सिकलसेल सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

0

Loading

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने ११ डिसेंबरपासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, या उपक्रमाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तसेच जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले असून, सिकलसेल व थॅलेसेमिया यांसारख्या रक्ताशी संबंधित आजारांनी बाधित रुग्णांना नियमित रक्तपुरवठा व्हावा, या सामाजिक हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच जिल्हा परिषद व इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले की, सिकलसेल, थॅलेसेमिया तसेच इतर रक्ताशी निगडित आजारांनी बाधित रुग्णांना आयुष्यभर नियमित रक्ताची गरज भासत असते. अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे या रुग्णांच्या उपचारात अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत रक्तसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे, असे आवाहनही डॉ. भायेकर यांनी यावेळी केले. विशेष म्हणजे स्वतः डॉ. सचिन भायेकर यांनीही रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि उपस्थितांना प्रेरणा दिली. या शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बाळासाहेब वाबळे, डॉ. सुपे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा उत्साह पाहता रक्तदानाबाबत जनजागृतीसाठी शासकीय यंत्रणा किती संवेदनशीलपणे काम करत आहे, हे अधोरेखित झाले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रक्तपेढीच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलन, तपासणी व सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करत रक्तपेढीच्या टीमने जबाबदारी पार पाडली. यासोबतच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीमनेही नियोजन, समन्वय व अंमलबजावणीमध्ये मोलाची भूमिका बजावली. आज पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, या रक्तामुळे सिकलसेल, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे तसेच त्यांच्या उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. सिकलसेल सप्ताहाच्या माध्यमातून केवळ आजाराविषयी जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून समाजोपयोगी संदेश देण्याचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श ठरला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here