![]()
जळगाव – जिल्ह्यात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पाचोरा पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि कार्यकुशलता दाखवत केवळ काही तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) हे दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या नातलगांच्या लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायद्याच्या हेतूने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम अंदाजे ४१,५०० रुपयांची लंपास केली. या घटनेबाबत फिर्यादींनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्र. ५३०/२०२५ भादंवि कलम ३३१(१) अन्वये नोंदविण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तात्काळ तपास पथक तयार करून चोरीचा तपास सुरू केला. गुन्हा घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, भातखंडे खुर्द येथील रहिवासी कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५) या तरुणावर संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत भातखंडे खुर्द येथे सापडताच त्यास ताब्यात घेतले. सदर संशयिताची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण ४१,५०० रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याने अत्यंत कमी वेळेत एक गंभीर घरफोडी प्रकरण उघडकीस आणत जनतेत विश्वास निर्माण केला आहे. या यशस्वी कारवाईमागे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांचे प्रभावी मार्गदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम यांचे समन्वय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांचे सक्रिय पर्यवेक्षण लाभले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात सपोनि संजय निकुंभ, पोना महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकोन संदीप राजपुत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंगी, संतोष राजपुत आणि अनिल पवार या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. जिल्हा पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता केवळ गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरत नाही, तर जनतेतही पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते. ग्रामीण भागात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर पाचोरा पोलिसांनी केलेली ही तत्पर आणि व्यावसायिक कारवाई आदर्शवत ठरत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे मनापासून कौतुक केले असून, योग्य वेळी दिलेल्या प्रतिसादामुळे जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलिसांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. पाचोरा पोलिसांची ही जलद आणि प्रभावी कारवाई जिल्ह्यातील पोलिसांच्या सतर्कतेचे आणि गुन्हे उघड करण्याच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





