![]()
पाचोरा–भडगाव नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच स्थानिक राजकारणातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही अफवा, दबाव, पैशांच्या चर्चा किंवा राजकीय कुरघोड्यांना बळी न पडता थेट विकास, स्थिर नेतृत्व आणि विश्वासाला कौल दिला असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचारकाळात अनेक दावे-प्रतिदावे झाले, पैशांच्या वाटपाच्या चर्चाही रंगल्या, मात्र

मतदानाच्या दिवशी मतदारांनी अत्यंत परिपक्व भूमिका घेत “पैसे घेतले असतील तर सर्वांकडून घेतले, पण मत दिले विकासालाच” हा संदेश मतपेटीतून स्पष्टपणे दिला. हा कौल केवळ शब्दांत नव्हे तर निकालाच्या आकड्यांतून ठामपणे दिसून आला आहे. भडगाव नगरपालिकेत २४ पैकी तब्बल १९ जागांवर शिंदे शिवसेनेने विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले असून भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले तर एक जागा अपक्षाच्या वाट्याला गेली आहे. या निकालाने भडगावमधील जनतेचा कल कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट केले आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या रेखा प्रदीप मालचे यांनी नगराध्यक्ष पदासाठी दणदणीत विजय मिळवत भडगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या विजयामागे केवळ निवडणूक गणित नसून नियोजनबद्ध रणनीती आणि कार्यकर्त्यांची एकजूट कारणीभूत ठरली. भडगाव नगरपालिका निवडणुकीचे मास्टरमाईंड म्हणून बापूजी युवा फाउंडेशनचे लखीचंद पाटील यांची खेळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बूथनिहाय

नियोजन, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण करण्याची रणनीती यामुळे शिंदे शिवसेनेचा विजय अधिक भक्कम झाला. पाचोरा नगरपालिकेचा निकाल तर आणखी ठळक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाला २८ पैकी तब्बल २२ जागांवर विजय मिळत एकतर्फी बहुमत प्राप्त झाले, तर भाजपाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल पाचोऱ्यातील मतदारांनी कोणत्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे हे स्पष्ट करणारा आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. सुनीताताई किशोरआप्पा पाटील यांनी विजय मिळवत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला आहे. त्यांचा विजय हा केवळ नावाचा किंवा संबंधांचा नसून त्यांच्या सामाजिक कार्याचा, संयमी प्रतिमेचा आणि लोकांशी असलेल्या थेट संवादाचा कौल असल्याचे मतदारांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही नगरपालिकांतील यशामागे आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला तो म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोरआप्पा पाटील यांची रणनीतिक भूमिका. युवकांशी संवाद, नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची पद्धत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि प्रत्यक्ष प्रचारातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्या खेळीचा थेट परिणाम निकालावर दिसून आला. हा विजय केवळ आजचा नसून भविष्यातील राजकारणाची दिशा दर्शवणारा असल्याचे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या निकालाने विरोधी पक्षांसाठी आत्मपरीक्षणाचा स्पष्ट इशारा दिला आहे. केवळ आरोप, टीका किंवा तात्कालिक राजकीय गणितांवर निवडणूक जिंकता येत नाही, तर स्थानिक प्रश्न, विकासकामे, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि विश्वास हे घटक अधिक निर्णायक ठरत असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. पाचोरा–भडगाव नगरपालिका निवडणूक निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल न राहता बदलत्या मतदार मानसिकतेचा आरसा ठरला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेला मिळालेले एकतर्फी वर्चस्व हे जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून ‘पैसा नव्हे, विकास’ हा नारा यावेळी घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष मतपेटीतून उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या विश्वासाला न्याय देण्याची जबाबदारी नव्या नगराध्यक्षांवर, नगरसेवकांवर आणि नेतृत्वावर असून हा विश्वास टिकवण्यात यश आले तर पाचोरा–भडगावचे राजकारण आगामी काळातही हाच विकासाचा मार्ग दाखवत राहील, हे मात्र निश्चित आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





