पाचोरा–भडगावच्या राजकीय पटलावर नवे युवा नेतृत्व : महायुतीच्या छत्राखाली सुमित पाटील व सुरज वाघ यांचे प्रभावी पदार्पण

0

Loading

पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात पाचोरा नगरपालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित राहिलेली नसून या निवडणुकीने स्थानिक राजकारणाला नवे दिशादर्शक संकेत दिले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर आप्पा पाटील आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ यांचे सुपुत्र सुरज संजय वाघ हे दोघे युवक पाचोरा नगरपालिका सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून दाखल झाले आहेत. ही घडामोड केवळ दोन नगरसेवकांच्या निवडीपुरती मर्यादित न राहता पाचोरा–भडगाव मतदारसंघाच्या भावी राजकारणाची नांदी मानली जात आहे. सुमित किशोर आप्पा पाटील आणि सुरज संजय वाघ हे दोघेही युवा नेतृत्व शांत, संयमी, निर्व्यसनी, निष्कलंक आणि मितभाषी अशी ओळख निर्माण करणारे आहेत. आजच्या आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेल्या राजकीय वातावरणात अशी संयमी, समतोल आणि विचारपूर्वक वाटचाल करणारी नेतृत्वशैली जनतेला अधिक भावणारी ठरत आहे. सुरज संजय वाघ यांना आपले आजोबा स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्याकडून राजकीय व सामाजिक वारसा लाभलेला आहे. स्वर्गीय आप्पासाहेब वाघ यांनी समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान आजही पाचोरा तालुक्यात स्मरणात असून त्याच परंपरेतून सुरज वाघ यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. दुसरीकडे सुमित किशोर आप्पा पाटील यांना आपले वडील, हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून राजकीय वारसा लाभलेला आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा–भडगाव विधानसभा

मतदारसंघात विकासाभिमुख, जनतेशी थेट संवाद साधणारे आणि कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली असली तरी सुमित किशोरआप्पा पाटील हे वयाने जरी लहान असले तरी लोकप्रियता व लोकांच्या हृदयातल्या स्थानाच्या बाबतीत वडिलांपेक्षाही जास्त सर्वस्तरावरील जनतेच्या हृदयावर आतापासून राज्य करीत आहे अर्थात वडीलांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ सुमित पाटील यांना होत आहे हे निश्चित. पाचोरा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांचे लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून राजकीय ‘लॉन्चिंग’ झाले आहे. एक नगरसेवक शिवसेनेचा तर दुसरा भाजपचा असला तरी सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती लक्षात घेता हे दोघेही प्रत्यक्षात महायुतीचे नगरसेवक आहेत. राज्यात सध्या महायुतीचे राजकारण वरच्या पातळीपुरते मर्यादित न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचलेले असून पाचोरा नगरपालिका सभागृहातही त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येत आहे. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली असून एकेकाळी चुरशीच्या लढतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसून येत आहेत. भाजप विरोधात शिंदे शिवसेना गट असा निवडणुकीचा रंग जरी यावेळी पाहायला मिळाला असला तरी ही लढतही महायुतीच्या चौकटीतच फिरत असल्याचे वास्तव आहे. नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असली तरी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचा एकंदरीत सूर, भविष्यातील राजकीय दिशा आणि राज्यातील घडामोडी लक्षात घेता महायुतीतच विजयाचे गणित आखले जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आगामी महापालिका निवडणुकीनंतर कोर्टाचा निर्णय काय लागतो, धनुष्यबाण कोणाकडे जातो, शिवसेना शिंदे गट स्वतंत्र राहतो की भाजपमध्ये विलीन होतो, हे प्रश्न सध्या तात्कालीन राजकीय घडामोडींचा भाग असले तरी आजच्या घडीला पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात विरोधक शिल्लक न राहिल्यामुळे महायुतीतच निवडणूक रंगणार असे चित्र केवळ दिसून येत नाही तर ते प्रत्यक्षात आकार घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सुमित किशोर आप्पा पाटील आणि सुरज संजय वाघ या दोघा युवा नगरसेवकांकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या असून स्थानिक प्रश्नांची जाण, विकासात्मक दृष्टीकोन आणि पारदर्शक कामकाजाच्या माध्यमातून ते आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात का, याकडे संपूर्ण पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here