![]()
पिंपळगाव हरेश्वर – (ता. पाचोरा) येथील ग्राम विकास विद्यालयात दि. 21 डिसेंबर 2025 रोजी एक आगळावेगळा, भावनिक आणि आठवणींनी भरलेला प्रसंग अनुभवायला मिळाला. तब्बल ३७ वर्षांनंतर सन १९८८ च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. काळाच्या ओघात वेगवेगळ्या वाटांवर गेलेली ही सगळी माणसं एकाच छत्राखाली जमली तेव्हा जणू वेळच काही क्षणांसाठी थांबला होता. या स्नेहसंमेलनामुळे शाळेचे वर्ग, प्रांगण आणि सभागृह पुन्हा एकदा गप्पा, हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनिक क्षणांनी गजबजून गेले. विद्यार्थी जीवनातील खोड्या, शाळेतील शिस्त, शिक्षकांची कडक पण प्रेमळ शिकवण, वर्गातील शेवटच्या बाकावरच्या आठवणी, परीक्षा, निकालाचे क्षण आणि जिवलग मैत्रीची नाती यांची मनापासून उजळणी झाली. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर अनेकांच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखे हसू दिसत होते. कार्यक्रमात SSC 1988 बॅचच्या वतीने उपस्थित गुरुवर्य शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पाटील, भारती येवले, संजय पाटील, पी ओ चौधरी, चंद्रकांत देसले, सुरेश नैनाव, विरपाल देशमुख, अरुण गरुड, विजय पवार, सुजाता निकम यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आज आम्ही जे काही आहोत ते या शाळेच्या संस्कारांमुळेच आहोत अशी भावना अनेकांच्या शब्दांतून व्यक्त झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करता आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिक्षक अर्जुन आबा सर, एस एस पाटील सर, इमाम शेख सर, सुमनबाई बडगुजर, मधुकर गरुड सर व बी आर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यात कितीही मोठी पदे मिळवली तरी शाळेची नाळ कधीही तुटू देऊ नये असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर भिकनराव गरुड सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी बी पाटील साहेब उपस्थित होते. यावेळी पी बी पाटील यांनी शाळेच्या नूतन वास्तू बांधकामासाठी मदतीचे आवाहन केले असता SSC 1988 च्या माजी विद्यार्थ्यांनी तात्काळ ₹111111/- इतकी रक्कम जाहीर केली. यासोबतच भविष्यातही शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच शाळेत SSC परीक्षेत दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ₹10000/- ची देणगी देऊन त्याची बँकेतील मुदत ठेव करण्यात येणार असून त्या व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमातून शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी जागा नसून आयुष्य घडवणारी संस्कारशाळा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ३७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या या भेटीने ग्राम विकास विद्यालयाचा इतिहास जणू नव्याने जिवंत झाला. कार्यक्रमाच्या शेवटी हरेश्वर मंदिर परिसरात स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत कार्यक्रमाचा समारोप केला. या यशस्वी आयोजनासाठी शरद पाटील, पी ओ चौधरी, संजय पाटील, भारती येवले, श्रीराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







