भडगाव RTO ऑफिसात भोगळ कारभार; पैसे न दिल्यामुळे कल्पेश माने यांचं कागदपत्र अपलोड नाही, महाजन आंदोलनाला सज्ज

0

Loading

पाचोरा – राज्यभर आरटीओ ऑफिस म्हटलं की एजंट, दलाली, पैसे घेणं-देणं हे आता अगदी नेहमीचं झालंय. कोणाकडून तरी पैसे खाल्ले तरच काम होतं, नाहीतर सरकारी ऑफिसात काम लटकतं, फिरवत ठेवलं जातं. असंच काहीसं पाचोरा तालुक्यातील कल्पेश माने या साध्या तरुणाच्या बाबतीत भडगाव आरटीओ ऑफिसात घडलं. कल्पेश माने यांनी कोणत्याही एजंटकडे न जाता थेट सरकारी ऑफिसात जाऊन लर्निंग लायसन्ससाठी कागदपत्रं दिली. कायदेशीर फी भरून, संगणक चाचणी देऊन सगळी कामं व्यवस्थित केली. त्यावेळी ऑफिसातील कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला एक महिन्यानंतर कायमस्वरूपी लायसन्ससाठी बोलावू”, असं सांगितलं. पण जेव्हा एक महिना झाल्यावर कल्पेश पुन्हा ऑफिसात गेले, तेव्हा त्यांना सतत “उद्या या, परवा या, चार दिवसांनी या” असं म्हणत फिरवत ठेवण्यात आलं. शेवटी तर असं सांगण्यात आलं की “तुमच्या लर्निंग लायसन्सची कागदपत्रं आम्ही सिस्टमवर अपलोडच केलेली नाहीत, आता पुन्हा लर्निंगला लागेल, पुन्हा एक महिना वाट बघा.” म्हणजेच पुन्हा फी भरा, पुन्हा वेळ द्या, पुन्हा चकरा मारा. हे सगळं एका साध्या युवकाला फक्त एजंटकडून पैसे न दिल्यामुळे करावं लागतंय, असं स्पष्ट दिसतंय. भडगाव आरटीओ ऑफिसात एजंटांचाराजाच सुरू आहे. त्यांच्या हाताखाली, ठराविक रक्कम भरली की काही तासांत काम होतं. कागदपत्रं अपलोड, डेट ठरवणं, लायसन्स देणं — सगळं एका झटक्यात. पण जो माणूस कायदेशीर मार्गाने, सरकारी ऑफिसात थेट येतो, तो मात्र “हरामाचा माल नाही दिला” म्हणून टेहळणीला लावला जातो. साधा नागरिक पैसे देत नाही म्हणून त्याला त्रास देणं, मुद्दाम काम न करणं, कागदपत्रं अपलोड न करणं, हे सरळसरळ भ्रष्टाचारचं काम आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी यावर जोरदार भूमिका घेत, भडगाव आरटीओ ऑफिसासमोर तंबू लावून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशा मोठ्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. तसेच ऑफिसात एजंटांचे जाळं थांबवावं, ड्रायव्हिंग स्कूलची आणि त्यांच्या वाहनांची तपासणी करावी, ग्राहकांकडून किती आणि कशासाठी पैसे घेतले जातात याची नोंद तपासावी, पावत्या मागाव्या, फिटनेसची कागदपत्रं तपासावीत अशाही मागण्या पुढे आणल्या आहेत. कल्पेश माने यांना तात्काळ कायमस्वरूपी लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संदीप महाजन यांनी दिला आहे. या आंदोलनाला वाहनधारक, तरुण विद्यार्थी, ड्रायव्हिंग लायसन्स घेणारे लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात असं बोललं जातंय. ही लढाई फक्त एका व्यक्तीची नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची आहे, असंही महाजन यांनी ठामपणे सांगितलं. आता भडगाव आरटीओ ऑफिसातील गैरप्रकार थांबणार का? की अजूनही दलालांच्या हातातच ऑफिस चालत राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here