचा निश्चितच उपयोग आहे, कारण त्यातून हानीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. पण आता वेळ आहे कृतीची. पीडित नागरिकांच्या डोळ्यांत आशेचे पाणी आणण्याची व त्यांच्या जीवनात दिलासा देण्याची. यंत्रणांची प्रामाणिकता व जनतेचा विश्वास या दोन घटकांच्या जोरावरच हा संकटाचा डोंगर हलका होईल आणि समाज खऱ्या अर्थाने पुनर्वसनाच्या दिशेने पुढे सरकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here