![]()
पाचोरा — काळ कितीही पुढे गेला, वर्षे कितीही सरली, तरी शाळेच्या आठवणी मनात कायम ताज्या राहतात. अगदी हाच अनुभव जागृती विद्यालय, पाचोरा येथील २००२-०३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा घेतला. रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नाथ मंदिर, जारगाव येथे आयोजित हा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा जुन्या आठवणींच्या गंधात, मैत्रीच्या ऊबेत आणि शिक्षकांच्या आशिर्वादात दणदणीत यशस्वी ठरला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि क्षणोक्षणी हा सोहळा अधिक रंगत गेला. या विशेष मेळाव्याची शान वाढली ती आपल्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर प्रेरणा देणाऱ्या मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीमुळे. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोकुळ पाटील सर, माजी मुख्याध्यापक राजेंद्र वाणी सर, आजी मुख्याध्यापक राजू सावंत सर, ज्येष्ठ शिक्षक डी.पी. पाटील सर, टी.आर. पाटील सर, आर.पी. बाविस्कर, नितीन वाघ सर, दिगंबर पाटील सर, देविदास पाटील सर, संजय वाघ सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी मोठा सन्मान ठरली. शिक्षकांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे धडे देत मनःपूर्वक आशीर्वाद दिले. अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्या जुना शाळेचा काळ पुन्हा अनुभवला. या मेळाव्याचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती. आज जीवनात विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असलेले हे सर्व विद्यार्थी या दिवशी फक्त ‘जुने विद्यार्थी’ म्हणूनच एकमेकांमध्ये मिसळले होते. कुणी डॉक्टर, कुणी पोलीस अधिकारी, कुणी उद्योजक तर कुणी शासकीय सेवेत काम करणारे—परंतु या ठिकाणी सर्व जण बालमित्रांसारखेच आनंदात एकत्र आले. त्यांनी आपल्या बावीस वर्षांच्या प्रवासातील अनुभव, संघर्ष, यशकथा आणि आठवणी सगळ्यांसमोर शेअर करत जुन्या दिवसांना उजाळा दिला. मेळाव्यात शाळेतील तासिका, पारंपरिक खेळ आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व जण बालकाळातील मित्रांसारखेच या खेळांत गुंतून गेले आणि संपुर्ण वातावरण हास्य-विनोदाने भारून गेले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पीएसआय श्री वाल्मिक एकनाथ महाजन यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथे पीएसआय पदावर गेल्याबद्दल सर्व मित्रांनी त्यांचे कौतुक करत जोरदार दाद दिली. त्याचप्रमाणे चेतन पाटील, मच्छिंद्र पाटील, वैभव पाटील, शशिकांत ठाकरे, गणेश देवरे, किशोर चौधरी, अपर्णा अहिरे, राकेश पाटील, संतोष सपकाळे, विजय सावळे, विश्वनाथ अहिरे, गुंजन सोनार, श्रीराम पवार, अलका वराडे, कुणाल देवरे, संजय अहिरे, रूपाली वाणी, श्याम ठाकरे, मुकेश सुतार, प्रज्ञा शिंदे, रवी सोनवणे, आदिनाथ पाटील, प्रशांत सोनवणे, महेश पाटील, योगेश देवरे, राहुल सोनवणे, सुरेश बागुल आणि ललिता ब्राह्मणे अशा अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समाधान पवार यांनी केले. तर पीएसआय वाल्मिक महाजन, संतोष सपकाळे, चंद्रकांत पाटील आणि प्रफुल ठाकरे यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करत शाळा, शिक्षक आणि मित्रांबद्दलचे भावविश्व उलगडले. या स्नेहमेळाव्यास मधुर खान्देश वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन आणि प्रवीण बोरसे यांची उपस्थिती विशेष ठरली. पत्रकार राहुल महाजन यांनी मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या एकतेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनाचा संपूर्ण भार समाधान पवार, प्रशांत चव्हाण, कन्हैया देवरे, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रफुल ठाकरे, समाधान पाटील, मनोज पाटील, उपेंद्र मगर, विकास ब्राह्मणे आणि सुवर्णा पाटील यांनी सांभाळत अखंड मेहनत घेतली आणि कार्यक्रम अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न केले. शेवटी, २००२-०३ बॅचच्या या स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले की शाळा फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्यभर जोडून ठेवणारा भावनिक धागा आहे. आनंद, आठवणी आणि मैत्रीने भारलेला हा दिवस सर्वांच्या मनात वर्षानुवर्षे ताजा राहणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






