पाचोरा नगरपालिकेच्या रणधुमाळीपासून दूर: ‘ध्येय न्यूज’ व ‘झुंज’ वृत्तपत्राची स्पष्ट भूमिका — गुंडापासून नगरपालिका वाचवा, हीच अपेक्षा!

0

Loading

पाचोरा : नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. गल्ली, चौक, बाजारात, चहाच्या टपरीवर, घराघरात सगळीकडे उमेदवारांच्या चर्चा होत आहेत. अनेक लोक, विविध संघटना आणि सोशल मीडियावरही असे बोलले जात होते की “ध्येय न्यूज” आणि “झुंज वृत्तपत्र” या वेळेला जोरदार बातम्या, विश्लेषण आणि सत्य उघड करणार. काहीजणांनी मला थेट बोलूनही अशी अपेक्षा सांगितली. पण मला वैयक्तिक कौटुंबिक वैद्यकीय अडचणी आहेत, त्यामुळे मी या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला किंवा गटाला साथ देणार नाही. कुठल्याही पक्षासाठी प्रचार, टीका किंवा कौतुक करणार नाही. मला एकच गोष्ट जाणवते, या निवडणुकीत लोकशाहीपेक्षा पैसा जास्त ताकद दाखवत आहे. “लोकशाही नाही, पैशाची सत्ता” — अशाच चर्चा गावभर पाचोऱ्यातील मतदार मोठ्या प्रमाणात बोलत आहेत की ही निवडणूक पैशावर चालते, लोकशाही केवळ नावाला आहे. एखादा उमेदवार पाच वर्षे काम करेल, लोकांमध्ये राहील, त्रास करून घेईल, विकास करेल… पण मतदानाच्या दिवशी पैसे मोजले गेले नाही तर तेवढ्या वर्षांचे कष्ट एका दिवसात फुकट जातील. “भारतीय समाज तमाशानं कधी बिघडला नाही आणि कीर्तनानं कधी सुधारलं नाही!” म्हणजे कितीही प्रबोधन केले, सत्य सांगितले, बातम्या दाखवल्या, तरी लोक पैशापुढे कमजोर पडतात. मला स्वतःला जाणवत आहे की पत्रकारितेने कितीही प्रबोधन केले तरी मतदानावर फारसा फरक पडत नाही. मतदानाच्या दिवशी पैशांचा खेळ उघड्यावर? मतदान सुरू होणार 7:30 वाजता, आणि त्याचबरोबर मतांच्या किमती वाढण्याची स्पर्धा ही सुरूच होते. सूर्योदय जसजसा वर जातो, तसतसे मतांचे भावही वाढतील हे कटु सत्य आहे. शेवटी सायंकाळी मतदान थांबण्याच्या आधी 10 ते 15 हजारां पर्यंतही एका मतांची किंमत जाईल काही लोकांना हे खोटं वाटतं, पण समाजात मौन-सहमतीने हे स्वीकारलं जात असल्याचे दिसते. जे मत मिळणार नाही त्यांचे शेवटच्या काही तासा पर्यंत आशेवर ठेवायचं शेवटी त्यांची मतं विकत घ्यायची नाहीत आणि त्यांना मतदान करूच देऊ नका म्हणजे “ज्यांना पैसे देणे नाही, त्यांना मतदानच करू देणे नाही !” म्हणजे त्यांच्या “बाबा पण जातील आणि दशम्या पण जातील!” जे मत मिळणार नाही त्यांना मतदानही करू देऊ नका. हे ऐकायला मजेशीर पण वास्तव मात्र कडू आहे. या निवडणुकीत खरी लढाई राजकीय पक्षांची असली तरी या निवडणुकीत मतदारांनी कोणत्या पक्षाला मतदान करायचे हा प्रश्न महत्त्वाचा नाही. खरी समस्या ही आहे की पुढील पाच वर्षे नगरपालिका गुंडांच्या हातात जाणार का? नगरपालिका फक्त नाली, रस्ते, पोल, टेंडर यापुरती नसते. ही नेमकी शहराच्या नियमांची, शांततेची आणि नागरिकांच्या हक्कांची भाषा सांगणारी जागा आहे. जर गुंड तिथे पोहोचले तर पुढील पाच वर्षे नागरिकांना वसुली, धमक्या, ठेक्यांमध्ये दादागिरी, व्यापाऱ्यांना त्रास, पत्रकारांना मारहाण, समाजात दडपशाही अशा अनेक प्रकारांचा सामना करावा लागेल. हे केवळ राजकारण नाही, हा समाजाचे भविष्य बिघडवणारा काळ असू शकतो. शेवटची विनंती — जागा व्हा! मतदार बांधवांनो, तुम्ही मत कोणालाही द्या, ते तुमचे स्वातंत्र्य आहे. पैसे घेऊन द्या, मनाने द्या, रागाने द्या, प्रेमाने द्या – तुमची इच्छा. पण किमान एक गोष्ट तरी पाळा… गुंड आणि त्यांच्या टोळक्यांना नगरपालिकेत प्रवेश होऊ देऊ नका. आपण आज थोडे पैसे घेऊन मतदान केलं, पण पुढील पाच वर्षे दादागिरी सहन करण्यासाठी ते पैसे काही उपयोगाचे नाहीत. शहराने आता फक्त मत द्यायचे नाही, तर शहराचे आयुष्य निवडायचे आहे.परंतु जे राजकीय पक्ष व पदाधिकारी,उमेदवार सक्षम आहेत त्यांनी आपल्या स्तरावरून पोलीस व महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आतापासूनच अशा नामचीन गुंडांची यादी व निवडणूक काळात त्यांच्यापासून कोणताही धोका किंवा वादविवाद निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे स्थानिक स्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांना अनेक अडचणी असतात त्यामुळे जे काही करायचे असेल ते वरच्या स्तरावरूनच करणे महत्त्वाचे आहे तसेच सायंकाळी मतदानाची वेळ समाप्त झाल्यानंतर मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत कोणीही प्रवेश करणार नाही याची सक्षम पणे काळजी करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी तेथे पुरेसा विद्युत पुरवठा आणि प्रकाशाची व्यवस्था तसेच स्थानिक पोलिसांनी ऐवजी बाहेरगावचा वेगळा पोलीस फोर्स असला तर सर्वांच्या दृष्टीने फारच सोयीचे असेल
तुर्त एवढेच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here