![]()
पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पाचोरा व भडगाव शहर तसेच तालुक्यातील पत्रकार बांधवांना सालाबादप्रमाणे दीपावली निमित्त फराळ व स्नेह भेट पाकिटांचे वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या मंगल वातावरणात झालेला हा कार्यक्रम परंपरेप्रमाणे स्नेहाचा, बांधिलकीचा आणि आपुलकीचा होता. मात्र यावेळी या कार्यक्रमाला एक विशेष भावनिक वळण लाभले आणि तो क्षण सर्वच उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला. कार्यक्रमास पाचोरा पीपल्स बँकेच्या माजी संचालिका आणि अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्षा अस्मीताताई यांच्यासह सुनिल पाटील, प्रवीण ब्राम्हणे, प्रवीण पाटील, भोला मिस्त्री, पद्ममबापू पाटील, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार बांधवांशी संवाद साधताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबद्दल कोणताही राजकीय सूर न छेडता पत्रकार बांधवांसोबत आपुलकीचा औपचारिक वार्तालाप साधला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक नोव्हेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेबाबत काही महत्त्वपूर्ण रणनीती व मार्गदर्शक मुद्दे आपण जाहीर करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सालाबादप्रमाणे पत्रकार बांधवांना आमदार किशोर आप्पांकडून सन्मानपूर्वक स्नेह भेट पाकिटांचे वितरण होत असतानाच एका पत्रकाराचा मनाला भिडणारा निर्णय या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. पाचोरा येथील ज्येष्ठ आणि सतत निडरपणे समाजातील प्रश्न मांडणारे पत्रकार संदीप महाजन यांनी आपले पाकीट स्वीकारताना सांगितले की “मी यापूर्वी कधीही कोणाचेही पाकीट स्वीकारलेले नाही. परंतु या वर्षी आप्पासाहेबांचे पाकीट स्वीकारत आहे आणि तेही एका भावासाठी.” त्यांनी पुढे सांगितले की आपले पत्रकार बांधव राजेंद्र खैरनार MO (9096237788) हे सध्या पोटाच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्या लढाईत साथ देण्यासाठी, उपचारासाठी काही मदत व्हावी या निस्वार्थ हेतूने महाजन यांनी ते पाकीट ताबडतोब राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी सुपूर्त केल्याची घोषणा केली. त्या क्षणी उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत कृतज्ञतेची व मैत्रीची ओल दाटून आली. पत्रकारांची ही परस्पर माणुसकीची मदत हीच खरी दीवाळी असल्याचा संदेश त्या क्षणी सर्वांना जाणवला. त्यानंतर पुनगाव येथील माजी सरपंच प्रवीण पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी अकरा हजार रुपयांची (₹11,000) रोख मदत जाहीर करून त्वरीत त्यांच्या हाती दिली. कॅन्सर सारख्या आजारात आर्थिक भार किती मोठा असतो हे जाणणाऱ्या प्रत्येकासाठी ही मदत आशेचा दीप प्रज्वलित करणारी होती. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजुभाऊ पाटील यांनीही मनापासून संवेदना व्यक्त करत सांगितले की “कॅन्सरसारख्या आजारांसाठी विविध आधुनिक उपचार पद्धती तसेच शासकीय योजनांतून मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते. मी वैयक्तिक पातळीवर राजेंद्र भाऊंना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यासाठी सदैव तयार आहे.” पत्रकार बांधवांची ही एकजूट पाहून व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राहुल महाजन यांनीही राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले. एकामागोमाग येणाऱ्या या मदतीच्या घोषणांमुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच भावनिक लहर उमटली. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका पत्रकारासाठी उभे राहिलेले हे भाऊबंदकीचे बळ त्या प्रसंगाला अधिक अर्थपूर्ण करून गेले. पत्रकार समाज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देत असताना त्यांच्या स्वतःवर कठीण प्रसंग आला तर त्यांच्यासाठीही अशीच साथ व हातभार असला पाहिजे हा जिव्हाळ्याचा संदेश या क्षणी जणू एकमुखाने पोहोचवला गेला. कार्यक्रमात कोणत्याही भाषणात राजकीय दिखावा नव्हता तर होती खरी माणुसकी. अस्मिताताई व इतर मान्यवरांनी पत्रकार बांधवांच्या एकत्रित भावनेला सलाम करत उपचारात आवश्यक त्या सर्व मदतीसाठी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. एकीकडे दीपावलीचे दिवे पाचोऱ्याच्या चौकात झगमगून उजळत होते तर दुसरीकडे एका सहकाऱ्याच्या आयुष्यातील अंधार हटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचे अनमोल दिवे पेटत होते. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा होती की राजेंद्र खैरनार लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच पत्रकारितेत सक्रिय होऊन जनतेच्या आवाजाला धार देत राहावेत. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी एकत्रितपणे राजेंद्र खैरनार यांच्या उत्तमरित्या बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या घरच्यांना या कठीण काळात मानसिक धीर आणि आधार मिळावा यासाठीही सर्वांनी मनापासून प्रार्थना केली. कॅन्सर हा आजार जरी कठीण असला तरी माणुसकीचे हात आणि प्रामाणिक मैत्रीचे बळ हे कोणत्याही संकटावर मात करू शकते याचा जिवंत दाखला या कार्यक्रमाने दिला. या दीपोत्सवात अनेकांच्या घरात रोषणाई झाली असेल परंतु या छोट्याशा पण हृदयस्पर्शी उपक्रमाने एका घरात नव्याने आशेचा दिवा पेटवला आहे. पत्रकार राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी पुढाकार घेण्याचा संदीप महाजन यांचा निर्णय हा पत्रकारिता या क्षेत्रातील नात्यांच्या खरी ओळख पटवणारा ठरला आहे. पोटाच्या कॅन्सरशी दोन हात करत असलेल्या राजेंद्र खैरनार यांच्या आयुष्यातील ही लढाई नक्कीच जिंकण्याची खात्री सर्वांनी व्यक्त केली. त्यांच्या आरोग्यासाठी समाजाकडून अजूनही मदतीचा हात पुढे यावा ही सामूहिक अपेक्षाही उपस्थितांमध्ये जाणवत होती. पत्रकार बांधवांची एकजूट, मान्यवरांचे सहकार्य आणि माणुसकीची तेजोमय झलक या कार्यक्रमातून दिसून आली. दीपावलीच्या या पर्वावर प्रकाशाचा खरा अर्थ म्हणजे माणसामाणसांतला विश्वास, साथ आणि प्रेम याचे सुंदर दर्शन इथे घडले. ही दीपावली फक्त स्नेह भेट पाकिटांनी नव्हे तर एका सहकाऱ्याच्या आयुष्यात नवा प्रकाश आणण्याच्या संकल्पाने अर्थपूर्ण झाली. सर्वांच्या प्रार्थना, सदिच्छा आणि मदतीच्या हातांनी राजेंद्र खैरनार यांच्या उपचारयात्रेला लवकरच सकारात्मक यश मिळो, ते आरोग्य लाभून पुन्हा समाजासाठी जोमाने उभे राहोत, हीच मंगल कामना.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







