![]()
पाचोरा – तालुक्यातील पुनगाव ग्रामपंचायत, पुनगाव सोसायटी व स्थानिक सीएससी सेवा केंद्र यांनी गावातील प्रत्येक शेतकरी व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती वेळेवर व स्पष्टपणे पोहोचावी, तसेच एकाही लाभार्थ्याला तांत्रिक किंवा माहितीअभावी वंचित राहावे लागू नये, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी डिजिटल जनजागृती सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत ई-केवायसी, कर्जमाफीसाठी प्राथमिक माहिती संकलन, घरपट्टी-पाणीपट्टी करसवलत योजना यासंबंधित सूचना थेट नागरिकांच्या मोबाईलवर पाठवल्या जात असल्याने पारदर्शकता व शिस्तबद्ध कामकाजाला चालना मिळत आहे. शासनाच्या लाभासंदर्भात होणारी विलंबाची समस्या, गैरसमज, माहितीची कमतरता आणि कार्यालयीन त्रास रोखण्यासाठी या उपक्रमाला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांतील अनुदान, अनुदानित बी-बियाणे, विमा रकमेचा लाभ, खात्यात जमा होणाऱ्या विविध मदतीसाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. पुनगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी न झाल्याने त्यांचे आर्थिक लाभ रोखले गेले आहेत. त्यामुळे ज्यांचे पैसे आले नाहीत, त्यांच्या नावांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येऊन संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन सीएससी व आपले सरकार सेवा केंद्र चालक निखिल पाटील यांनी केले आहे. शासन स्त्रोतांकडून लाभ मिळूनही ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे रक्कम खात्यात जमा न होण्याच्या घटना वाढल्या असल्याने ही सूचना विशेष महत्त्वाची ठरत आहे. महाराष्ट्र शासनाने पुनगाव सोसायटीच्या कर्जदार सभासदांची कर्जमाफीसाठी प्राथमिक माहिती मागविली आहे. ही माहिती शासनाला अंदाजपत्रकासाठी असून अंतिम कर्जमाफी निर्णय भविष्यात निकष बदलासह जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक, फार्मर आयडी आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. विशेष अट अशी की मयत सभासदांच्या वारसांनी 100 रुपयांच्या स्टँपवर संमतीपत्र देणे बंधनकारक आहे, मात्र जिवंत सभासदांनी स्टँप देऊ नये, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी वारसांनी कागदपत्रे अपूर्ण न ठेवता ठराविक वेळेत भरल्यासच त्यांचा विचार होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुनगाव सोसायटी सचिवांकडे एकाचवेळी तीन संस्था असल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्याची व्यवस्था गावातील मान्यवरांकडे करण्याचा निर्णय सोसायटीने घेतला आहे. दस्तऐवज प्रल्हाद रामदास पाटील, युवराज श्रावण पाटील, बाजीराव झेडू पाटील, संजय शिवाजी निंबाळकर आणि संजय लक्ष्मण पाटील यांच्याकडे जमा करावेत, असे ठरविण्यात आले आहे. चार दिवसात कागदपत्र न दिल्यास संबंधित सभासदांची माहिती अपूर्ण म्हणून शासनाला रिकामी पाठवावी लागेल. यानंतर कोण वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सोसायटी स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट नोंद देण्यात आली आहे. सोसायटीकडून कळविण्यात आले आहे की अनेक सभासदांनी आधारवरील स्पेलिंग, 7/12 उतारा, पॅन, मोबाईल लिंकिंग यासारखी कागदपत्रे अचूक न दिल्यामुळे माहिती भरण्यात चुका निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे भविष्यात लाभ न मिळण्याची शक्यता असल्याने कागदपत्रे योग्यरित्या सादर करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या काही सभासदांची नावे सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून त्यांना तातडीने कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुनगाव ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कर थकबाकीमध्ये 50% सवलत जाहीर केली आहे. स.न. 2025/26 या चालू वर्षाचा कर एकरकमी भरावा, 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकबाकीतील 50% रक्कम माफ होईल, सवलत 31 डिसेंबर 2025 पर्यंतच लागू राहील, औद्योगिक व व्यावसायिक मालमत्तांना कोणतीही सवलत मिळणार नाही आणि फक्त निवासी मालमत्ता धारकांनाच लाभ लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत कर 30 डिसेंबर 2025 पूर्वी भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी संयुक्तपणे केले आहे. पुनगाव ग्रामपंचायतीने प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा नवा आदर्श उभा केला आहे. कागदोपत्री त्रास, दिरंगाई, माहितीअभावी वंचित राहण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हे प्रभावी पाऊल ठरत आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गावातील नागरिकांपर्यंत अचूक आणि वेळेवर पोहोचविण्याच्या या प्रयत्नांचे गावात कौतुक होत असून इतर गावांसाठीही हे डिजिटल पुनगाव मॉडेल प्रेरणादायी ठरत असल्याचे नागरिकांत व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





