![]()
पाचोरा – शहरातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशस्त प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद, उत्साह, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा भव्य आविष्कार पाहायला मिळाला. शाळेचे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखात, नियोजनबद्ध पद्धतीने आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या मंगल वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. विद्यार्थ्यांची कला, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, जे. सी. राजपूत, डॉ. डी. आर. देशमुख, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी सुसंस्कृत पद्धतीने केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर गणेश वंदनाच्या मंगल सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि पावन झाला. ज्ञानाच्या ज्योतीतून संस्कारांचा प्रकाश पसरविणाऱ्या दीपोत्सवाने स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला अशी भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. दरवर्षी विद्यार्थ्यांना नृत्याविष्कारासाठी वेगवेगळे विषय दिले जातात आणि यंदाही सामाजिक संदेश, देशभक्ती, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक परंपरा, एकता आणि आधुनिक जीवनशैली अशा विविध विषयांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थित पालक आणि प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणात विद्यार्थ्यांची मेहनत, ताल-लयबद्धता, भावभावना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. रंगीत वेशभूषा, सुसंगत संगीत आणि अचूक हालचालींमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेले सूत्रसंचालन. लहान वयातच आत्मविश्वासाने, स्पष्ट उच्चारात आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करत विद्यार्थ्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांच्या वाणीतील गोडी आणि सहज संवाद कौशल्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. या प्रसंगी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमातील नृत्याविष्कार व सूत्रसंचालनाचे मूल्यमापन करण्यासाठी बाह्य परीक्षक म्हणून किरण रायकवार, शितल पटवारी, प्रा. सुनीता गुंजाळ आणि प्रा. पी. आर. पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सखोल मूल्यमापन केले व त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकदिलाने अथक परिश्रम घेतले. या १५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देत निर्मल परिवाराची एकजूट आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा झगमगता दीप सर्वांसमोर उजळवला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







