![]()
पाचोरा – आगामी पाचोरा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय समीकरणांत आता एक वेगळा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. उबाठा सेना म्हणजेच उ.बा.ठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना आगामी निवडणुकीत दलित किंवा मुस्लिम समाजातील उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. या चर्चेमुळे पाचोराच्या नगरराजकारणात नव्या गठबंधनाच्या शक्यता निर्माण झाल्या असून, हे समीकरण सत्तांतर घडविणारे ठरू शकते, अशी चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे. उ.बा.ठा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भडगाव रोडवरील नवकार प्लाझा या शॉपिंग मध्ये आज कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नव्या उमेदवार निवडीबाबत सल्लामसलत सुरू होती. यात अनेकांच्या मते, दलित आणि मुस्लिम समाज या दोन्ही मतदार घटकांचा एकत्रित पाठिंबा जर उ.बा.ठा सेनेला मिळाला, आणि त्यातच पारंपरिक शिवसेनेचा एकनिष्ठ मतदारवर्ग जर ठाम राहिला, तर आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा विजय महाविकास आघाडीला (MVA) सहज शक्य होऊ शकतो. लवकरच महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांशी यासाठी प्राथमिक चर्चा करणार केल्याचेही समजते. पाचोरा तालुक्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींकडे पाहता, दलित आणि मुस्लिम मतदार एकत्र आले, तर ते कोणत्याही निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच उ.बा.ठा सेना या मतदारवर्गाला एकत्र आणण्याच्या रणनीतीवर भर देत आहे. गेल्या काही वर्षांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेने आणि महाविकास आघाडीतील धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे या दोन घटकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे उ.बा.ठा सेनेला आता या दोन्ही मतदारवर्गांना एकत्र आणण्याची संधी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील एम आय एम पक्षाच्या (AIMIM) रणनीतीचा देखील पाचोरा राजकारणात उल्लेख होत आहे. बिहारमध्ये एम आय एम ने हिंदू समाजातील राणा रणजीत सिंह यांना उमेदवार म्हणून दिलेली उमेदवारी ही एक चर्चेची बाब ठरली होती. मुस्लिम मतदारांच्या बळावर हिंदू उमेदवाराचा विजय मिळवण्याचा तो प्रयोग होता. त्या धर्तीवरच पाचोरा नगरपालिका निवडणुकीत उ.बा.ठा सेनेचा प्रयोग घडू शकतो, अशी चर्चा आज उ.बा.ठा सेनेच्या नवकार प्लाझा येथील कार्यालयात रंगली. या बैठकीत काही स्थानिक पदाधिकारी आणि मुंबई येथील रणनीतिकारांनी स्पष्ट मांडणी केली की, “आज पाचोरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विकासाची गरज आहे. लोक जात, धर्म, पक्ष , पैसा यांच्या पलिकडे जाऊन पारदर्शक आणि प्रामाणिक नेतृत्व शोधत आहेत. जर उ.बा.ठा सेना या संधीचा योग्य वापर करून सर्व समाजघटकांना समान स्थान देणारा उमेदवार उभा केला, तर त्याच्या विजयाला कोणीही थांबवू शकत नाही.” शहरातील अनेक मुस्लिम तरुण आणि दलित संघटनांचे कार्यकर्तेही या शक्यतेकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत. पाचोरा शहरातील नवकार प्लाझा कार्यालयात झालेल्या या चर्चेत काही सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक आणि युवक नेते देखील उपस्थित होते. त्यांच्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला की, “राजकारणात प्रतिनिधित्व हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजातील सर्व घटकांना संधी देण्यासाठी असले पाहिजे.” जर उ.बा.ठा सेना खरंच मुस्लिम किंवा दलित उमेदवाराला पुढे आणते, तर हे पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच घडणारे उदाहरण ठरेल. आजवर नगराध्यक्षपदासाठी प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष किंवा प्रस्थापित नेतेच लढत आले आहेत. परंतु सामाजिक समतोल साधणारा उमेदवार उभा राहिला, तर शहराच्या राजकीय दिशेचा पाया बदलण्याची क्षमता या निवडणुकीत दिसू शकते. उ.बा.ठा सेनेच्या स्थानिक कार्यालयात झालेल्या चर्चेचा दुसरा पैलू म्हणजे गठबंधनाचे राजकारण. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (उ.बा.ठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे एकत्र येणे हे आधीच मतदारांमध्ये एक विश्वासाचे प्रतीक बनले आहे. आता जर स्थानिक स्तरावर दलित-मुस्लिम एकजूट घडली, तर ही आघाडी मजबूत बनू शकते. पाचोरा शहरातील मतदारसंघाचा अभ्यास केल्यास सुमारे ३० टक्के मुस्लिम, १५ टक्के दलित आणि उर्वरित मतदार इतर समाजघटकांचे आहेत. या मतविभागणीवर आधारित गणित सांगते की, जर या दोन घटकांचा एकत्रित पाठिंबा उ.बा.ठा सेनेला मिळाला, तर त्यांचे मतांचे प्रमाण जवळपास ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचते. यात पारंपरिक शिवसेना मतदार जोडले, तर विजयाची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक होते. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात की, “आमचा उद्देश केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून विकासासाठी काम करणारे नेतृत्व निर्माण करणे आहे.” त्यामुळे उमेदवार निवड करताना सामाजिक समतोल, प्रामाणिकता आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नवकार प्लाझातील बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आज पाचोराच्या जनतेला एक नवा पर्याय हवा आहे. शहरात पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य या मूलभूत समस्या सुटल्या नाहीत. पक्ष कोणताही असो, पण शहराच्या विकासाला प्राधान्य देणारा उमेदवार उभा राहिला पाहिजे.” या चर्चेचा राजकीय अर्थ लावताना अनेकांनी हेही नमूद केले की, उ.बा.ठा सेनेचा हा निर्णय म्हणजे ‘राजकारणात प्रतिनिधित्वाचे नवे पर्व’ असेल. समाजातील उपेक्षित घटकांना नेतृत्वाच्या पातळीवर आणल्यास ते केवळ मतांचे समीकरण न राहता सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरेल. राजकीय विश्लेषकांच्या मते, बिहारमध्ये एम आय एम ने जसा हिंदू उमेदवार दिला आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवला, तसा प्रयोग महाराष्ट्रात जर उ.बा.ठा सेना करणार असेल, तर हा राज्याच्या राजकीय इतिहासातील एक प्रयोगात्मक टप्पा ठरेल. “हे पाऊल केवळ निवडणुकीपुरते न राहता महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचा नवा संदेश देईल,” असे मत विश्लेषकांनी मांडले आहे. आगामी काळात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते या संभाव्य उमेदवारीवर अंतिम निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मात्र, नवकार प्लाझामध्ये झालेल्या या चर्चेमुळे पाचोरा शहरातील राजकारणात एक नवी खळबळ माजली आहे. जनतेत याबाबत उत्सुकता वाढली असून, सर्वांचे लक्ष आता उ.बा.ठा सेनेच्या पुढील बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत कोणत्या समाजघटकाला उमेदवारी मिळते, हे ठरवले जाणार आहे. एकूणच, दलित-मुस्लिम एकजूट, पारंपरिक शिवसेना मतदारांचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे व्यापक जाळे या तिन्ही घटकांचा संगम साधला, तर उ.बा.ठा सेना पाचोरा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या विजया पर्यंत सहज पोहोचू शकते, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






