![]()
पाचोरा : पाचोराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारी आनंदवार्ता म्हणजे येथील सुपुत्री आम्रपाली कासोदेकर (मेने) यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाचोरा व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, समाजातही अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. आम्रपाली कासोदेकर या दिवंगत शामकांत कासोदेकर, सेवानिवृत्त ग्रंथपाल, एम. एम. महाविद्यालय, पाचोरा आणि शालीनी कासोदेकर यांच्या कन्या होत. वाणी समाजात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या कुटुंबाने नेहमीच समाजकारण आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक आदर्श ठेवला आहे. आम्रपाली यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण वाणी समाजाचा आणि स्पेशली ज्ञान प्रबोधिनी मंडळ व त्याचे प्रमुख प्रा राजेंद्र चिंचोलेसह पाचोऱ्याच्या भूमीचा गौरव वाढला आहे. आम्रपाली या संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध विधी तज्ञ ॲड. मंगेश मेने यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या सासरे दादासाहेब चंद्रकांत मेने हे छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) येथील समाजसेवा आणि संघटन कार्यात सक्रिय असलेले प्रगतिशील व्यक्तिमत्त्व आहे. आम्रपाली कासोदेकर या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे शासकीय सचिव सुनिल वाणी यांच्या मेहुणी असून, त्यामुळे या परिवाराचे सामाजिक, प्रशासकीय आणि वैचारिक क्षेत्रात विशेष योगदान आहे. सन २००१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून आम्रपाली कासोदेकर यांनी प्रशासनात प्रवेश केला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जिल्हा प्रशासनातील तहसीलदार म्हणून झाली. या दोन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी जामनेर, मालेगाव, खुलताबाद, संभाजीनगर आणि परभणी अशा विविध ठिकाणी तहसीलदार जबाबदारीची पदे भूषविली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख कार्यशैलीतून आपले वेगळेपण सिद्ध केले. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदार पदावर कार्यरत असून, त्यांच्या प्रशासकीय कामगिरीची दखल शासनाने घेतली आहे. नुकत्याच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नती यादीनुसार आम्रपाली कासोदेकर यांची उपजिल्हाधिकारी पदावर बढती निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती “उप व्यवस्थापकीय संचालक, सारथी” या महत्वाच्या पदावर करण्यात आली आहे. “सारथी” ही संस्था राज्य शासनाची एक महत्त्वाची संस्था असून, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना व तरुणांना उच्च शिक्षण, रोजगार आणि मार्गदर्शनासाठी कार्य करते. त्यामुळे या पदावर आम्रपाली यांचे योगदान समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनाबद्दलची पारदर्शकता, जनतेशी सुसंवाद आणि निर्णयक्षमता ही गुणवैशिष्ट्ये विशेष ठरली आहेत. त्यांनी काम केलेल्या ठिकाणी विकासकामांची गती वाढली, जनतेचे प्रश्न तातडीने सोडवले गेले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवले गेले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि स्थानिक नागरिकांकडूनही त्यांना नेहमीच कौतुक मिळाले आहे. आम्रपाली कासोदेकर यांच्या या यशामागे त्यांचे माता- पिता गुरुजन वर्ग व त्यांची स्वतःची मेहनत, संयम, शिस्तबद्ध जीवनपद्धती आणि कुटुंबाचे भक्कम पाठबळ आहे. शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यात लहानपणापासून वाचन, प्रामाणिकता आणि सामाजिक संवेदनशीलता या मूल्यांचा संस्कार केला. या संस्कारांचे फळ म्हणजे त्यांनी आज मिळवलेले हे उच्च पद. त्यांच्या पदोन्नतीची बातमी जाहीर होताच पाचोरा, संभाजीनगर आणि वाणी समाजात सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध सामाजिक संघटनांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले. “झुंज” वृत्तपत्र आणि “ध्येय न्यूज” चे संपादक संदीप महाजन परिवाराने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत म्हटले आहे की, “आम्रपाली कासोदेकर यांच्या या नियुक्तीने वाणी समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि महिलांनी प्रशासन क्षेत्रात कसे उल्लेखनीय यश मिळवावे याचे उदाहरण निर्माण झाले आहे.” महिला सक्षमीकरणाचा आणि समानतेचा आदर्श ठेवत, आम्रपाली कासोदेकर यांनी जिद्द, ज्ञान आणि निष्ठेच्या जोरावर प्रशासकीय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाचोरा या छोट्या शहरातून सुरुवात करून त्यांनी राज्य प्रशासनाच्या उंच शिखरावर झेप घेतली आहे. त्यांच्या या प्रवासाने अनेक तरुणींना नव्या दिशेने विचार करायला भाग पाडले आहे. त्यांच्या कार्यकाळात जनतेशी सलोखा राखणे, योजनांची पारदर्शक अंमलबजावणी आणि विकासविषयक निर्णयांमध्ये लोकसहभाग वाढवणे या बाबी कायम अग्रक्रमावर राहिल्या आहेत. अशा प्रगल्भ आणि संवेदनशील अधिकाऱ्यांची पदोन्नती ही शासनासाठीही गौरवाची बाब आहे. उपजिल्हाधिकारी पदावर आम्रपाली कासोदेकर यांची नियुक्ती म्हणजे प्रशासनात संवेदनशीलता, प्रामाणिकता आणि कार्यक्षमतेचा संगम होय. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पाचोरा शहर, वाणी समाज आणि सर्व समाजबंधूंनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा प्रवास पुढेही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






